पुण्याला मुसळधार पावसाची प्रतिक्षाच; मात्र धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ

पुणे जिल्ह्यात आतापर्यंत १७१.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी हा आकडा २३५.१ मिमीच्या पुढे होता. मात्र, घाट परिसरात चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे धरणसाठ्यात वाढ झाली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Mon, 10 Jul 2023
  • 01:10 pm
pune rain : पुण्याला मुसळधार पावसाची प्रतिक्षाच; मात्र धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ

पुण्याला मुसळधार पावसाची प्रतिक्षाच; मात्र धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ

घाट परिसरात पाऊस पडल्याने पाणीसाठा वाढला

यंदा पावसाचे उशिरा आगमन झाले. त्यातच गेल्या काही दिवसांपासून पुण्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. त्यामुळे अद्यापही शहराला मुसळधार पावसाची प्रतिक्षाच आहे. मात्र, घाट परिसरात चांगला पाऊस पडला आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यात आतापर्यंत १७१.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी हा आकडा २३५.१ मिमीच्या पुढे होता. मात्र, घाट परिसरात चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे धरणसाठ्यात वाढ झाली आहे. पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात आतापर्यंत २९.२७ टक्के झाला आहे. गेल्या वर्षी हा आकडा आजच्या तारखेला २७.७८ टक्के एवढा होता. त्याचप्रमाणे खडकवासला धरण गतवर्षी ४२.१२ टक्के पाणीसाठा होता, जे आता ५१.१२ टक्के भरले आहे. तर पानशेत धरण गतवर्षी २३.६५ टक्के भरले होते. आता २६ टक्के भरले आहे. तसेच वरसगाव धरण गतवर्षी १९.६१ टक्के होते. जे आता २५.५१ टक्के भरले आहे. त्याचबरोबर टेमघर धरण १३.०३ टक्के भरले आहे, जे गेल्या वर्षी ४.०३ टक्के होते.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुण्यातील घाट परिसरामध्ये मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. परिणामी, लोणावळा, लव्हळे आणि इतर भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर शहर परिसरात मात्र पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. मात्र, घाट परिसरात मुसळधार पाऊस पडल्यास धरणात आणखी वाढ होऊन पुणे आणि पिंपरी चिंचवडकरांच्या पाण्याचा प्रश्न सुटण्याची शक्यता आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest