ऑन ड्युटी ४८ तास! विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडण्याची पुणे पोलिसांची मोहीम यशस्वी

पोलिसांनी नरमाईचे धोरण स्वीकारत, मंडळाशी संवाद साधत कोणत्याही अनुचित प्रकाराशिवाय मिरवणूक यशस्वी केली. काही ठिकाणी पोलिसांनी कार्यकर्त्यांना दमदेखील भरावा लागला.

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अतिरिक्त आयुक्तांनी बजावली महत्वाची भूमिका

पुण्याचा वैभवशाली गणेशोत्सवाची (Pune Ganeshotsav 2024) सांगता तब्बल २९ तास चाललेल्या विसर्जन मिरवणुकीने झाली. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा दोन तास लवकर ही मिरवणूक संपली. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनखाली आठ हजार पोलीस कर्मचाऱ्यांनी दोन दिवस अथक परिश्रम करीत पुणेकरांच्या बाप्पाची विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडली.

पोलिसांनी (Pune Police) नरमाईचे धोरण स्वीकारत, मंडळाशी संवाद साधत कोणत्याही अनुचित प्रकाराशिवाय मिरवणूक यशस्वी केली. काही ठिकाणी पोलिसांनी कार्यकर्त्यांना दमदेखील भरावा लागला. या किरकोळ घटना वगळता मंगळवारी (दि. १७) सकाळी शांततेत  सुरू झालेली मिरवणूक बुधवारी (दि. १८) दुपारी तीनच्या सुमारास संपली.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार (CP Amitesh Kumar) यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यात विसर्जन मिरवणुकीत (Visarjan Miravanuk) तब्बल आठ हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मंगळवारी सकाळी ८ वाजता पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यापूर्वी वाहतूक पोलिसांकडून बॅरिकेडिंग करणे, बांबूचे अडथळे बांधून वाहतूक वळविणे असे काम रात्रभर सुरू होते. शहराच्या मध्यवस्तीत सोमवारी (दि. १६) रात्री दहापासूनच वाहतुकीमधील बदल अमलात आणण्यात आले होते. सलग ४० तासांपेक्षा अधिक काळ पोलीस रस्त्यावर जगता पहारा देत उभे होते. त्यामुळे पुणेकर नागरिक आणि परजिल्ह्यातून तसेच परराज्यातून आलेल्या नागरिकांना निर्विघ्नपणे गणपती विसर्जन मिरवणूक पाहण्याचा आनंद लुटता आला.

प्रत्येक चौकात आणि मुख्य मिरवणूक मार्गावर पोलिसांनी मंडळांशी संवाद साधत त्यांना पुढे जाण्यास बाध्य केले. स्वारगेट, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, शास्त्री रस्ता तसेच दांडेकर पूल ते सारसबाग, सिंहगड रस्ता, सातारा रस्ता परिसर आदी ठिकाणी मिरवणूक रेंगाळत असल्याचे चित्र पहायला मिळाले. मात्र, पोलिसांनी कडक भूमिका घेत मंडळांच्या कार्यकर्त्यांना वेळोवेळी तंबीदेखील दिली. काही ठिकाणी डीजे अन् ढोल-ताशांच्या तालावर पोलिसांनी ताल धरला होता.

पोलिसांनी ढोलपथकांशी मिरवणुकीपूर्वी संवाद साधला होता. त्यांना नियमावलीचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले होते. गणेश मंडळांनीदेखील मर्यादा पाळत पथकांची संख्या मर्यादित ठेवली. बहुतांश मंडळांनी ही मर्यादा पाळली. तसेच, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी ठिकठिकाणी पोलिसांनी मदत केंद्रे उभारलेली होती. गर्दीवर नियत्रंण ठेवण्यासाठी सातत्याने स्पीकरद्वारे सूचना देण्यात येत होत्या. त्यामुळे यंदा गोंधळ आणि गर्दीत अडकण्याच्या घटना अपवादात्मकच घडल्याचे पाहायला मिळाले.

गणेशोत्सव गाईडमुळे तसेच फलकांमुळे नागरिकांना मिरवणूकीचा आनंद घेता आला. एलईडी स्क्रीनवरून सूचना आणि मार्ग दाखविण्यात येत होते. त्याचा फायदा नागरिकांना झाला. विसर्जन मार्गावर सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची करडी नजर ठेवण्यात आली होती. यासोबतच खासगी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा फीड पोलिसांनी घेतला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी बॉम्बशोधक आणि बॉम्बनाशक पथक, आरसीपी, क्यूआरटीची पथके नेमण्यात आली होती.

लक्ष्मी रस्त्यावरून (Laxmi Road Pune) जाताना कार्यकर्ते आणि पोलीस रुग्णवाहिकांना वाट मोकळी करून देत होते. यंदाच्या गणेशोत्सवासाठी पोलीस आयुक्त, उपायुक्त आणि पोलीस ठाणे स्तरावर २०२ बैठका घेण्यात आल्या होत्या. वाहतूक मार्गदर्शनासाठी वाहतूक शाखेकडून देखील वेळोवेळी माहिती जाहीर केली जात होती. वाहतूक बदलासाठी ठिकठिकाणी फलक लावण्यात आलेले होते.

सोनसाखळी चोरी, मोबाईल चोरी, पाकीटमारी, महिलांची छेडछाड रोखण्यासाठी पथके नेमण्यात आली होती. आणीबाणीच्या स्थितीत रुग्णवाहिकेसाठी स्वतंत्र मार्गाचे नियोजन करण्यात आल्यामुळे रुग्णांना वेळेत रुग्णालयात पोचवण्यास मदत मिळाली. सर्वत्र वॉच टॉवर, गस्ती पथके तैनात करण्यात आली होती.

मंडळांचे पदाधिकारी, शांतता कमिटी, पोलीस मित्र समिती यांनाही नियोजनात सहभागी करून घेण्यात आले होते. गणेशोत्सव काळात होणारे गैरप्रकार रोखण्याकरिता खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील फरासखाना, विश्रामबाग आणि खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मद्य विक्रीची दुकाने, बार, देशी दारू दुकाने गणेशोत्सवात बंद ठेवण्यात आली होती. तसेच, विसर्जन मिरवणुकीदरम्यान होणारी भांडणे, हल्ले, महिला छेडछाड आदी रोखण्यासाठी १७ आणि १८ सप्टेंबर रोजी शहरातील सर्वच पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मद्याची दुकाने बंद ठेवण्यात आली होती.

याविषयी पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, यंदाची विसर्जन मंगळवारी सकाळी साधारण दहा वाजता सुरू झाली. ही मिरवणूक बुधवारी दुपारी तीन वाजता संपली. सुमारे २९ तास ही मिरवणूक चालली. अतिशय शांततापूर्ण वातावरण आणि उत्साहात ही मिरवणूक पार पडली. कोणत्याही अडीअडचणी आल्या नाहीत. नागरिक आणि गणेश मंडळ कार्यकर्त्यांनी तसेच गणेश भक्तांनी खूप सहकार्य केले. सर्वांसोबत पोलिसांनी उत्तम समन्वय ठेवलेला होता. सुमारे आठ हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आम्ही लेझर बिमवर बंदी घातली होती. तरीदेखील अनेक ठिकाणी लेजर बिम लावण्यात आल्याचे पहायला मिळाले. त्यांच्यावर स्थानिक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कारवाई केली आहे. आणखी कारवाई सुरू आहे. ज्या ठिकाणी आवाजाची मर्यादा ओलांडण्यात आली त्याठिकाणी डेसीबल मीटरद्वारे रीडिंग घेण्यात आलेले आहे. त्याचा अभ्यास करून कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आयुक्त म्हणाले.

वाहतूक पोलिसांनी कोंडी टाळण्यासाठी यंदादेखील 'रिंग रोड' संकल्पना राबविली होती. परंतु, काही ठिकाणी वाहतुकीचा बोजवारा उडाल्याचे पाहायला मिळाले. अनेक ठिकाणी वाहनचालक पोलिसांनी केलेले बॅरिकेंडिंग तोडून पुढे जात असल्याचे निदर्शनास आले. टिळकरोडवर देखील काही ठिकाणी वाहनचालक मिरवणुकीत घुसल्याचे चित्र दिसत होते. अनेक ठिकाणी वाहनचालकांचे मंडळांच्या कार्यकर्त्यांशी  वाद झाल्याचे प्रसंग घडले. यासोबतच पोलिसांनी अनेक ठिकाणी बांबू बांधून रस्ते बंद केल्याने नागरिकांना एका रस्त्यावरून दुसऱ्या रस्त्यावर चालत जाणेदेखील अडचणीचे झाले होते. नागरिकांना अक्षरश: या बांबूवर चढून किंवा वाकून जावे लागत होते.

गणेश विसर्जन मिरवणूक शांततापूर्ण वातावरणात आणि उत्साहात पार पडली. नागरिक तसेच गणेश मंडळ कार्यकर्त्यांनी खूप सहकार्य केले. सर्वांसोबत समन्वय साधल्यामुळेच हे शक्य झाले. सुमारे आठ हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता. आम्ही लेजर बिमवर बंदी घातली होती. तरीदेखील अनेक ठिकाणी ते लावण्यात आल्याचे पहायला मिळाले. संबंधितांवर स्थानिक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कारवाई केली आहे. आणखी कारवाई सुरू आहे. ज्या ठिकाणी आवाजाची मर्यादा ओलांडण्यात आली, त्याठिकाणी डेसीबल मीटरद्वारे रीडिंग घेण्यात आले आहे. त्याचा अभ्यास करून कायदेशीर कारवाई केली जाईल.
- अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे

मिरवणुकीपूर्वी १,७४२ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
शहराच्या देदिप्यमान गणेशोत्सवाचा विसर्जन सोहळा मंगळवारी सकाळी लवकर सुरू झाला. या सोहळ्यासाठी पोलिसांनी जय्यत तयारी केली होती. तब्बल आठ हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आल्याने कोणताही अनुचित प्रकार न घडता वेळेत विसर्जन मिरवणुका समाप्त झाल्या. मिरवणुकीपूर्वी पोलिसांनी गुन्हेगारांवर बारीक लक्ष ठेवण्यास सुरुवात केली होती. तसेच, जवळपास १,७४२ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. वाढती गुन्हेगारी आणि उत्सवादरम्यान होणारी गैरकृत्य रोखण्यासाठी पोलिसांनी विविध पथके तयार केली होती.

मोबाईलचोरीचे प्रमाण घटले
मोबाईलचोरीच्या घटना यंदा घटल्याचे पहायला मिळाले. या घटनांची आकडेवारी घेण्याचे काम सुरू आहे. शहरात सर्वत्र उत्साह दिसून येत होता. पोलिसांच्या बंदोबस्ताचे नियोजन दोन शिफ्टमध्ये करण्यात आले होते. त्यामुळे पोलिसांना वेळेत जेवण आणि पुरेसा आराम मिळाला. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव तणावमुक्त होण्यास मदत झाल्याचे आयुक्त म्हणाले.

असा होता बंदोबस्त
- अतिरिक्त पोलीस आयुक्त : ४
- पोलीस उपायुक्त : १०
- सहायक आयुक्त : २३
- पोलीस निरीक्षक : १२८
- सहायक निरीक्षक-उपनिरीक्षक : ५६८
- अंमलदार : ४,६०४
- होमगार्ड : ११००
- राज्य राखीव पोलीस : एक तुकडी
- शीघ्र कृती दल (क्यूआरटी) : १० पथके

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest