खासगी मेडिकल कॉलेजमध्ये होणार पाच पट शुल्कवाढ

पुणे: सध्या महागाईने टोक गाठले असतानाच आता वैद्यकीय शिक्षणही महागणार आहे. शुल्क नियामक प्राधिकरणाने राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांसाठी शुल्क निश्चित करून दिले आहे

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

मॅनेजमेंट कोट्यातील वैद्यकीय शिक्षण महागणार, गरिबांचे डॉक्टरकीचे स्वप्न आता आवाक्याबाहेर

पुणे: सध्या महागाईने टोक गाठले असतानाच आता वैद्यकीय शिक्षणही (Medical Education) महागणार आहे. शुल्क नियामक प्राधिकरणाने राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांसाठी शुल्क निश्चित करून दिले आहे. मात्र, दुसऱ्या बाजूला वैद्यकीय शिक्षण विभागानेच खासगी वैद्यकीय महाविद्यालयांसाठी शुल्क वाढीचा (Fees Hike) निर्णय घेतला आहे.

महाविद्यालयांमधील मॅनेजमेंट कोट्याच्या (Management Quota) जागांसाठी नियमित फीच्या पाच पट फी आकारण्यास आपली काहीही हरकत नसल्याचा निर्वाळा वैद्यकीय शिक्षण विभागाने दिला आहे. यामुळे  राज्यातील खासगी विनाअनुदानित होमियोपॅथी, आयुर्वेदिक आणि युनानी महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवणे आर्थिक दुर्बल घटकातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी अशक्य होणार आहे. 

असोसिएशन ऑफ मॅनेजमेंट ऑफ आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजेस ऑफ महाराष्ट्र या संघटनेने वैद्यकीय शिक्षण विभागाकडे निवेदन सादर केले होते. त्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक झाली. या बैठकीत मॅनेजमेंट कोट्यासंबंधी निर्णय घेण्यात आला. 

याबाबत वैद्यकीय प्रवेशासाठी इच्छुक असलेली प्रियांका भालेराव ही विद्यार्थिनी म्हणाली, वैद्यकीय महाविद्यालयांच्या मॅनेजमेंट कोट्यातील शुल्कावर राज्य सरकारचे नियंत्रण असावे. कमाल आणि किमान शुल्क मर्यादा घालून द्यावी. सामान्य कुटुंबातील विद्यार्थी प्रत्येक वर्षाला २५ लाख रुपये भरू शकत नाहीत. त्यामुळे आमचे डॉक्टर होण्याचं स्वप्न धुळीस मिळाले आहे. केवळ श्रीमंत घरातील मुलेच डॉक्टर होतील. 

याबाबत वैद्यकीय प्रवेशासाठी इच्छुक असलेला दीपक काळे हा विद्यार्थी म्हणाला, अत्यंत दुर्दैवी निर्णय आहे. या निमित्ताने समाजातील आर्थिक विषमता अधोरेखीत होईल. पाच वर्षांसाठी २५ लाख खर्चून गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशात वैद्यकीय शिक्षण घेण्याशिवाय पर्याय उरला नाही.

नाव न छापण्याच्या अटीवर एका खासगी मेडिकल कॉलेजचे डीन म्हणाले, मेडिकल कॉलेजला कुठलेही शासकीय अनुदान मिळत नाही. मॅनेजमेंट कोट्यातील शुल्क दर ३ वर्षांनी बदलतात. सरकारच्या नियमावलीनुसार ही शुल्कवाढ झाली आहे. मुळात या कोट्यातील प्रवेश हे भरमसाठ फी घेऊन केले जातात. गुणवंत गरीब विद्यार्थ्यांना अनुदानित जागांवर प्रवेश मिळतो. त्यांच्यावर अन्याय होतो हा आरोप चुकीचा आहे. वैद्यकीय शिक्षणाचा खर्च महागाईच्या निर्देशांकानुसार वाढला आहे."

…...तर परदेशात घ्यावे लागेल शिक्षण !
सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये जागा कमी असल्याने अनेक विद्यार्थी खासगी वैद्यकीय महाविद्यालयांकडे वळतात. अनेकदा त्यांना मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश मिळवण्याखेरीज पर्याय उपलब्ध राहात नाही. अशावेळी हे शुल्क पाचपटीने वाढले, तर अशा विद्यार्थ्यांना भारताऐवजी परदेशात जाऊन त्याच शुल्कात वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण करणे सोयीचे होणार असल्याचे मत परदेशातील शिक्षणविषयक सल्लागार डॉ. सिद्धार्थ सोनवणे यांनी व्यक्त केले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest