Pune Ganeshotsav 2024: विसर्जन मिरवणुकीतली सरासरी ध्वनिपातळी घटली, दणदणाट मात्र कायम

पुणे: जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेल्या पुण्याच्या गणेशोत्सवात यंदाही ध्वनिप्रदुषणाने मर्यादा ओलांडल्याचे समोर आले आहे. या उत्सवातील नोंदीनुसार सरासरी ध्वनिपातळीत घट झाली असली तरी ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट कायम होता.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Avchite
  • Thu, 19 Sep 2024
  • 12:24 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

गणेश विसर्जन मिरवणुकीत ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी केलेल्या प्रयत्नानंतरही बेलबाग चौकात १०९ तर होळकर चौकात ११२.५ डेसिबलपर्यंत ध्वनिपातळी

पुणे: जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेल्या पुण्याच्या गणेशोत्सवात (Pune Ganeshotsav 2024) यंदाही ध्वनिप्रदुषणाने मर्यादा ओलांडल्याचे समोर आले आहे. या उत्सवातील नोंदीनुसार सरासरी ध्वनिपातळीत घट झाली असली तरी ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट कायम होता. या आवाजाने काही ठिकाणी ११० डेसिबलच्या आसपास पातळी गाठल्याचे दिसून आले.

गणेश विसर्जन मिरवणुकीत ध्वनिप्रदूषण (Noise Pollution) रोखण्यासाठी मोठ्या आवाजाच्या साऊंड सिस्टीमवर (स्पीकर) बंदी घालावी... ढोल-ताश्यांच्या संख्या कमी करावी, अशा मागण्या नागरिकांनी केल्या होत्या. त्याचीदखल घेत पुणे पोलिसांनी ध्वनिप्रदूषण कमी करण्याबाबत गणेश मंडळांना आवाहन केले होते. परंतु त्यानंतरही यंदा मिरवणुकीचा दणदणाट कायम होता. सीओईपी तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी घेतलेल्या नोंदीनुसार गेल्या गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सरासरी ध्वनिपातळीत घट होऊनही ध्वनिप्रदूषण कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

यंदाच्या मिरवणुकीत सरासरी ९४.८ डेसिबल ध्वनिपातळीची नोंदवली गेली. बेलबाग चौक आणि होळकर चौकात सर्वाधिक ११२.५ डेसिबल ध्वनिपातळी नोंदवली गेली.  गेल्या वर्षी सरासरी १०१.३ डेसिबल ध्वनिपातळी नोंदवली गेली होती. त्या तुलनेत यंदाचे सरासरी प्रमाण साडेसहा डेसिबलपर्यंत कमी होते.

सीओईपी तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या (COEP Technological University) विद्यार्थ्यांनी सोमवार आणि मंगळवार (दि. १६ आणि १७) या दोन दिवसांमधील २४ तासातील लक्ष्मी रस्त्यावरील दहा प्रमुख चौकांतील ध्वनिपातळीच्या दर चार तासांनी शास्त्रीय पद्धतीने नोंदी घेतल्या. त्या नोंदींच्या विश्लेषणातून ध्वनिप्रदूषणाची माहिती समोर आली आहे. विद्यार्थ्यांनी घेतलेल्या नोंदीनुसार याबाबतचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.

या वर्षीच्या मिरवणुकीतील सरासरी ध्वनिपातळी गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी झाली असली तर नोंदवली गेलेली ध्वनिपातळी मानक पातळीपेक्षा अधिकच असल्याचे दिसून आले. दरवर्षी विसर्जन मिरवणुकीत आवाजाची पातळी वाढत असल्याने अनेक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. त्यामुळे मिरवणुकीत डीजेचा आवाजावर मर्यादा घालाव्या किंवा बंदी आणावी, अशी मागणी केली जाते. याबाबत जनजागृतीदेखील केली जात असल्याने कार्यकर्ते जागृत होऊ लागले आहेत. त्यामुळे मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून ध्वनिप्रदूषण कमी होण्यासाठी पुढाकार घेतला जात आहे. या कामासाठी काही कार्यकर्त्यांनी आणि पोलिसांनी ध्वनिपातळी नोंदीच्या कामात मदत केली.

पोलीस आणि प्रशासनाने मंगळवारी रात्रीपर्यंत मर्यादित ध्वनिक्षेपकांना परवानगी दिल्याने लक्ष्मी रस्त्यावर प्रामुख्याने पारंपरिक वाद्यांचेच प्रमाण जास्त होते. मात्र बुधवारी (दि. १८) सकाळी आठ वाजल्यापासून दणदणाट सुरू झाला, असे सीओईपी तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र आणि उपयोजित विज्ञान विभागाचे प्रा. महेश शिंदीकर यांनी ‘सीविक मिरर’ला सांगितले. प्रा. शिंदीकर यांच्या मार्गदर्शनाखाली मृणाल खुटेमाटे, ईशिता हनमाबादकर, आयुष लोहोकरे, आदित्य फाळके, आदित्य जोशी, तेजस संजीवी, मोहित कंडोळकर, ऋतुराज माळोदे, श्रेया शिंदे, वसुंधरा जानवडे, प्रेम दुपारगडे, क्षितिजा मेटकरी, अभिराज वैद्य, श्रुती कुलकर्णी, श्रेया कारंडे, सौरीश डांगे, वैभव भारगळ, वेदांत गोंधळेकर, सोहन भिंगेवार, आशिष ढगे या विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला.

नियमानुसार अशी आहे आवाजाची मर्यादा...
नियमानुसार औद्योगिक क्षेत्रात दिवसा ७५ डेसिबल, रात्री ७० डेसिबल, व्यावसायिक क्षेत्रात दिवसा ६५ डेसिबल, रात्री ५५ डेसिबल, निवासी क्षेत्रात दिवसा ५५ डेसिबल, रात्री ४५ डेसिबल, तर शांतता क्षेत्रात दिवसा ५० डेसिबल, रात्री ४० डेसिबलपर्यंत आवाज असायला हवा. मात्र ही ध्वनिमर्यादा पाळली गेली नसल्याचे आकडेवारीवरून स्पष्टपणे दिसून येते. ध्वनिक्षेपक, ढोलताशांसारख्या पारंपरिक वाद्यांच्या दणदणाटामुळे यंदा सरासरी ९४.८ डेसिबल ध्वनिपातळीची नोंद झाली.

दहा प्रमुख चौकातील सरासरी ध्वनिपातळी
चौक ध्वनिपातळी (डेसिबलमध्ये)
बेलबाग चौक – ९९.८
गणपती चौक – ९५.८
लिम्बराज चौक – ९८.१
कुंटे चौक – ९४.९
उंबऱ्या गणपती चौक – ९२.२
गोखले चौक – ९३.५
शेडगे विठोबा चौक – ९२.८
होळकर चौक – ९४
टिळक चौक – ९६.७
खंडूजी बाबा चौक – ९०.२

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest