Pune Ganeshotsav 2024: सोनेरी मयुरपंखी रथातून श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला भावपूर्ण निरोप

पुणे: भारताचा पहिला सार्वजनिक गणपती अशी ओळख असलेल्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाच्या गणपतीची सोनेरी मयुरपंख असलेल्या रथातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. गुलाब पुष्पांनी सजवलेला रथ, ढोल-ताशांचा दणदणाट आणि कोल्ड फायरच्या आकर्षक रोषणाईने विसर्जन मिरवणुकीला एक वेगळे रुप प्राप्त झाले होते.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Thu, 19 Sep 2024
  • 01:37 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

कोल्ड फायरची आकर्षक रोषणाई अन् ढोल-ताशांच्या दणदणाटासह मार्गस्थ झालेल्या रथाने वेधून घेतले हजारो भाविकांचे लक्ष

पुणे: भारताचा पहिला सार्वजनिक गणपती अशी ओळख असलेल्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती (Shrimant Bhausaheb Rangari Ganpati) मंडळाच्या गणपतीची सोनेरी मयुरपंख असलेल्या रथातून भव्य  मिरवणूक काढण्यात आली. गुलाब पुष्पांनी सजवलेला रथ, ढोल-ताशांचा दणदणाट आणि कोल्ड फायरच्या आकर्षक रोषणाईने विसर्जन मिरवणुकीला एक वेगळे रुप प्राप्त झाले होते. विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर पारंपारिक खेळांचे प्रदर्शन घडवले जात होते. रस्त्याच्या आजूबाजूला उभे असलेले भाविक फुलाच्या पाकळ्यांची वृष्टी करून बाप्पाला निरोप देत होते.

मंगळवारी सकाळी आचार्य गोविंद गिरी महाराज यांनी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मंडळाच्या गणपतीची पूजा केली. त्यानंतर सकाळी साडे आठच्या सुमाराला मयुरपंखी रथावर आरूढ झालेली मूर्ती विघ्नेश्वर वाड्यावरून महात्मा फुले मंडईतील लोकमान्य टिळक चौकाजवळ आली. टिळक चौकात रथ आल्यावर सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी आरती केली. येथून रंगारी ट्रस्टच्या वैभवशाली बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीस सुरुवात झाली. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ ट्रस्टतर्फे येथे मानाच्या पाच गणपतींचे स्वागत करण्यात आले.       

मंडळाच्या गणपती मूर्तीच्या रथाला परंपरेप्रमाणे बैल जोडले जातात. मात्र, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ ट्रस्टचे विश्वस्त आणि सजावट प्रमुख पुनीत बालन यांनी मुक्या प्राण्यांवर अत्याचार होऊ नये आणि प्राणी दयेच्या भूमिकेतून यावर्षी रथ ओढण्यासाठी बैलाचा वापर करायचा नाही असा निर्णय घेतला. यामुळे १३२ वर्षांनंतर एक विशेष रथ तयार करण्यात आला. कोल्ड फायरच्या आकर्षक रोषणाईने प्रकाशमान झालेल्या मयुरपंखी सोनेरी रथाने भाविकांचे लक्ष आकर्षून घेतले होते. या रथाचे सारथ्य खुद्द पुनीत बालन (Punit Balan) करत होते.      

विसर्जन मिरवणुकीला (Pune Ganeshotsav 2024) खऱ्या अर्थाने दुपारी सव्वा तीन वाजता सुरूवात झाली. मिरवणुकीच्या अग्रभागी भाऊसाहेब रंगारी यांचा पुतळा आणि नगारा ठेवलेला होता. सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या पारंपारिक खेळाचे दर्शन घडवले जात होते. समर्थ, शिवमुद्रा आणि श्रीराम या ढोल-ताशा पथकांच्या वादनाने भाविक मंत्रमुग्ध झाले होते.  मिरवणुक मार्गावर मंडळाचे कार्यकर्ते भंडारा उधळत होते. देखावा पाहण्यासाठी जमलेले गणेशभक्त पुष्प पाकळ्यांनी बाप्पाला निरोप देत होते. अशा वातावरणात मंडळाच्या गणपतीची विसर्जन मिरवणूक मार्गस्थ होत होती. भावपूर्ण आणि भक्तिपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मंडळाच्या गणपतीला निरोप देण्यात आला.    

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ ट्रस्टच्या गणपतीची विसर्जन मिरवणूक अतिशय उत्साहात आणि आनंदात पार पडली. पोलीस विभागाने आम्हाला परवानगी दिल्यावर आम्ही मिरवणुकीत सहभागी झालो. थोड्या वेळेते मिरवणूक संपवण्याचा आम्ही प्रयत्न केला. आमच्या विसर्जन मिरवणुकीसाठी सहकार्य केल्याबद्दल पोलीस, पालिका प्रशासन, पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्त्यांचे मी मनापासून आभार मानतो.
- पुनीत बालन,  श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ ट्रस्टचे विश्वस्त, सजावट प्रमुख    

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest