पुणे : आयटी बनतोय मृत्यूचा सापळा; माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील तरुणांच्या वाढत्या मृत्यूबद्दल ‘एफआयटीई’ ने उठवला आवाज

अर्न्स्ट ॲॅण्ड यंग कंपनीतील २६ वर्षीय ॲॅना सेबास्टियन या तरुणीने आपले आयुष्य अकाली संपवल्याने माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणारे कर्मचारी खडबडून जागे झाले आहेत.

Workplace stress in IT

पुणे : आयटी बनतोय मृत्यूचा सापळा; माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील तरुणांच्या वाढत्या मृत्यूबद्दल ‘एफआयटीई’ ने उठवला आवाज

अर्न्स्ट  ॲॅण्ड यंग कंपनीतील २६ वर्षीय ॲॅना सेबास्टियन या तरुणीने आपले आयुष्य अकाली संपवल्याने माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणारे कर्मचारी खडबडून जागे झाले आहेत. या कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या  फोरम ऑफ आयटी एम्प्लॉइज (एफआयटीई) या संस्थेने कामगार आयुक्तांकडे धाव घेतली असून माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील तणावाच्या कामाची संस्कृती, वरिष्ठांकडून होणाऱ्या छळामुळे कर्मचारी मृत्यूला जवळ करत असल्याचा आरोप केला आहे.

ॲॅनाचा मृत्यू कशामुळे झाला, त्याला कारणीभूत कोणते घटक आहेत, याबाबत केंद्रीय कामगार मंत्रालयाने यात लक्ष घातले असले तरी राज्य कामगार मंत्रालयाने मात्र सोयिस्करपणे हात झटकले आहेत. हा आमचा विषय नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. राज्य कामगार मंत्रालयाने या प्रकरणापासून हात झटकले असले तरी ‘एफआयटीई’ ने हा विषय लावून धरण्याचे ठरवले आहे.  

‘एफआयटीई’च्या अध्यक्षांनी माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांची प्रत्येक सहा महिन्यांनी पाहणी करावी अशी मागणी केली आहे. या क्षेत्रातील तणावाच्या, गुलामीच्या कार्य संस्कृतीबद्दल तेथील वरिष्ठ, एचआर अधिकाऱ्यांना जबाबदार धरावे. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची मानसिक स्थिती ढासळण्यास, नैराश्येच्या गर्तेत ढकलण्यास वरील लोक जबाबदार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.         

‘एफआयटीई’चे ज्येष्ठ प्रतिनिधी पवनजीत माने ‘सीविक मिरर’शी बोलताना म्हणाले की, माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील तरुण कर्मचाऱ्यांचे वाढते मृत्यू, हृदयविकाराच्या घटनांतील वाढ चिंताजनक  असून यातील अनेक प्रकाराची नोंदच होत नाही. मानसिक त्रास आणि कामाच्या तणावामुळे या घटना वाढत असून याची चौकशी होण्याची नितांत गरज आहे. बहुतेक कंपन्या मोठ्या वेतनाचे आमिष दाखवून तरुण वर्गाला आकर्षित करतात. मात्र, हे तरुण जेव्हा कामाला लागल्यानंतर तेथील कामाचा ताण आणि वरिष्ठांच्या छळाची कोठेही नोंद होत नाही. यामुळे वरिष्ठांचा अशा घटनांशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध असला तरी ते यातून सहज निसटतात. वरिष्ठांच्या वर्तनाला कोठे तरी आळा बसला पाहिजे. कामगार आयुक्तांनी कंपनीबाहेरील एक समिती स्थापन करावी आणि तिला ठराविक काळाने कंपन्यांना भेट देण्याची परवानगी द्यावी. या भेटीत कर्मचारी आपली व्यथा नावाशिवाय मांडू शकतील. कर्मचाऱ्यांशी गैरवर्तणूक करणाऱ्या कंपन्यांना कोणत्या ना कोणत्या मार्गाने दंड होऊ शकेल. असा प्रकार आजपर्यंत झाला नसला तरी, आता तो व्हावा अशी आमची भूमिका आहे.  (Workplace stress in IT)

कामगारांचे प्रश्न आणि त्यांच्या कल्याणाविषयीच्या प्रकारांमध्ये लक्ष घालणारी भारतीय कामगार संघटना आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते रघुनाथ कुचिक यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, आम्ही माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, कंपनीकडून मिळणाऱ्या लठ्ठ पगारामुळे अनेकांनी आपल्या तक्रारी मागे घेतल्या. अशा घटनांमुळे आयटी कंपन्यांतील वरिष्ठ आणि एचआर अधिकाऱ्यांना आपल्या वागणुकीत बदल करण्याची गरज भासत नाही. कर्मचाऱ्यांवर पुन्हा तणाव वाढविण्यास त्यांना  एकप्रकारे प्रोत्साहन मिळते. आपल्या वागण्याबद्दल आतापर्यंत एकाही वरिष्ठाला दंड झाल्याचे उदाहरण नाही. यामुळे आयटी क्षेत्रात सुधारणा होण्याची गरज आहे. आयटी कंपन्यातील हायर ॲण्ड फायर हे धोरण, कार्यालयातील राजकारण, नोकरी जाण्याची भीतीमुळे तेथे कर्मचाऱ्यांमध्ये योग्य सुसंवाद नसतो, प्रत्येकजण आपल्यापुरते पाहतो. कर्मचारीही आपल्यावरील तक्रार कोठे मांडण्याचे धाडस करत नाहीत. अशा प्रकारच्या कार्यसंस्कृतीला आळा घालण्याची गरज आहे. तसेच मंत्रालयाचे आयटी कंपन्यांबाबतचे धोरण व्यवस्थापनाला अधिक अनुकूल असते. सरकार पातळीवरील या अनुकूलतेचा कंपन्या फायदा घेतात. आपल्याबाबत काही प्रतिकूल भूमिका घेण्याची शक्यता नसल्याची त्यांना खात्री असते. यामुळे कोणाला चौकशीला सामोरे जावे लागत नाही. न्याय मिळण्यासाठी लवाद मंडळे आणि जलद निर्णय देणाऱ्या कोर्टांची गरज आहे.

अशा घटनांना आळा घालण्यासाठी कामगार मंत्रालयाने कारवाई करावी, अशी ‘एफआयटीई’ ची अपेक्षा असली तरी राज्य कामगारमंत्री डॉ. सुरेश खाडे हे मात्र काही पावले उचलण्याची शक्यता नाही. ते म्हणाले की, याबाबत केंद्रीय कामगार मंत्रालय लक्ष घालत आहे. यामुळे यात राज्याने लक्ष घालण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. याच्याशी राज्याचा काहीही संबंध नाही. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते कामगार मंत्रालयाला आयटी क्षेत्राबाबत फारशी काळजी वाटत नसेल तर आयटी क्षेत्रातील होणाऱ्या अशा घटनांना जबाबदार असणारे चौकशीच्या कक्षेत कसे येणार, त्यांची जबाबदारी कशी निश्चित होणार, हा मोठा प्रश्न आहे.

दोन दिवसांत १०० हून अधिक तक्रारी 

ॲना सेबास्टियनच्या मृत्यूनंतर आलेल्या तक्रारीविषयी विचारणा केली असता पवनजीत माने म्हणाले की, वाढता मानसिक छळ आणि कामाच्या तणावाविषयी गेल्या दोन दिवसांत आमच्याकडे साधारण १०० कर्मचाऱ्यांनी संपर्क साधला आहे. आमच्या मागण्या मांडण्यासाठी आणि अशा घटनांची चौकशी करावी यासाठी आम्ही कामगार आयुक्तांशी संपर्क साधला आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest