पुणे: सोसायटी अध्यक्षानेच केली बेकायदा वृक्षतोड; महापालिकेने बजावली नोटीस

पुणे: एकीकडे शहरात वृक्ष जगवण्यासाठी पर्यावरणवादी झगडत असताना दुसरीकडे मात्र, आलिशान सोसायट्यांमध्ये बेकायदा वृक्षतोड होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. अशीच एक घटना लष्कर भागातून समोर आली आहे.

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

पुणे: सोसायटी अध्यक्षानेच केली बेकायदा वृक्षतोड; महापालिकेने बजावली नोटीस

नेहरू मेमोरियल हॉलसमोरील सोसायटीतील प्रकार

पुणे: एकीकडे शहरात वृक्ष जगवण्यासाठी पर्यावरणवादी झगडत असताना दुसरीकडे मात्र, आलिशान सोसायट्यांमध्ये बेकायदा वृक्षतोड (Illegal Tree Cutting) होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. अशीच एक घटना लष्कर भागातून समोर आली आहे. नेहरू मेमोरियल हॉलसमोरच्या साधू वासवानी कुंज सोसायटीमध्ये (Sadhu Vaswani Kunj Society) जवळपास ३० वर्षांपेक्षा अधिक जुने जांभळाचे झाड कापण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याविषयी रहिवाशांनी महापालिकेकडे तक्रार केली होती. त्यानुसार महापालिकेने सोसायटीच्या अध्यक्षाला नोटीस बजावली आहे. 

महापालिकेने (PMC) नोटिशीचे उत्तर दिले नाही तर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. दरम्यानही, सोसायटीच्या अध्यक्षाने स्वत:च्या अधिकारांचा गैरवापर करीत ही वृक्षतोड केल्याचा आरोप सोसायटीच्या सदस्यांनी केला आहे. विशेष म्हणजे सोसायटीचे अध्यक्ष एका राजकीय पक्षाचे पदाधिकारी आहेत.

मुकेश खेतान (Mukesh Khetan) हे सोसायटीचे अध्यक्ष आहेत. खेतान हे याच सोसायटीत असलेल्या बिल्डिंग नंबर दोनच्या तळमजल्यावर राहतात. त्यांनी सोसायटीच्या आवारातील वृक्षांच्या फांद्या व धोकादायक विस्तार काढण्यासाठी महापालिकेच्या ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयाकडे अर्ज दिला होता. सोसायटीने २४ मे २०२४ रोजी दिलेल्या अर्जानुसार क्षेत्रीय कार्यालयाने ६ जून २०२४ रोजी सोसायटीमधील नारळ, उंबर, जांभूळ, गुलमोहर, कडुलिंब, बदाम, वाळवा आणि अशोकाच्या झाडाच्या धोकादायक फांद्या, विस्तार काढण्यासाठी परवानगी दिली होती. यातील नारळ झाड (११ मीटर उंच) साधारण २५ वर्षे जुने असून उंबराचे झाड (९ मीटर उंच) २५ वर्षे, जांभळाची तीन झाडे (९ मीटर उंच)  ३० वर्षे, गुलमोहोर (९ मीटर) ३० वर्षे, कडुलिंब (९ मीटर) २५ वर्षे, बदाम (८ मीटर) २० वर्षे, वाळवा (९ मीटर) ३५ वर्षे, अशोक (११ मीटर) २५ वर्षे वयाची आहेत.

या परवानगी पत्रामध्ये ही झाडे खासगी मिळकतीमधील असून इमारत अथवा रस्त्याच्या दिशेने गेलेल्या फांद्या अथवा विस्तारातून होणारा संभाव्य धोका टाळण्यासाठी, वृक्ष संतुलनासाठी छाटण्यास परवानगी देण्यात आली होती. यामध्ये नारळाच्या झाडाच्या झावळ्या, फळे वेळोवेळी काढण्यासंदर्भात सूचना दिली होती. उंबर आणि जांभळाच्या झाडांच्या ०.४० मीटर बाय ३ ते ४ मीटर लांबीच्या ५ फांद्या छाटण्यास परवानगी देण्यात आलेली होती. यासोबतच, गुलमोहोर, कडुलिंब, बदाम, वाळवाच्या झाडांच्या ४ ते ५ फांद्या छाटण्यास परवानगी देण्यात येत असल्याचे नमूद करण्यात आले होते. तसेच, अशोकाच्या झाडाची जमिनीपासून ८ मीटर उंची ठेवून विस्तार कमी करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

अशा सूचना असतानाही सोसायटीचे अध्यक्ष मुकेश खेतान यांनी दिलेल्या परवानगीपेक्षा अधिक वृक्ष छाटणी केल्याचे समोर आले आहे. याविषयी सोसायटीमधील काही सदस्यांनी आक्षेप घेतला. याविषयी महापालिकेच्या ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयाकडे तक्रार केली. त्यानुसार, वृक्ष प्राधिकरण अधिकाऱ्यांनी सोसायटीमध्ये पाहणी केली. यावेळी ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा अधिक वृक्ष छाटणी केल्याचे समोर आले. खेतान यांनी त्यांच्या घराच्या लगतचे जांभळाचे झाड दिलेल्या परवानगीपेक्षा अधिक कापले. या वृक्षाच्या केवळ ४ – ५ फांद्या छाटण्यास परवानगी दिलेली असताना त्यांनी झाडच पूर्णपणे कापून टाकले. अवघ्या काही फुटांचे झाड शिल्लक ठेवले. झाडांची ऊंची कमी केल्यावर घरासमोर पत्र्याचे शेडही उभारले. ही बाब लक्षात येताच वृक्ष प्राधिकरण (ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालय) विभागाने खेतान यांना नोटीस बजावली आहे.

 याविषयी ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयाचे वृक्ष प्राधिकरण अधिकारी ज्ञानेश्वर बलकवडे यांनी ‘सीविक मिरर’शी बोलताना सांगितले की, सोसायटी अध्यक्षांनी बेकायदा वृक्षतोड केल्याचे निदर्शनास आले आहे. दिलेल्या परवानगीपेक्षा अधिक वृक्ष छाटणी करण्यात आली आहे. पालिकेने केवळ धोकादायक फांद्या व वृक्षांचा विस्तार काढण्यास परवानगी दिली होती. त्यापेक्षा अधिक झाड कापण्यात आले. झाडाची उंची मोठ्या प्रमाणावर कमी करण्यात आली आहे. जमिनीपासून अवघे सहा फुटांचे झाड ठेवण्यात आले आहे. याविषयी आम्ही नोटीस बजावली असून दहा दिवसांत खुलासा करण्यासंदर्भात कळवण्यात आले आहे. खुलासा न आल्यास पुन्हा दुसरी नोटीस बजावली जाईल. त्यालाही उत्तर न मिळाल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल असे बलकवडे यांनी सांगितले.

 याविषयी सोसायटीमधील रहिवासी रोम्मेल जोसेफ साळवे यांनी सांगितले की, सोसायटी अध्यक्षांनी स्वत:च्या अधिकारांचा गैरवापर करीत बेकायदेशीर पद्धतीने वृक्षतोड केली आहे. महापालिकेने दिलेल्या परवानगीपेक्षा अधिक झाड तोडण्यात आले. जांभळाचे चांगल्या स्थितीतील झाड तोडल्यामुळे सोसायटी सदस्यांना वाईट वाटले. झाडे ही संपत्ती आहे. झाडांचे संगोपन केले जाणे आवश्यक आहे. मात्र, त्याची अशी छाटणी करणे म्हणजे एक प्रकारची क्रूरताच असल्याचे साळवे म्हणाले.  

 या संदर्भात सोसायटीचे अध्यक्ष मुकेश खेतान यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की माझ्यावर लावण्यात आलेले आरोप बिनबुडाचे आणि असत्य आहेत. मी राजकीय पदाधिकारी असल्याने माझ्यावर खोटे आरोप केले जात आहेत. माझ्या घरावर एक ज्येष्ठ नागरिक दाम्पत्य राहण्यास आहे. या झाडाच्या फांद्या त्यांच्या घरापर्यंत गेल्या होत्या. त्यांच्या खिडकीमधून त्या आत जाऊ लागल्या होत्या. त्यांच्या घरात पुरेसा प्रकाश आणि वारे येत नव्हते, त्यामुळे त्यांनी सोसायटीकडे अर्ज केला होता. त्यानुसार, २०२२, २०२३ आणि २०२४ असे तीन वर्ष आम्ही पालिकेकडे वृक्ष छाटणी करण्यासाठी परवानगी मागत होतो. ती मिळाल्यानंतर आम्ही हे झाड छाटले आहे. ते पूर्णपणे तोडलेले नाही. या झाडाला पुन्हा फांद्या येऊ लागल्या आहेत. वृद्ध दाम्पत्याला मदत करण्यासाठी ही वृक्ष छाटणी केली होती. त्यावरून खोटे आरोप करणे चुकीचे असल्याचे खेतान यांनी सांगितले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest