Pune Ganeshotsav 2024: बाप्पाला उत्साहात भावपूर्ण निरोप; तब्बल ३० तासांनी संपली गणेश विसर्जन मिरवणूक

पुणे: सनई-चौघड्याचे वादन, श्री गणेशाच्या स्वागतासाठी घातलेल्या नेत्रदिपक पायघड्या, ढोल-ताशांचा गजर, बँडपथकाचे सुश्राव्य वादन आणि सोबतीला पुणेकरांच्या अजोड उत्साहात, आनंदात वैभवशाली गणेश विसर्जन मिरवणूक पार पडली.

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

२०२२ चा ३१ तासांचा विक्रम अबाधित

पुणे: सनई-चौघड्याचे वादन, श्री गणेशाच्या स्वागतासाठी घातलेल्या नेत्रदिपक पायघड्या, ढोल-ताशांचा गजर, बँडपथकाचे सुश्राव्य वादन आणि सोबतीला पुणेकरांच्या अजोड उत्साहात, आनंदात वैभवशाली गणेश विसर्जन मिरवणूक पार पडली. पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते महात्मा फुले मंडईतील लोकमान्य टिळकांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन सुरु झालेली मिरवणूक तब्बल ३० तासांनी संपली आणि अवघ्या पुण्याने लाडक्या गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला. २०२२ मध्ये तब्बल ३१ तास चाललेल्या विसर्जन मिरवणुकीचा विक्रम मात्र  अबाधित राहिला.  

वैभवशाली परंपरा असलेल्या गणपती विसर्जन मिरवणुकीला गुरुवारी सकाळी १० वाजून १५ मिनिटांनी सुरुवात झाली ती मानाचा पहिला असलेला कसबा गणपतीच्या पारंपरिक पालखीमधील मिरवणुकीने. कसबा गणपतीचे विसर्जन मंगळवारी ४ वाजून ३५ मिनिटांनी झाले. दुसरा मानाचा गणपती तांबडी जोगेश्वरीचे विसर्जन ५ वाजून १० मिनिटांनी झाले. तिसरा मानाचा गणपती गुरुजी तालीमच्या बाप्पाचे ५ वाजून ४४ मिनिटांनी विसर्जन झाले. मानाचा चौथा गणपती तुळशीबाग मंडळाच्या बाप्पाचे विसर्जन ७ वाजून १५ मिनिटांनी झाले. मानाच्या पाचव्या केसरीवाडा गणपतीचे विसर्जन ७ वाजून ३८ मिनिटांनी झाले.

दरवर्षीप्रमाणे यंदाही वेळेत मानाच्या पाच गणपतींचे विसर्जन झाले. कसबा गणपतीची मिरवणूक लक्ष्मी रस्त्यावरील मुख्य मिरवणूक मार्गाने सकाळी दहा वाजता निघाली. दुपारी ४.३५ वाजता गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. यंदा मंडळाच्या मिरवणुकीत प्रभात बँडपथक, कामायनी प्रशाला आणि बँक ऑफ इंडियाचे पथक होते. मानाच्या गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर  हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या बाप्पाच्या मिरवणुकीला सुरुवात झाली. बेलबाग चौकातून भाऊसाहेब रंगारी गणपती बुधवारी पहाटे ४ वाजून २३ मिनिटांनी निघाला. त्यानंतर सकाळी ८.०६ वाजता मिरवणूक संपली. त्यापाठोपाठ अखिल मंडई मंडळासह हुतात्मा बाबू गेनू गणपती मंडळ, श्री जिलब्या मारुती गणपती मंडळ ट्रस्ट ही पुण्यातील प्रमुख गणपती मंडळे नियोजित वेळेत मिरवणुकीत सहभागी झाली होती. 

मानाच्या गणपतींचे विसर्जन झाल्यानंतर इतर मंडळांनाही मिरवणुकीत वेळेत सहभागी होता येईल, असे वाटले होते. परंतु, ढोल पथकांनी दिलेल्या वेळेपेक्षा अधिक वेळ घेतला. त्यामुळे मंडळांच्या मिरवणूका पुढे सरकण्यास वेळ लागत लागला. मानाची मंडळे मार्गस्थ झाल्यानंतर सायंकाळनंतर ध्वनिवर्धकांचा दणदणाट सुरू झाला. सदाशिव पेठ, नारायण पेठ, शनिवार पेठ, शुक्रवार पेठेतील छोटे रस्ते बांबुचे अडथळे उभे करून वाहतुकीसाठी बंद केले होते.  

शहराच्या चार मुख्य मिरवणुकीत एकूण ४५२ गणेश मंडळे सहभागी झाली होती. तसेच खडकी, लष्कर, येरवडा, कर्वेरस्ता, दत्तवाडी व शहराच्या इतर भागात विसर्जन मिरवणुका पार पडल्या. त्यामध्ये ३ हजार ७६३ सार्वजनिक आणि १० लाख १४ हजार ६३७ घरगुती गणेश मूर्तीचे विसर्जन केले.

दगडूशेठ गणपतीने यंदाही पाळली वेळ
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाच्या बाप्पाची विसर्जन मिरवणूक दुपारी ४.३५ वाजता बेलबाग चौकातून पुढे निघाली. नियोजित वेळेनुसार दुपारी चार वाजता दगडूशेठ गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात झाल्यामुळे भाविकांचा उत्साह चांगलाच वाढला होता.टिळक चौकात दगडूशेठ गणपतीचे आगमन होणार असे जाहीर करताच भक्तांनी एकच श्वास रोखून धरला होता. जसे गणाधीश रथाचे दर्शन होताच भक्तांनी जल्लोष केला. गणपती बाप्पा मोरया.. मंगलमुर्ती मोरया..या जय घोषाने टिळक चौक चौक दणाणून गेला. ८ वाजून ५६ वाजता गणपतीचे पांचाळेश्वर मंदिर घाटावर विसर्जन करण्यात आले. दगडूशेठ गणपतीने यंदाही वेळ पाळल्याने भक्तांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे कौतुक केले.

मिरवणुकीत सहभागी मंडळे
लक्ष्मी रस्ता- १३१
टिळक रस्ता - १७०
कुमठेकर रस्ता - ५४
केळकर रस्ता - ९७
एकूण - ४५२

गेल्या काही वर्षांतील मिरवणुकीसाठी लागलेला वेळ
२०१६ : २८ तास ३० मिनिट
२०१७  : २८ तास ०५ मिनिट
२०१८  : २७ तास १५ मिनिट
२०१९  : २४ तास

२०२० आणि २०२१ : कोरोनामुळे मिरवणूक नाही
२०२२ : ३१ तास
२०२३ : २८ तास ४० मि.
२०२४: ३० तास

मानाच्या गणपतीच्या विसर्जनाची वेळ
श्री कसबा गणपती  दु. ४.३५
श्री तांबडी जोगेश्‍वरी मंडळ. सायं. ५.१०
श्री गुरुजी तालीम मंडळ सायं. ५.४४
श्री तुळशीबाग गणेशोत्सव मंडळ सायं. ७.१५
श्री केसरीवाडा मंडळ  सायं. ७.३८

आजीबाई थिरकल्या
सकाळी सहा वाजता डिजे वाजवण्यास पोलिसांनी मज्जाव केल्याच्या नाट्यानंतर टिळक रस्त्यावर मिरवणूक दणक्यात सुरु झाली. रात्रभरानंतर सकाळीही तेवढाच उत्साह तरुणांमध्ये दिसून येत होत. त्यात एक आजीबाईंनी गाण्याच्या ठेक्यावर चांगलाच ताल धरला होता. आजीबाई थिरकत असल्याचे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पाहिले अन् थेट त्यांना ट्रॅक्टरवर चढून नाचण्याची विनंती केली. पोरांच्या हट्टाला आजीबाईने होकार देत थेट ट्रॅक्टरवर एन्ट्री घेत 'तुम तो धोकेबाज हो, वादा कर के भूल जाते हो' गाण्यावर ठेका धरला. त्यांच्या नृत्याचा व्हीडीओ दिवसभर सोशल माध्यमावर धुमाकुळ घालत होता.  

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest