मेट्रोवरून राजकारण तापलं; पुण्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांचं आंदोलन

पुणे मेट्रोचा महत्त्वाचा टप्पा शिवाजीनगर जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या भुयारी मार्गाचे गुरुवारी (26 सप्टेंबर) लोकार्पण होणार होते. तसेच स्वारगेट ते कात्रज या विस्तारीत भुयारी मार्गाचे भूमिपूजन देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार होते.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Yogesh Sangale
  • Fri, 27 Sep 2024
  • 01:22 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

पुणे मेट्रोचा महत्त्वाचा टप्पा शिवाजीनगर जिल्हा न्यायालय   ते  स्वारगेट  या भुयारी मार्गाचे गुरुवारी (26 सप्टेंबर) लोकार्पण होणार होते. तसेच स्वारगेट ते कात्रज या विस्तारीत भुयारी मार्गाचे  भूमिपूजन  देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते  होणार होते. हा कार्यक्रम  सर परशुराम भाऊ  महाविद्यालयाच्या मैदानावर होणार होता. मात्र  मुसळधार पावसामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा रद्द करण्यात आला. मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्याच्या हट्टापायी पुणे मेट्रोच्या शिवाजीनगर न्यायालय ते स्वारगेट या मार्गीकेचे लोकार्पण रखडलं. यामुळे भारतीय जनता पक्ष आणि महाविकास आघाडी यांच्यात मेट्रो उद्घाटनावरून राजकारण चांगलेच तापले आहे.

महाविकास आघाडीकडून आज शिवाजीनगर जिल्हा न्यायालय येथे मेट्रोचं उद्घाटन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी महाविकास आघाडीकडून आंदोलन करण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणाबाजी देखील झाली. आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी मेट्रो स्टेशनच्या आत घुसण्याचा प्रयत्न केला. काँग्रेस पक्षाचे आमदार रवींद्र धंगेकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, शिवसेना ठाकरे गटाचे शहराध्यक्ष संजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. तसेच यावेळी सत्ताधारी भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनाच्या ठिकाणी कोणताही अनुचित घटना घडू नये, म्हणून पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता.

शिवाजीनगर न्यायालय ते स्वारगेट मेट्रो मार्गिका अनेक दिवसांपासून लोकार्पणासाठी तयार आहे. पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण करण्याच्या हट्टापायी ही मेट्रो मार्गिका तयार असूनही जनतेसाठी खुली करण्यात आलेली नाही.  पावसाचे कारण देऊन पंतप्रधानांनी लोकार्पण सोहळा पुढे ढकलला आहे. जनतेच्या पैशातून निर्माण झालेली मेट्रो मार्गिका कोणा एका व्यक्तीच्या हट्टापायी वापराविना पडून राहणे योग्य नाही. हा जनतेच्या पैशांचा अपव्यय असल्याचं म्हणत महाविकास आघाडीने आज शिवाजीनगर जिल्हा न्यायालय येथे आंदोलन केलं. दरम्यान, पुणे मेट्रोचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत सोनवणे (प्रशासन व जनसंपर्क) यांनी 29 सप्टेंबरला जिल्हा न्यायालय-स्वारगेट मेट्रो सुरू होणार असल्याची माहिती दिली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest