Pune: डॉ. बिबेक देबराय यांचा गोखले संस्थेच्या कुलपतिपदाचा राजीनामा

पुणे: देशभर ख्याती असलेल्या गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेत कुलगुरू डॉ. अजित रानडे यांची निवड रदद् करण्याच्या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे. संस्थेचे नवनियुक्त कुलपती डॉ. बिबेक देबराय यांनीच पदाचा राजीनामा दिला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Sat, 28 Sep 2024
  • 01:35 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

कुलगुरू डॉ. अजित रानडे यांची निवड रद्द करण्याच्या प्रकरणाला नवे वळण

पुणे: देशभर ख्याती असलेल्या गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेत कुलगुरू डॉ. अजित रानडे यांची निवड रदद् करण्याच्या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे. संस्थेचे नवनियुक्त कुलपती डॉ. बिबेक देबराय यांनीच पदाचा राजीनामा दिला आहे.

डॉ. देबराय यांची गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेच्या कुलपतिपदी ५ जुलै रोजी नियुक्ती करण्यात आली होती. गोखले संस्थेच्या कुलगुरुपदासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) निश्चित केलेल्या निकषांची डॉ. अजित रानडे पूर्तता करत नसल्याच्या तक्रारीबाबत डॉ. देबराय यांनी सत्यशोधन समिती नियुक्त करून समितीच्या अहवालानुसार त्यांनी डॉ. रानडे यांना कुलगुरुपदावरून हटवण्याचा निर्णय घेतला. त्यावरून देशभरातील शिक्षण, संशोधन क्षेत्रात खळबळ उडाली. डॉ. देबराय यांच्या या निर्णयावर टीकेची झोड उठली होती. त्यानंतर डॉ. रानडे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून डॉ. देबराय यांच्या निर्णयाला आव्हान दिले. त्यावरील सुनावणीत न्यायालयाने ७ ऑक्टोबरपर्यंत डॉ. देबराय यांच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. 

या पार्श्वभूमीवर आता या वादाला नवे वळण मिळाले आहे. आता डॉ. देबराय यांनीच निकालाविरोधात नैतिक जबाबदारी घेत कुलपतिपदाचा राजीनामा दिला आहे. या बाबत गोखले संस्थेकडूनही दुजोरा देण्यात आला आहे. राजीनामापत्रात नमूद केल्याप्रमाणे, कुलगुरुपदावरून हटवण्याच्या विरोधात डॉक्टर अजित रानडे यांनी हायकोर्टात धाव घेतली होती. हायकोर्टामध्ये दाखल केलेल्या याचिकेमध्ये रानडे यांनी त्यांना पदावरून हटवताना देबराय यांनी विवेकाचा वापर केला नसल्याचे म्हटलं होतं. त्यावर नाराजी व्यक्त करत,  मला या पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही, असं म्हणत देबराय यांनी राजीनामा दिला. ⁠मी तत्काळ प्रभावाने कुलपतिपदाचा कार्यभार सोडत असल्याचं देबराय यांनी राजीनामापत्रात म्हटलं आहे. ⁠तसेच गोखले इन्स्टिट्यूटच्या होणाऱ्या पदवी प्रदान समारंभालाही देबराय उपस्थित राहणार नाहीत असं त्यांनी राजीनामापत्रात म्हटलं आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest