पुणे: नामांकित महाविद्यालयातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार, अभाविपची आक्रमक निदर्शने
पुणे: शहरातील एका नामांकित महाविद्यालयातील अत्याचाराचे आणि महिला सुरक्षा विषय संदर्भातले एक प्रकरण 26 सप्टेंबर 2024 ला उघडकीस आले. या महाविद्यालयातील एका अल्पवयीन मुलीवरती चार अल्पवयीन मुलांनी अत्याचार केल्याची घटना घडली. महाविद्यालयातील स्वच्छतागृहात तिच्यावरती अत्याचार करून त्याचे व्हिडिओ चित्रण करून त्या व्हिडिओद्वारे अनेक वेळेला तिच्यावर बळजबरी करण्यात आली.
या घटनेच्या निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने तीव्र स्वरूपाचे आंदोलन संबंधित महाविद्यालयात केले. दोषींच्या विरोधात पोलीस प्रशासनाने कारवाई केलेलीच आहे. परंतु महाविद्यालय प्रशासनाने हे प्रकरण हलक्यात घेतले. त्याच्या निषेधार्थ अभाविपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. त्याचे निवेदन पुणे पोलीस आयुक्तालय येथे देण्यात आले आहे. यावेळी या महाविद्यालयाला दिलेल्या निवेदनात अभाविपने विविध मागण्या केलेल्या आहेत. ज्यामध्ये विद्यार्थिनी सुरक्षेसाठी विविध कार्यक्रम-उपक्रम घेण्यात यावे, त्याचबरोबर महाविद्यालयाची सुरक्षा ही वाढवण्यात यावी, आणि महाविद्यालय परिसरात सीसीटीव्ही लावून निगराणी ठेवण्यात यावी अशा मागण्या केल्या आहेत.
"पोलीस प्रशासनामुळे समाज माध्यमांमार्फत ही घटना सर्वांपर्यंत पोहोचली. परंतु ही घटना दाबून ठेवण्यासाठी आणि उघडकीस न येण्यासाठी संस्थाचालक, प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अनेक प्रकारचे प्रयत्न केले. व पीडीतेला आणि तिच्या घरच्यांना धमकावण्याचे प्रयत्न यांनी केले. त्यामुळे या प्रकरणात सामील असणाऱ्या प्रत्येक दोषीची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. व संबंधित दोषींचे निलंबन होण्यासाठी अभाविप काम करेल" असे मत पुणे महानगरमंत्री हर्षवर्धन हरपुडे यांनी व्यक्त केले.