Savitribai Phule Pune University: पीआरएन ब्लॉक विद्यार्थ्यांना मिळणार केवळ वर्षाची संधी

सत्र पूर्ततेनंतर पर्मनंट रजिस्टर नंबर (पीआरएन) क्रमांक ब्लॉक केलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा एक परीक्षेची संधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ॲकेडॅमिक कौन्सिलने नुकताच घेतला आहे. मात्र, या निर्णयाचा लाभ नेमका कोणाला होणार याबाबत स्पष्टता नाही.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Sat, 28 Sep 2024
  • 01:20 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

केवळ अंतिम वर्ष आणि अंतिम पूर्व वर्षाच्या विद्यार्थ्यांनाच मिळणार संधी

सत्र पूर्ततेनंतर पर्मनंट रजिस्टर नंबर (पीआरएन) क्रमांक ब्लॉक केलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा एक परीक्षेची संधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ॲकेडॅमिक कौन्सिलने नुकताच घेतला आहे. मात्र, या निर्णयाचा लाभ नेमका कोणाला होणार याबाबत स्पष्टता नाही.

विद्यापीठाने या संदर्भातील परिपत्रक प्रसिद्ध केले असून बॅकलॉगचे विषय राहिलेल्या विद्यार्थ्यांना एका वर्षाची संधी दिली आहे. त्यातही केवळ अंतिम वर्ष आणि अंतिम पूर्व वर्षातील ज्या विद्यार्थ्यांचे बॅकलॉगचे विषय राहिले आहेत, अशाच विद्यार्थ्यांना हा निर्णय लागू असणार आहे, असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे दोन वर्षांपेक्षा जास्त बॅकलॉग असणाऱ्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी असणार नाही.

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमावलीनुसार विद्यार्थ्यांना ठराविक वर्षात पदवी अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो, परंतु त्यात एनप्लस टुप्लस वन या निकषानुसार विद्यार्थ्यांना परीक्षेची संधी दिली आहे. ज्या विद्यार्थ्यांचे बॅकलॉग असतील अशाच विद्यार्थ्यांना ही संधी उपलब्ध असेल. ही संधी नवीन किंवा पुनर्प्रवेशित विद्यार्थ्यांना कोणत्याही परिस्थितीत असणार नाही. ही संधी फक्त शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मधील दोन्ही सत्रामध्ये परीक्षेत प्रविष्ट होण्यास लागू राहील. या नियमानुसार विद्यार्थ्यांना हिवाळी सत्र २०२४  व उन्हाळी सत्र २०२५  या परीक्षा विद्यार्थ्यांना देता येतील.

अंतिम वर्षाची परीक्षा दिलेले आणि बॅकलॉग असलेल्या तसेच अंतिम परीक्षा दिली आहे आणि अंतिम पूर्व वर्षातील बॅकलॉग असलेल्या विद्यार्थ्यांनाही ही संधी उपलब्ध असेल. हा लाभ ज्यांना होत नाही, अशा पात्र विद्यार्थ्यांना विशेष बाब म्हणून संधी मिळण्यासाठी संबंधित महाविद्यालयाकडे सर्व उपलब्ध व वैध कागदपत्रांसह अर्ज सादर करावे लागतील, असे परिपत्रकात नमूद केले आहे.

विद्यार्थ्यांना नियमित अभ्यासक्रमाच्या पॅटर्ननुसार समकक्ष विषय विचारात घेऊन परीक्षेसाठी प्रविष्ट व्हावे लागेल. वार्षिक पॅटर्नप्रमाणे जुन्या  अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी सेमिस्टर पॅटर्ननुसार एका विषयास दोन समकक्ष विषय विचारात घेऊन परीक्षेसाठी प्रविष्ट व्हावे. ज्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी विशेष संधी उपलब्ध करून दिली जात आहे, त्यांना पुढील काळात कोणत्याही प्रकारची संधी दिली जाणार नाही.

पीआरएन संदर्भात विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन पातळीवर मार्गदर्शन व समुपदेशन करण्यासाठी सर्व उपाययोजना कराव्यात. तसेच याबाबत एकही विद्यार्थी परीक्षा विभागात पाठविण्यात येऊ नये, याची काळजी घ्यावी. तसेच कागदोपत्री, अन्य कारणांमुळे विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये, याची जबाबदारी संबंधित महाविद्यालयांची राहील, असे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी म्हटले आहे.

पीआरएन ब्लॉक झालेल्या बॅकलॉग विद्यार्थ्यांचे परीक्षांचे परिपत्रक प्रसिध्द झाले आहे. विद्यार्थ्यांनी तत्काळ परीक्षा अर्ज भरावेत. विद्यापीठाने  ३० तारखेपर्यंत अर्ज जमा करण्यास मुदत दिली आहे.
- सागर वैद्य, सदस्य, मॅनेजमेंट कौन्सिल

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest