येथे भूतदया हा गुन्हा आहे...

कॅन्सर झालेल्या पाळीव श्वानाला घरापासून दूर का सोडून दिले, अशी विचारणा करणाऱ्या सॉफ्टवेअर इंजिनिअर तरूणीला घरात घुसून मारहाण करण्यात आली. दोन महिन्यांपूर्वी घडलेल्या या प्रकरणात तक्रार अर्जाच्या चौकशीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Rohit Athavale
  • Thu, 8 Jun 2023
  • 12:38 am
येथे भूतदया हा गुन्हा आहे...

येथे भूतदया हा गुन्हा आहे...

आजारी श्वानाला का सोडले, असे विचारणाऱ्या सॉफ्टवेअर इंजिनिअर तरूणीला घरात घुसून मारहाण

रोहित आठवले

rohit.athavale@civicmirror.in

TWEET@RohitA_mirror

कॅन्सर झालेल्या पाळीव श्वानाला घरापासून दूर का सोडून दिले, अशी विचारणा करणाऱ्या सॉफ्टवेअर इंजिनिअर तरूणीला घरात घुसून मारहाण करण्यात आली. दोन महिन्यांपूर्वी घडलेल्या या प्रकरणात तक्रार अर्जाच्या चौकशीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चिंचवडगावातील बिजलीनगर परिसरात ही घटना घडली. हनुमान कॉलनीत राहणाऱ्या ३० वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर तरूणीने याप्रकरणी फिर्याद दिली असून, वर्षा तिकोणे, स्मिता तिकोणे या दोन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वर्षा तिकोणे यांचे पती कुंदन तिकोणे यांच्या पाळीव श्वानाला कॅन्सर झाला होता. त्यामुळे त्यांनीन्या श्वानाला घराबाहेर दूर नेऊन सोडले होते. यावरून संबंधित तक्रारदार तरुणी, कुंदन तिकोणे यांना उद्देशून ‘‘तुमच्या मुलाला असे काही झाले असते तर तुम्ही काय केले असते,’’ असे बोलली होती.

अशा प्रकारच्या प्रश्नाने चिडलेल्या वर्षा तिकोणे आणि तिची जाऊ स्मिता तिकोणे यांनी ५ एप्रिल २०२३ या दिवशी तक्रारदार तरुणीच्या घरात घुसून तिला शिवीगाळ करीत हाताने मारहाण केली. तसेच ‘‘परत आमच्या नादी लागलीस तर तुला बघून घेईन,’’ अशी दमदाटी केली होती. या घटनेनंतर तक्रारदार तरुणीने चिंचवड पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला होता. या अर्जाची चौकशी केल्यानंतर चिंचवड पोलिसांनी तिकोणेंवर गुन्हा दाखल केला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात भटक्या आणि पाळीव श्वानांना खायला घालण्यावरून आणि त्यांना सोसायटीच्या आवारात राहण्यास जागा देण्यावरून गेल्या सहा महिन्यात पाचपेक्षा जास्त गुन्हे दाखल झाले आहेत. श्वानांवरून हाणामारी, विनयभंग असे प्रकार आता वाढू लागले आहे. विशेषत:, पिंपळे सौदागर, वाकड, रहाटणी, चिंचवड अशा उच्च मध्यमवर्गीय भागात या प्रकारच्या वाढत्या घटनांमुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.

महापालिकेकडून करण्यात येणाऱ्या भटक्या श्वानांच्या नसबंदीच्या आरोपावरून सत्ताधारी-विरोधक आमने-सामने उभे ठाकले आहेत. शहरात दिवसाला किमान ५ जणांना श्वानाने दंश केल्याच्या घटना उघड होत असून, महापालिकेच्या वायसीएम हॉस्पिटलमध्ये यासाठी उपचाराला गर्दी होत असते. दुसरीकडे भटक्या आणि 

पाळीव श्वानांना खायला घालण्यावरून, त्यांना फिरायला नेण्यावरून वाद वाढत आहेत.

गेल्या वर्षभरात पिंपरी-चिंचवड शहरात १२ हजार ५७६ जणांनी श्वानाने दंश केला म्हणून महापालिकेच्या विविध रुग्णालयात जाऊन उपचार घेतले आहेत. या विरोधाभासामुळे शहरात यापूर्वीही आरोप झालेली श्वान

 नसबंदी आणि महापालिकेचे नियोजन हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चिला जात आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest