संग्रहित छायाचित्र
कारागृह विश्वाबद्दल सामान्यांना उत्सुकता असते. अनेकांना चित्रपटात दाखवतात त्याप्रमाणे येथील विश्व असल्याचे वाटते. मात्र, जे कारागृहात जातात, त्यांना खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याचे मुल्य कळते. ब्रिटीशकालीन कारागृहाचे स्वरूप आता बदलत असले तरी येथील दैनंदिन व्यवहारावर ब्रिटीश प्रभाव आहे. कारागृहातील कैद्यांची ‘सुधारणा व पुनर्वसन’ हे केवळ पाच ते दहा टक्केच (खुल्या कारागृहातील) कैद्यांपर्यंतच मर्यादित आहे. मात्र, राज्यातील मध्यवर्ती कारागृहातील परिस्थिती भयावह आहे. अशा कारागृहात कैद्यांचे मानसिक, शारीरिक, आर्थिक शोषण होते. त्यामुळे कैदी कारागृहात टोळीने राहतात. अशा टोळ्यांचा कारागृहात दबदबा असतो. या टोळ्या काही वेळा कारागृहात वर्चस्व तयार करण्यासाठी भांडण-तंटे करतात. ज्यांच्याकडे पैसा आहे, अशा कैद्यांना कारागृहात सर्व सोई-सुविधा मिळतात. जे गरीब आहेत त्यांना कारागृह म्हणजे नरक यातना आहे. अशा या जगप्रसिद्ध येरवडा मध्यवर्ती कारागृहाचा (Yerwada Jail) घेतलेला वेध.
येरवडा मध्यवर्ती कारागृहाची एकूण कैदी क्षमता २,३२३ आहे. मात्र, कारागृहात तिपटीपेक्षा अधिक कैदी असून त्यांची संख्या ७ हजारांपर्यंत जाते. कारागृहातील सर्कल एक, तीन आणि टिळक यार्डात प्रत्येकी आठ बराकी, सर्कल दोनमध्ये सहा बराकी तर किशोर विभागात तीन बराकी आहेत. यासह अंडासेल, फाशीची शिक्षा सुनावलेले कैदी, रुग्ण कैदी, ज्येष्ठ नागरिक कैदी, विदेशी कैदी अशांना दाटीवाटीने विविध बाराकींमध्ये ठेवले आहे. यातील जवळपास सत्तर टक्के कच्चे कैदी आहेत. त्यामुळे कच्च्या कैद्यांची संख्या विचारात घेता येरवडा कारागृहातील कैद्यांना दाटीवाटीने रहावे लागत आहे. बराकीमध्ये जागा नसल्यामुळे कैदी बराकीच्या बाहेरील व्हरांड्यात झोपत असल्याचेही पाहायला मिळते.
कैद्यांना ‘युनिक आयडेंटेटी कार्ड’
कारागृहात ज्यावेळी कैदी प्रवेश करतात, तेव्हा त्यांना एक ‘युनिक आयडेंटेटी कार्ड ’ मिळते. त्यावर सहा ते सात अंकी क्रमांक असतो. चित्रपटात कैद्यांना जसे ७८६ किंवा १११ क्रमांक दाखविले जातात, तसेच आता संगणकीकृत बारकोड असलेले क्रमांक दिले जातात. कैद्याने हे कार्ड हरवायचे नाही. कारण कैद्यांना न्यायालयीन कामकाजासाठी, कारागृहातील वास्तव्य, मनीऑर्डर , नातेवाईकांना भेटण्यासाठी, कँटीनमध्ये काही वस्तू खरेदी करण्यासाठी या कार्डचा वापर होतो. कार्ड नसेल तर कैद्याला येथे जीवन जगणे अवघड आहे.
कारागृहाचे भव्य प्रवेशव्दार
येरवडा मध्यवर्ती कारागृहाला ब्रिटीशकालीन तीस फुटी दगडी तटबंदी आहे. दोन दशकापूर्वी या दगडी तटबंदीशेजारी सिमेंट कॉंक्रिटची चाळीस फुटी तटबंदी उभारली आहे. त्यामुळे दोन उत्तुंगभिंती ओलांडून कैद्याने पळून जाणे अशक्यप्राय आहे. भव्य प्रवेशव्दार बघून कैद्याला धडकी भरली नाही तर नवलच म्हणावे लागेल. प्रवेश करण्यासाठी एक भलेमोठे प्रवेशव्दार व एकच जण आत किंवा बाहेर जाऊ शकेल असे लहान प्रवेशव्दार आहे. या लहान प्रवेशव्दारातून कैदी, तुरूंग रक्षक, वकिल काही वेळा कार्यक्रम असल्यास पत्रकारांना ये-जा करता येते. केंद्र व राज्यातील मंत्री, गृह सचिव, न्यायाधिश, कारागृह अधिक्षकांपासून ते तुरूंग महानिरीक्षक आले तरच मुख्य प्रवेशव्दार काही क्षणासाठी उघडला जातो. लहान प्रवेशव्दारातून कैद्यांची प्रवेश झाल्यास त्यांची कसून तपासणी केली जाते. या तपासणीत एखाद्या कैद्याला टाचणी सुद्धा आत घेऊन जाता येत नाही. विदेशातील कारागृहाप्रमाणे बॉडी स्कॅनर हा प्रकार अजून येथे बसविण्यात आलेला नाही. त्यामुळे पारंपारिकपणे कैद्यांना विवस्त्रकरून तपासणी केली जाते. याठिकाणी लोकशाहीतील व्यक्ती सन्मान हे कलम कैद्यांना लागू होत नसावे, अशी धारणा कारागृह प्रशासनाची असते. कारागृहाला दोन भव्य प्रवेशव्दार आहेत. बाहेरील व आतील प्रवेशव्दाराच्या दरम्यानच्या जागेत कैद्यांची तपासणी होते. त्यामुळे एकाच वेळी अनेक कैदी आल्यास ही तपसणी रात्री उशीरापर्यंत होत असते. त्यानंतर दुसऱ्या प्रवेशव्दारातून कारागृहाच्या तीस बराकींपैकी एका बराकीत कैद्याला प्रवेश मिळतो.
कैद्यांचा बराकीत प्रवेश
कैदी बराकीत प्रवेश करताच त्याला झोपण्यासाठी शौचालयजवळ जागा मिळते. या ठिकाणी असलेल्या प्रचंड दुर्गंधीची सवय कैद्याला करून घ्यावी लागते. कैद्याने कोणता गुन्हा केला आहे, हे कारागृहातील इतर कैद्यांना लगेच समजते. यामध्ये एखादा बलात्काराच्या गुन्ह्यात कारागृहात आला तर इतर कैदी त्याचे भव्य स्वागत करतात. हे स्वागत म्हणजे जबर मारहाण असते. त्याला उठता-बसता कैदी मारतात. एका बराकीत १२० कैदी क्षमता आहे.
मात्र, येरवडा कारागृहात एका बराकीमध्ये दुप्पट ते तिप्पट कैदी ठेवले जातात. येथून आता खऱ्या अर्थाने भ्रष्टाचाराची सुरवात होते. दुर्गंधीमुक्त जागेत झोपण्यासाठी महिन्याला पाच ते सहा हजार रूपयांची मागणी केली जाते. ज्यांच्याकडे पैसे आहेत, तो एक ते दोन दिवसात पैसे देऊन चांगली जागा मिळवतो. ज्यांना शक्य नाही त्यांना काही महिने तर काहींना काही वर्षे वाट पहावी लागते. कारण कारागृहातील कच्चे कैदी जामिनीवर सुटल्यानंतर ते आपोआप पुढे शौचालयापासून पुढे पुढे सरकत जातात. नविन आलेल्या कैद्याचा मुक्काम प्रथम शौचालयाजवळ असतो. (क्रमश:)