पुणे: तृतीयपंथी सुरक्षा रक्षकाला मारहाण करणाऱ्या हल्लेखोर उपअभियंत्याला वाचविण्यासाठी बड्यांची धावाधाव!

महापालिकेत प्रवेश करताना ओळखपत्र न दाखवात वाद घातला, तसेच बाहेरच्या गेटमधून जाण्यास सांगितल्याच्या रागातून एका उपअभियंत्याने तृतीय पंथीय सुरक्षा रक्षकाला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

तृतीयपंथी सुरक्षा रक्षकाला मारहाण करणाऱ्या हल्लेखोर उपअभियंत्याला वाचविण्यासाठी बड्यांची धावाधाव!

दबाव झुगारून शिवाजी नगर पोलीस ठाण्यात तक्रार

महापालिकेत (Pune Municipal Corporation) प्रवेश करताना ओळखपत्र न दाखवात वाद घातला, तसेच  बाहेरच्या गेटमधून जाण्यास सांगितल्याच्या रागातून एका उपअभियंत्याने तृतीय पंथीय सुरक्षा रक्षकाला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उपअभियंत्याच्या विरोधात सुरक्षा रक्षकाने पोलीसांकडे तक्रार केली असली तरी महापालिका प्रशासनाने अद्याप कोणतीही कारवाई केलेली नसून त्याला वाचवण्यासाठी अभियंता संघटना, वरिष्ठ अधिकाऱ्यांसह बड्या राजकीय नेत्यांनी धावाधाव सुरु असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘सीविक मिरर’ ला दिली.

सेजल बलोल्ली (वय ३२, रा. रामटेकडी, हडपसर) या तृतीय पंथीय सुरक्षा रक्षकाने शिवाजी नगर पोलीस ठाण्यात (Shivajinagar  Police Station) तक्रार दिली आहे. महापालिकेत प्रवेश करताना कर्मचाऱ्यांना ओळखपत्र दाखविणे आवश्यक आहे.असून ओळखपत्र नसेल तर नोंदवहीत नोंद करुन प्रवेश दिला जातो. नगर रोड क्षेत्रीय कार्यालयातील ललीत बोडे नावाचा एक उपअभियंता महापालिकेत कामासाठी आला होता. त्याच्याकडे तृतीय पंथीय सुरक्षा रक्षकाने ओळखपत्राची मागणी केली असता त्याला राग आला. मी पालिकेत गेल्या ३० वर्षांपासून काम करतो आहे. मला ओळखत नाही का असे म्हणत गोंधळ घालण्यास सुरवात केली. त्यानंतर तो नोंदवहीत नोंद न करता आत गेला. काम संपवून बाहेर पडण्यासाठी त्याच गेटवर आला. त्यावेळी सुरक्षा रक्षकाने त्याला बाहेर पडणाऱ्या गेटने जाण्यास सांगितले असता, त्यांने मारहाण करण्यास सुरवात केली. मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या दोन तृतीय पंथीय सुरक्षारक्षकांनाही मारहाण केली, शिवीगाळ केली, गोंधळ घातला. त्यानंतर सुरक्षा रक्षक, कर्मचाऱ्यांनी उपअभियंत्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र तो ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने सुरक्षा रक्षकाने शिवाजी नगर पोलीस ठाण्यात धाव घेतली.

पोलीसात तक्रार दाखल करु नये म्हणून सुरक्षा विभागावर अभियंता संघटनेने तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दबाव टाकला आहे. तसेच एका सत्ताधारी पक्षातील बड्या राजकीय नेत्याने मध्यस्थी केल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली. मात्र, तृतीयपंथीय संघटनांनी तक्रार अर्ज दाखल केला. सुरक्षा विभागाला अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी पी यांनी घटनेचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सुरक्षा विभागाने अहवाल सादर केला  असून त्यावर अतिरिक्त आयुक्त काय निर्णय घेतात त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विद्युत प्रमुखांनाही मारहाण

उपअभियंता ललीत बोडे यांने वाद घालून नवी पेठेतील वैकुंठ स्मशान भूमित काही वर्षांपूर्वी विद्युत विभागप्रमुखांनाही मारहाण केली होती. तत्कालीन आयुक्त विक्रम कुमार यांनी त्याच्यावर कारवाईचा बडगा उगारत निलंबनाची कारवाई केली होती. त्याला दोन महिन्यांपूर्वी पुन्हा सेवेत घेण्यात आले असून नगर रोड क्षेत्रीय कार्यालयात उपअभियंता पदावर नियुक्ती दिली आहे.तो महापालिकेच्या आवारात वारंवार वाद घालत असतो. असे एका अधिकाऱ्याने सांगितले. अशा वादग्रस्त व्यक्तीमुळे महापालिकची बदनामी होत असल्याने त्याला सेवेतून कायमचे बडतर्फे करण्याची मागणी आता कर्मचारी, अधिकाऱ्यांमधून होत आहे.

तृतीय पंथीयांचा पालिकेकडून सन्मान

तृतीय पंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला होता. त्यानुसार त्यांना पालिकेच्या सेवेत सहभागी करून घेतले. सुरक्षा विभागात ते सुरक्षा रक्षक म्हणून रुजू झाले आहेत. सुरक्षा रक्षक म्हणून काम करताना त्यांनी वेगळी छाप निर्माण केली आहे. त्यांच्यामुळे इतर तृतीयपंथीयही मुख्य प्रवाहात येऊ इच्छित आहे. त्यांचे मनोबल वाढलेले असताना एका महापालिकेच्याच कर्मचाऱ्याने मारहाण करणे योग्य नसल्याची चर्चा रंगली आहे. तृतीय पंथीय सुरक्षा रक्षकाला मारहाण केल्याने दोषी अभियंत्यावर कठोर शासन करण्याची मागणी केली जाऊ लागली आहे.

मारहाण केल्याप्रकरणी सुरक्षा रक्षकाने शिवाजी नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. अतिरिक्त आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार चौकशी अहवाल सादर केला आहे. त्यानंतर ते निर्णय घेतील त्यानुसार कार्यवाही केली जाईल. उपअभियंत्याला कोणीही अभय दिले नाही. सीसीटीव्ही फुटेज प्रसिध्द करता येणार नाही. वरिष्ठ अधिकारी त्यावर निर्णय घेतील.
- राकेश विटकर, सुरक्षा विभाग प्रमुख, पुणे महापालिका

तृतीय पंथीय सुरक्षा रक्षकाला मारहाण झाल्याने आम्ही महापालिकेचा निषेध नोंदवत आहोत. आयुक्तांकडे उपअभियंत्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. सुरक्षा रक्षकाला मारहाण केल्याने त्यांचीच सुरक्षा धोक्यात आली आहे. संबंधित अधिकाऱ्यावर कठोर कारवाई न झाल्यास पुढची दिशा ठरविली जाईल.
- कादंबरी, सामाजिक कार्यकर्त्या, मंगलमुखी चॅरिटेबल ट्रस्ट


तृतीय पंथीय संघटना म्हणतात...

  कर्तव्य बजावताना दोन सुरक्षा रक्षकांना मारहाण केल्याने अधिकाऱ्याला बडतर्फे करावे.

   तृतीय पंथीय संघटनांकडून महापालिकेचा निषेध

  महापालिका सुरक्षा रक्षकांची सुरक्षा करण्यास सक्षम आहे का ?

   संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करावा.

   तृतीय पंथीयांच्या तक्रार निवारणासाठी स्वतंत्र यंत्रणा सुरू करा.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest