औषध दरवाढीने कापला खिसा! किंमतीत सरासरी ४० टक्के वाढ

सर्वच औषधांच्या किंमतींमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्यामुळे रुग्णांना त्याची मोठी आर्थिक झळ बसत आहे. वाढत्या महागाईत औषधाचा खर्च परवेडानासा झाला आहे. अनेक औषधांच्या किंमती दुप्पटीहून अधिक वाढल्या आहेत.

संग्रहित छायाचित्र

निवडणूक रोख्यांच्या वसुलीसाठी दरवाढ झाल्याचा सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप, औषध उत्पादक कंपन्यांनी आरोप फेटाळले

सर्वच औषधांच्या किंमतींमध्ये (Drug Price) मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्यामुळे रुग्णांना त्याची मोठी आर्थिक झळ बसत आहे. वाढत्या महागाईत औषधाचा खर्च परवेडानासा झाला आहे. अनेक औषधांच्या किंमती दुप्पटीहून अधिक वाढल्या आहेत. औषध (फार्मा) कंपन्यांनी निवडणूक रोख्यांद्वारे राजकीय पक्षांना मोठा निधी दिल्याचे समोर आल्यावर हा खर्च रुग्णांच्या खिशातून तर वसूल केला जात नाही ना? असा आरोप सामाजिक कार्यकर्ते आणि वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करू लागले आहेत. मात्र, इंडियन ड्रग मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने (Indian Drug Manufacturers Association) हे आरोप फेटाळले आहे.

एका बाजुला औषध कंपन्या वाढलेल्या किंमतीला कोरोना साथ आणि चीनकडून कच्चा मालाच्या होणाऱ्या किंमतीत वाढ असल्याचे कारण सांगत आहेत. मात्र, निवडणूक रोख्यांचाच हा परिणाम असल्याचा आरोप केला जात आहे. प्रामुख्याने गेल्या वर्षभरात औषधांच्या किमतींमध्ये कमालीची वाढ झाल्याबद्दल वैद्यकीय कार्यकर्ते  गंभीर चिंता व्यक्त करत आहे. औषध किंमतीमध्ये सरासरी ४० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.  (Medicin Price Hike)

ज्येष्ठ सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ आणि जन आरोग्य अभियानचे प्रवक्ते अनंत फडके म्हणाले, बड्या औषध कंपन्यांकडून रुग्णांची पिळवणूक होत आहे. रुग्णाला दुसरा कोणता पर्याय नसल्यामुळे महागड्या किंमतीमधील औषध खरेदी करावीच लागतील, हे त्यांना माहित आहे. मात्र, त्यामुळे रुग्णांचा खिसा कापला जात आहे. याबाबत रुग्णांकडून मोठ्या प्रमाणावर तक्रारी येत आहेत. या गंभीर समस्येची माहिती आम्ही सरकारला दिली आहे. परंतु, त्यांच्याकडून काही केले जाईल का याबाबत साशंकताच आहे. 

इंडियन ड्रग मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने  मात्र हे आरोप फेटाळले आहे. औषध निर्माण उद्योगातील एका उद्योजकाने ‘ सीविक मिरर’शी बोलताना सांगितले की निवडणूक रोखे आणि औषधांच्या वाढलेल्या किंमतींचा काहीही काहीही संबंध नाही. हे आरोप पूर्णपणे निराधार आहेत. महागाईचा इतरांप्रमाणेच आमच्यावरही परिणाम झालेला आहे. 

जवळपास ८० टक्के औषध उत्पादक कंपन्यांचा समावेश असलेली देशातील सर्वात मोठी फार्मा संस्था इंडियन ड्रग्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयडीएमए) चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ विरांची शाह सीविक मिरर'शी बोलताना म्हणाले, "लोक औषध उत्पादक कंपन्यांना दोष देतात. मात्र, त्यांनी भाववाढीची कारणे समजून घेतली पाहिजेत. दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही वर्षातून केवळ एकदाच आणि तीही १० टक्के (4) वाढ करू शकतो. परंतु, रुग्ण करत असलेल्या दाव्यांप्रमाणे जर किमती वाढल्या असतील तर निश्चितच गैर आहे. किमतीमध्ये कोणी वाढ केली असेल तर त्याला दंडाला सामोरे जावे लागेल. मात्र, आमच्या माहितीप्रमाणे अशा प्रकारची वाढ कोणी केलेली नाही.

औषधांच्या वाढलेल्या किमतीचे कारण सांगताना शहा म्हणाले, औषध कंपन्यांचा कच्चा माल हा चीनमधून आयात होतो, चीनने या कच्चा मालाच्या किमती वाढविल्या आहेत. त्यामुळे काही प्रमाणात औषधे महाग झाली आहेत.

कोरोनाच्या काळात तर आम्हाला प्रचंड त्रास सहन करावा लागला. आम्ही कच्च्या मालासाठी पूर्णपणे चीनवर अवलंबून होतो. पॅरासिटामॉलची किमत कोरोनापूर्वी ३०० रुपये प्रति किलो होती. त्यावेळी आम्हाला ९०० ते १००० रुपये प्रति किलो दर द्यावा लागला. तरीही आम्ही लोकांचा विचार करून किंमतीत वाढ केली नाही. औषधांचे दर वाढले की कंपन्यांनाच दोषी ठरविले जाते. त्यामुळे सरकारने "ड्रग पार्क्स" (Drug parks) तयार करण्यासाठी मदत करावा. याठिकाणीच आम्हाला कच्चा मालही उपलब्ध व्हावा.

नाव न सांगण्याच्या अटीवर औषध उद्योगातील एक तज्ज्ञ म्हणाले, महागाईने आम्हासही जेरीस आणले आहे. कच्चा मालाच्याच किंमतीत वाढ झाली नाही तर विमानभाडे, उत्पादन खर्च, संशोधन आणि विकास यांचा खर्चही प्रचंड प्रमाणात वाढला आहे.

आणखी एका तज्ञाने सांगितले की, "औषध उत्पादन उद्योग पूर्णपणे चीनद्वारे नियंत्रित केला जात आहे. याचे कारण औषध तयार करण्यासाठी आवश्यक असलेली ८० टक्क्यांहून अधिक सामग्री चीनकडून आयात होते. आता कच्च्या मालाचे उत्पादन करण्यासाठी इन हाऊस सेंटर्समुळे आम्हाला चिनी बाजारपेठेवरील अवलंबित्व कमी करण्यात मदत होणार आहे. आमची स्वतःची औषधे देखील कमी किंमतीत विकता येतील.

चीनमधून मोठ्या प्रमाणात कच्च्या मालाची आयात थांबवण्यासाठी स्वतःची जागा उपलब्ध करून देण्याची विनंती औषध कंपन्यांनी केली आहे. औषध निरिक्षक पी. एम. पाटील म्हणाले, औषधांच्या किमती वाढल्या आहेत आणि त्याचे एक कारण म्हणजे, आमच्याकडे किंमती खरोखरच वाढल्या आहेत. केवळ २० टक्के औषधांच्या किमतीवरच सरकारचे नियंत्रण आहे. इतर कंपन्यांना दरवाढ करण्याची परवानगी आहे. मात्र, तरीही त्यांना १० टक्यांपेक्षा जास्त दरवाढ करता येऊ शकत नाही.

दोन हजारांचे औषध ४ हजारांला

थॅलेसेमिया रुग्ण जतिन सेजपाल यांना असुंन्रा ४०० एमजी ( asunra)  नावाचे जीवरक्षक औषध घेत आहेत, ते म्हणाले, “सहा महिन्यांपूर्वी माझ्या औषधाची किंमत सुमारे २ हजार रुपये होती. ती आता ४ हजार झाली आहे. मी आणि माझी पत्नी दोघेही असुन्रा आणि एक गोळी रोज घेतो. आता दर महिन्याला मी या औषधासाठी सुमारे ४० हजार रुपये खर्च करतो. ही खूप मोठी रक्कम आहे. हे औषध घेतले नाही तर गंभीर परिणाम उद‌्भवू शकतात. त्यामुळे कितीही महाग झाले तरी औषध घेतल्याशिवाय मला पर्याय नाही. 

औषधांच्या किमतीत झालेल्या  प्रचंड वाढीचा फटका आम्हालाही सहन करावा लागत आहे. सरकारने या समस्येकडे प्राधान्याने लक्ष द्यावे अशी आमची मागणी आहे. आम्ही या विषयावर औषध कंपन्यांशीही चर्चा करणार आहोत. किमान जीवरक्षक औषधे सर्वसामान्यांना परवडणारी असावीत असे आवाहन आम्ही करणार आहोत.
- डॉ. राजन संचेती, अध्यक्ष, इंडीयन मेडीकल असोसिएशन, पुणे

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest