पुणे: ऐन पाणी टंचाईत पाईप लाईन फुटली; दिवसाला ७ ते ८ लाख लिटर पाणी वाया

सारग बागेशेजारील श्री कांची शंकर मठ येथून लष्कर जलशुध्दीकरण प्रकल्पाला पाणीपुरवठा करणारी पाण्याची पाईप लाईन फुटली आहे. त्यामुळे दिवसाला सात ते आठ लाख लिटर पाणी वाया जात आहे.

संग्रहित छायाचित्र

पाईप लाईनचा पाणीपुरवठा बंद करण्याचा पर्याय शेवटचा

सारग बागेशेजारील श्री कांची शंकर मठ येथून लष्कर जलशुध्दीकरण प्रकल्पाला पाणीपुरवठा करणारी पाण्याची पाईप लाईन फुटली आहे. त्यामुळे दिवसाला सात ते आठ लाख लिटर पाणी वाया जात आहे. दोन दिवसांपासून पाणीपुरवठा विभागाकडून ही गळती बंद करण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. वरच्यावर गळती बंद झाली नाही तर या पाईप लाईनचा पाणीपुरवठा बंद करावा लागणार आहे. त्यामुळे शहराच्या पुर्वेकडील भागातील पाणीपुरवठा बंद राहण्याची चिन्हे आहेत

लष्कर जलशुध्दीकरण केंद्रामध्ये पाण्याचा पुरवठा करणारी पाईपलाईन सारगबागे शेजारील श्री कांची शंकर मठ जवळून जाते. ही पाईप लाईन लिकेज झाल्याची तक्रार महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे आली.  या पाईप लाईनमधून जाणाऱ्या पाण्याचे प्रेशर खूप अधिक आहे. त्यामुळे लिकेज झाल्याने लाखो लिटर पाणी दिवसाला वाया जात आहे. शहरावर पाणी संकट असल्याने लिकेज तातडीने बंद करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. पाण्याचे प्रेशर जास्त असल्याने लिकेज बंद करण्यात अडथळा येत आहे. लिकेज मोठे असल्याने वरच्या वर लिकेज बंद होत नाही. लिकेज बंद करण्यासाठी पाईपलाईनमधून होणारा पाणीपुवरठा बंद करणे हा शेवटचा पर्याय असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.पाणी पुरवठा बंद केल्यास शहराच्या पूर्व भागात पाण्याची समस्या निर्माण होण्याची भीती आहे. पाणीपुरवठा बंद केल्यानंतर लिकेज थांबवण्यासाठी किमान दोन ते तीन दिवस लागणार असल्याचे एक अधिकाऱ्याने सांगितले. (Pune Water Crisis)

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणसाळखीत यंदा पाऊस कमी झाल्याने अपेक्षित पाणीसाठा नाही. त्यामुळे शहरावर पाणी टंचाईचे सावट आहे. धरणसाठ्यातील पाणी केवळ ४० दिवस पुरेल एवढे असल्याचे सांगितले जात आहे. शहरासह उपनगरात अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. महापालिकेला जलसंपदा विभागाकडून होणाऱ्या पाण्यासाठ्यात वाढ करण्याऐवजी ५० एमएलडी पाणी गेल्या महिन्यात कमी करण्यात आले आहे. लिकेज शोधून पाणी बचत करावी, तसेच आहे ते पाणी काटकसरीने वापरावे असे स्पष्ट आदेश कालवा समितीच्या बैठकीत महापालिकेला देण्यात आले आहेत. त्यामुळे जलसंपदा विभागाकडून जास्तीचे पाणी महापालिकेला मिळणार नाही, हे स्पष्टच झाले आहे. त्यामुळे आहे ते पाणी पुरवून पालिकेला जपून वापरावे लागणार आहे. त्यात आता मोठे लिकेज झाल्याने पाणीपुरवठा विभागासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.

महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये पाण्याची भीषण टंचाई आहे. महापालिकेने नुकताच  १२०० वरुन १४०० टॅंकरने पाणीपुरवठा करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. पाण्यासाठी नागरिकांचे वाद होत आहे. तसेच अनेक भागात अनियमित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिक त्रासले आहेत. पाणीपुरवठा विभागाने १५ जुलै पर्यंत पाणी पुरेल असा दावा केला आहे. मात्र महापालिकेला पाणी कपातीचा निर्णय घ्यावा लागेल, त्यानंतरच हा पाणीसाठा पुरेल असेही बोलले जात आहे. लोकसभा निवडणुकीवर पाणी कपातीचा मोठा परिणाम होण्याची भीती राजकीय नेत्यांमध्ये आहे. त्यामुळे पाणीकपातीवर सध्या तरी कोणी बोलण्यास तयार नाही. एक दिवसाआड नसले तर आठवड्यातून एकदा तरी शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवावा लागेल, असे महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी सांगतात. मात्र ही केवळ चर्चा असून धोरणात्मक निर्णय हा कालवा समितीतच होणार आहे. त्यासाठी १३ मे च्या मतदानाच्या दिवसाची वाट पहावी लागणार आहे. आता कितीही चर्चा केल्यातरी कोणताही निर्णय होणार नाही. त्यामुळे सध्या जसे सुरु आहे, तसेच सुरु ठेवून नागरिकांच्या तक्रारींवर मार्ग काढला जाईल, असे सांगण्याशिवाय अधिकाऱ्यांच्या हाती दुसरे काहीही नाही.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest