'सीएमओ'च्या नावावर फसवणूक

मुख्यमंत्री कार्यालयातून बोलत असल्याचे सांगत शहरातील नावाजलेल्या महाविद्यालयांत अनेकांना प्रवेश घेऊन देणाऱ्या युवकाला पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. विशेष म्हणजे अटक करण्यात आलेला युवक स्वतः ला युवा सेनेचा पदाधिकारी असल्याचेही सांगत असून, मुख्यमंत्री कार्यालयातील कर्मचाऱ्याने याबाबत फिर्याद दिली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Rohit Athavale
  • Thu, 25 May 2023
  • 03:29 pm
'सीएमओ'च्या नावावर फसवणूक

'सीएमओ'च्या नावावर फसवणूक

पुणे, पिंपरी-चिंचवड, बंगळुरू शहरातील नामांकित महाविद्यालयात पैसे घेऊन दिले प्रवेश

रोहित आठवले

rohit.athavale@civicmirror.in

TWEET@RohitA_mirror

मुख्यमंत्री कार्यालयातून बोलत असल्याचे सांगत शहरातील नावाजलेल्या महाविद्यालयांत अनेकांना प्रवेश घेऊन देणाऱ्या युवकाला पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. विशेष म्हणजे अटक करण्यात आलेला युवक स्वतः ला युवा सेनेचा पदाधिकारी असल्याचेही सांगत असून, मुख्यमंत्री कार्यालयातील कर्मचाऱ्याने याबाबत फिर्याद दिली आहे.

राहुल राजेंद्र पलांडे (वय ३१, रा. दर्शननगरी, केशवनगर, चिंचवड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्यावर फसवणूक, सरकारी अधिकारी असल्याचे भासवणे, माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६ (क) आदी कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर मुख्यमंत्री कार्यालयात नियुक्तीस असणाऱ्या लिपिकाने याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

राहुल पलांडे याच्या फेसबुकवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्री उदय सामंत, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, अनेक कॅबिनेट मंत्री यांच्याबरोबरचे फोटो आहेत. तसेच पलांडेने त्याच्या तीन ते चार मोबाईलमधील फोननंबरपैकी काही नंबर ट्रू  कॉलरवर सीएमओ ऑफिस, महाराष्ट्र शासन, मुंबई या नावाने सेव्ह केले होते. त्यामुळे त्याने कोणालाही फोन केल्यास ट्रू कॉलरवर मुख्यमंत्री कार्यालयातून फोन आला, असे वाटत असे.

त्याचबरोबर पलांडे याने व्हॉट्सॲप डीपीवर शासनाचे बोधचिन्ह ठेवले होते. या सगळ्या गोष्टींमुळे तो सरकारी अधिकारी तसेच लोकसेवक असल्याचे भासवत होता, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, पलांडे याने हा सगळा उद्योग शहरातील तसेच बंगळुरूमधील महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रवेश घेऊन देण्यासाठी केला आहे. विद्यार्थ्यांकडून आणि त्यांच्या पालकांकडून पैसे घेऊन पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील हिंजवडी, लवळे, पुणे आणि बंगळुरू येथे सिम्बायोसिस आणि डी. वाय. पाटील कॉलेजमध्ये चार प्रवेश मिळवून देण्यासाठी पलांडे हा मुख्यमंत्री कार्यालयातून बोलत असल्याचे भासवत होता.

दोन दिवसांपूर्वी शहरात एका विवाह सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच अन्य अनेक मंत्री, शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती आणि बहुसंख्य कॉलेजचे संस्थापक, चालक उपस्थित होते. या विवाह सोहळ्यात मुख्यमंत्री कार्यालयातील बडे अधिकारी आणि कॉलेज व्यवस्थापन

विश्वस्त समोरासमोर आले तेव्हा त्यांच्यात पलांडे याने केलेल्या फोनवरील विनंतीनुसार प्रवेश दिल्याचा विषय चर्चिला गेला. त्यावेळी मंत्रालयातील कोणत्याही अधिकाऱ्याने कधीही कोणत्याही कॉलेज व्यवस्थापनाला फोन केला नसल्याचे उघड झाले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मंत्रालयातील सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी कोणाला शिफारस पत्र दिले का याची खातरजमा करण्यात आली. त्यानंतर कोणीच असे पत्र कोणाला दिले नसल्याचे उघड झाल्याने पलांडे याने बनावट पत्र तयार करून, लोकांकडून पैसे घेऊन हा प्रकार केल्याचे उघड झाले. त्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकाऱ्यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये येऊन फिर्याद दिली. त्यानंतर अवघ्या काही तासात पलांडे याला अटक केली. न्यायालयाने पलांडेची रवानगी २९ तारखेपर्यंत पोलीस कोठडीत केली आहे. दरम्यान, पलांडे याचे मंत्रालय आणि शहरातील बडे राजकीय नेते, कॉलेज व्यवस्थापन आदी लोकांशी सातत्याने फोन वरून संभाषण होत असल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest