पिंपरी-चिंचवड शहरातील वल्लभनगर आगार येथून वाहन सुटल्यानंतर चिंचवड स्टेशन आणि त्यानंतर निगडी येथे थांबते. प्रत्यक्षात निगडीमध्ये एसटीचा बस थांबा उभारलेला नाही. त्यामुळे अनधिकृतरित्या ग्रेड सेपरेटरमध्ये बस थांबवल्या जातात. परिणामी, अपघाताचा धोका निर्माण झाला असून, प्रवाशांना देखील जीव धोक्यात घालून उतरावे लागते.
भक्ती-शक्ती चौकातील उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होऊन तीन वर्षे लोटली; परंतु निगडीतील एसटी बसथांबा अद्याप उभारण्यात आलेला नाही. याबाबत अनेकवेळा स्थानिकांनी पाठपुरावा आणि मागणी करूनही त्याबाबत कार्यवाही झाली नाही.
एसटीचालकांना भक्ती-शक्ती पुलाखाली अण्णा भाऊ साठे बसस्थानकालगत बस थांबवण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, वाहनचालक उड्डाणपुलापुढील ग्रेड सेपरेटरमध्येच बस थांबवतात. याबाबत तक्रार करूनही कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
निगडी, प्राधिकरण, तळवडे, रूपीनगर परिसरातील प्रवाशांना एसटी बससाठी इथेच यावे लागते. प्रवाशांना ग्रेड सेपरेटरच्या सीमा भिंतीवरील जाळीतून व सेवा रस्ता पार करीत जीव धोक्यात घालून ऊन-पावसात बससाठी ताटकळत थांबावे लागते. रिक्षाचालकांची प्रवासी घेण्यासाठी कायमच चढाओढ सुरू असते. याबाबत एसटी वाहक व चालकांना कोणतेही सोयर-सुतक नसल्याचे दिसून येते.
प्रवाशांचा अपघात झाल्यानंतर अथवा दुर्घटना घडल्यानंतर एसटी प्रशासनाला जाग येणार का? असा संतप्त सवाल प्रवासी करीत आहेत. महिला, वृद्ध व लहानांना मदतीशिवाय रस्ता ओलांडून एसटी बसथांब्यावर जाता येत नाही. एसटी महामंडळाचा वाहतूक नियंत्रक नसल्याने या बसचालकांवर कसलाही वचक राहिला नसल्याचे दिसून येते. एसटी महामंडळाच्या पुण्यातील विभागीय कार्यालयात स्थानिकांनी अनेक निवेदन दिले. मात्र त्यावरती कोणतीही कारवाई झाली नसल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
वाहकाला याची माहिती असूनहे ते जाणीवपूर्वक ग्रेड सेपरेटरमध्ये बस थांबवतात. ते कोणाचाही विचार करत नाही. मागून येणारी वाहनांमुळे अपघात होईल हे ते पाहत नाहीत. सोबत बॅगा असलेल्या प्रवाशांचे रस्ता ओलांडताना अतोनात हाल होतात.-सुरेश भावसार, ज्येष्ठ नागरिक भक्त्ती-शक्त्ती चौक उडाणपुलाच्या सुरुवातीला व खालील अण्णा भाऊ साठे बस टर्मिनसलगत एसटी बस वाहतूक नियंत्रकाची नियुक्ती केली जाणार आहे.
-प्रमोद नेहूल, विभागीय नियंत्रक, पुणे