संग्रहित छायाचित्र
राज्य शासनामार्फत प्राथमिक व माध्यमिक शाळांवर नुकतेच ‘पवित्र पोर्टल’ अंतर्गत हजारो प्रशिक्षित तरुण- तरुणींना शिक्षक म्हणून नियुक्ती देण्यात आली. या भरती प्रक्रियेनंतर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत नवनियुक्त शिक्षकांसाठी ४ ते ११ नोव्हेंबर दरम्यान सात दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन केले होते. औपचारिक प्रेरणा कार्यक्रम अंतर्गत ५० तासांचे प्रशिक्षण उत्साहात पार पडले.
राज्य शासनाने पहिली ते आठवी आणि नववी ते बारावीसाठी नवनियुक्त शिक्षण सेवकांसाठी ७ दिवसांच्या प्रशिक्षणाचे आयोजन केले होते. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या या प्रशिक्षणात शालेय नेतृत्व व व्यवस्थापन, बहुवर्ग अध्यापन पद्धती, सातत्यपूर्ण सर्वंकश मूल्यमापन, शिक्षण हक्क अधिनियम, सामाजिक न्याय व समता, माहिती तंत्रज्ञान व तांत्रिक कौशल्ये, नवोपक्रम, कृती संशोधन, ताणतणाव व्यवस्थापन, वातावरणातील बदल, विद्यार्थी लाभाच्या योजना, मुलींचे शिक्षण, राष्ट्रीय शिक्षण धोरण, शालेय अभिलेख, अध्यापनात स्थानिक भाषेचा वापर, व्यावसायिक अध्ययन समूह या विषयांचा समावेश होता. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या तज्ज्ञ मार्गदर्शकांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले.
भावी पिढीचे नवनिर्माते म्हणजेच शिक्षक. त्यामुळे ही केवळ पदवी नाही, तर ती एक सेवा आहे. शिक्षक हे भावी पिढीला घडवण्याचे कार्य करत असल्याने समाजाचा शिक्षकांकडे बघण्याचा दृष्टिकोन आदराचा आहे. तज्ज्ञ मार्गदर्शकांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले.’’ - संगीता बांगर, प्रशासन अधिकारी, शिक्षण प्राथमिक विभाग