उद्योगनगरीत जो तो किंगमेकर!; ‘याला गाड, त्याला गाड’ करणारे म्हणतात, आमचाच नेता पॉवरफुल

उद्योगनगरीतील पिंपरी, चिंचवड, भोसरी अन् मावळ या मतदारसंघांमध्ये महायुतीचे उमेदवार निवडून आले. प्रत्येकाने आपापली ताकद पणाला लावली होती.

kingmaker

उद्योगनगरीत जो तो किंगमेकर!; ‘याला गाड, त्याला गाड’ करणारे म्हणतात, आमचाच नेता पॉवरफुल

सर्वांची साथ मिळाली, असे सांगत निवडून आलेले आमदार टाळत आहेत यावर बोलणे

उद्योगनगरीतील पिंपरी, चिंचवड, भोसरी अन् मावळ या मतदारसंघांमध्ये महायुतीचे उमेदवार निवडून आले. प्रत्येकाने आपापली ताकद पणाला लावली होती. मात्र निकाल लागल्यानंतर उद्योगनगरीत किंगमेकरना उत आला आहे. ‘याला गाड, त्याला गाड’वृत्तीच्या लोकांनी महायुती आणि महाविकास आघाडीचा धर्म न पाळला नाही. आता निवडणूक झाल्यावर मात्र हेच लोक आता आम्हीच कसे किंगमेकर, हे उर बडवून सांगू लागले आहेत.

सोशल मीडियावर स्वतःला किंगमेकर म्हणवून घेत शहरातील अनेक नेत्यांची स्वतःची पाठ थोपटून घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे याबाबत सर्वच विजयी उमेदवारांनी मिश्किल प्रतिक्रिया देत ‘मला सर्वांची साथ मिळाली,’ असे सांगत यावर बोलणे टाळले आहे. 

पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघात अनेक स्थानिक नेत्यांनी महायुतीच्या उमेदवारांना जाहीर विरोध दर्शवला होता. महायुती असल्याने उमेदवार बदलला तरच आपला विजय होईल, असे सांगणारे अनेकजण पुढे आले होते. पत्रकार परिषद घेत अजूनही उमेदवार बदलण्यास वाव आहे, असे सांगून इशारे देणारे आता मात्र स्वतःच्या बगलबच्चांना सांगून ‘आम्हीच किंगमेकर ठरलो’ अशा पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट करू लागले आहेत.

भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांना महायुतीमधून थेट विरोध करताना कोणी दिसत नव्हते. भोसरीत पुरता विचार करायचा झाल्यास येथे ‘आम्हीच किंगमेकर ठरलो...’ अशी पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट आली नसली तरी ‘आम्ही सुरुवातीपासून महेश दादांबरोबर’ अशा अनेक पोस्ट पाहायला मिळत आहेत.

पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अण्णा बनसोडे यांना महायुतीमधील शिवसेना आणि भाजपमधून तसेच स्वतःच्या राष्ट्रवादी काँग्रेस मधूनदेखील विरोध दर्शविला गेला. ज्या-ज्या नेत्यांनी अण्णा बनसोडे यांच्या उमेदवारीला विरोध केला, त्यांचे बगलबच्चे आता निकालानंतर मात्र आता ‘आमचा नेता किंगमेकर’ अशा पोस्ट फेसबुक, इंस्टाग्रामवर पोस्ट करू लागले आहेत.

चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांना तर स्वपक्ष भाजपमधून विरोध दर्शविला गेला होता. शंकर जगताप शहराध्यक्ष असतानादेखील त्यांच्या उमेदवारीला विरोध करणारे आता ‘शंकरभाऊ आमदार झाले, गड राखला,’ ‘आम्ही कायम सोबत होतो...’ अशा पोस्ट सोशल मीडियावर अपलोड करीत आहेत.

मावळमध्ये आमदार सुनील शेळके यांना तर सर्वच पक्षांनी विरोध दर्शविला होता. माजी राज्यमंत्री बाळा भेगडे आणि भाजपासह अन्य पक्षांनी एकत्र येत अपक्ष उमेदवार बापू भेगडे यांना पाठिंबा जाहीर केला होता. पण आता निकाल लागल्यानंतर ‘आम्ही आतून सुनीलअण्णा यांचेच काम केले,’ असे सांगू लागले आहेत. एकंदरीत सोशल मीडियावर अचानक वाढलेले ‘किंगमेकर’ आणि आतून तसेच मनापासून काम करणारे कोण, हे सर्वच विजयी उमेदवारांना चागलेच माहित आहे. परंतु आता निकाल लागला असल्याने त्यानंतर थेट भाष्य करणे चारही आमदारांनी टाळले आहे.

येत्या काही महिन्यात महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. आमदारकीच्या उमेदवारीला विरोध करणाऱ्यांना येत्या काळात एक तर स्वतःसाठी किंवा आपल्या मुलाबाळांसाठी महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी मागायला याच आमदारांकडे जावे लागणार आहे. आपण ज्याला विरोध केला तोच आता आमदार झाला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर का होईना, आम्ही तुमचेच समर्थक आणि आमचे नेते किंगमेकर हे दाखविण्यासाठीची या लोकांची अगतिकता स्पष्ट होत आहे.

आमदार शंकर जगताप यांना राज्यात सर्वाधिक मते

राज्यातील सर्वात मोठ्या मतदारसंघांपैकी एक असलेल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघातून भाजपचे शंकर जगताप हे विजयी झाले आहेत. चिंचवड विधानसभा मतदारसंघ २००९ मध्ये अस्तित्वात आल्यापासून जगताप कुटुंबीयांकडे हा मतदारसंघ राहिला आहे. सुरुवातीला दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप हे २००९ ते जानेवारी २०२३ पर्यंत आमदार होते. त्यांच्या निधनानंतर येथील पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप  निवडून आल्या होत्या. त्यानंतर तीन दिवसांपूर्वी झालेल्या निवडणुकीत शंकर जगताप हे राज्यातील सर्वाधिक मते घेणारा आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी या निवडणुकीत २,३५,३२३ मते मिळवली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest