संग्रहित छायाचित्र
कार्तिकी एकादशी व संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त पीएमपीएमएलच्या सेवा मार्गस्थ झालेल्या आहेत. २९ नोव्हेंबरपर्यंत या साठी महामंडळाच्या ३४३ बस सोडण्यात येणार आहेत. त्यापैकी २२९ ज्यादा बसेस या मार्गावर असणार आहेत. गर्दी लक्षात घेता पीएमपीएमएलकडून २६ ते २८ या काळात रात्री ११ ते सकाळी ५ वाजेपर्यंत रातराणी बस सेवा देण्यात येणार आहे. रात्री पीएमपीएमएलचे एकदिवसीय, साप्ताहिक, मासिक, ज्येष्ठ नागरिक व इतर पास चालणार नसल्याचे पीएमपीएमएलने स्पष्ट केले आहे. दरम्यान, वाहतूक पोलिसांनी वाहतूक व्यवस्थेमध्ये देखील बदल केले असल्याने त्याचे पालन करावे लागणार आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील निगडी, पिंपरी, चिंचवड, देहूगाव, भोसरी, रहाटणी आणि पुणे शहरातील स्वारगेट, हडपसर, पुणे स्टेशन, मनपा भवन या स्थानकांवरून जादा २२९ आणि नियमित मार्गावर सुरू असलेल्या ११४ अशा एकूण ३४३ बस सोडण्यात येणार आहेत. आळंदी यात्रेनिमित्ताने आळंदी गावातील सध्याचे बसस्थानक स्थलांतरित करून काटेवस्ती येथून बसेसचे संचलन करण्यात येणार आहे.
आळंदी यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांच्या वाहतुकीच्या सोयीसाठी जादा बस सोडण्यात येणार आहेत. पीएमपीएमएलकडून दररोज १६०० ते १६५० बसमार्फत सेवा दिली जाते. ताफ्यात अगोदरच बस संख्या कमी आहे, यात्रेसाठी २२९ जादा बस सोडण्यात येणार असल्यामुळे बसमार्ग क्र. २५७ आळंदी ते मरकळ, बस मार्ग क्र. ३६४ आळंदी ते चाकण आंबेठाण चौक व बस मार्क क्र. २६४ भोसरी ते पाबळ हे तीन बसमार्ग २९ नोव्हेंबरपर्यंत बंद राहतील.
सोहळ्याच्या निमित्ताने आयुक्तांकडून आढावा
आळंदी यात्रेच्या सोहळ्याच्या निमित्ताने पोलीस आयुक्तांनी आढावा घेतला. वाहतूक व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था आणि भाविकांची गर्दी लक्षात घेता पार्किंग व्यवस्थेबाबत सूचना केल्या. यावेळी स्थानिक अधिकारी, आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी त्याचप्रमाणे देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त आणि व्यवस्थापक उपस्थित होते. त्याचप्रमाणे पिण्याचे पाणी साठी १५ टँकर, स्वच्छतासाठी ८०० फिरते शौचालय. उपलब्ध करून देण्यात आले आहेत. वारीमध्ये स्वच्छता वॉरियर्स म्हणून कार्यकर्त्यांची नेमणूक केली जाणार आहे.