संग्रहित छायाचित्र
अपुऱ्या पत्त्यामुळे वाहनधारकांचे आरसी बुक त्यांना मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. त्यातच वर्षाकाठी जवळपास १२ ते १३ हजार आरसी आरटीओकडे परत येतात. त्यानंतर अनेक नागरिक ते नेत नाहीत. त्यामुळे वाहनधारकांना त्यांना आरसी बुक वेळेवर मिळावे यासाठी, आरटीओ अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना सूचना केल्या आहेत. त्याचप्रमाणे नागरिकांनी देखील पुर्ण पत्ता नमूद करण्याचे आवाहन पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे. आरसी बुकचे प्रलंबित अर्ज कमी करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन विभागात (आरटीओ) सात महिन्यांत बाराशे वाहनचालकांनी वाहन नोंदणी प्रमाणपत्रावरील (आरसी बुक) पत्ता बदलला आहे. त्यांना शोधण्याची डोकेदुखी वाढली आहे. नवीन वाहन खरेदी केल्यावर वाहन नोंदणी प्रमाणपत्र (आरसी बुक) दिले जाते. पूर्वी वाहन खरेदी केल्यानंतर त्या विक्रेत्याकडेच (डीलर्स) आरसी बुक मिळत असे. मात्र, परिवहन विभागाने २००६ पासून कागदी आरसी बुक व वाहन परवाना देणे बंद केले. त्या जागी स्मार्ट कार्ड आले आहे.
दरम्यान, वर्षाकाठी १२ ते १३ हजार आरसी परत येतात. त्याचे प्रमुख कारण पत्ता सापडत नसल्याचे आढळून येते. संबंधित विभागातील पोस्टाकडून ते वितरत केले जातात. मात्र, पत्ता अर्धवट असणे, सापडत नसणे या कारणामुळे ते पोस्टात पुन्हा येतात. काही दिवस पोस्टमन वाट पाहून पुन्हा आरटीओ कार्यालयात पाठवतात. दरम्यान, हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अर्जदार पुन्हा कधीतरी येईल यासाठी ते आरसी कार्यालयात ठेवण्यात येतात. त्यानंतर पुन्हा अर्ज करून व शुल्क भरून तेच आरसी अर्जदारांना देतात. मात्र, हे करण्यापूर्वी आता नागरिकांनाच आरसी बुक वरील पत्ता व्यवस्थित लिहिण्याचे आवाहन केले आहे. त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांनी त्याबाबत सूचना दिलेल्या आहेत.
परवान्यासाठी अथवा वाहन नोंद करताना जो पत्ता दिलेला असतो त्याला मंजूरी देण्याचे काम कार्यालयाकडून केले जाते. त्यामुळे नागरिकांनी पत्ता नमूद करताना पुर्ण पत्ता व्यवस्थित टाकावा. अन्यथा कागदपत्रे मिळताना अडचणींचा निर्माण होतात. - राहुल जाधव, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी-चिंचवड