दाखले रखडल्याने अर्जदारांची तहसील कार्यालयात धाव
नागरिकांना शासकीय कामासह शालेय प्रवेशासाठी आवश्यक दाखले वेळेवर मिळत नसल्याने अर्जदारांनी तहसील कार्यालयात सोमवारी धाव घेतली. तहसीलदारांच्या दालनाबाहेर गर्दी झाल्यानंतर अखेर विविध प्रकारचे दाखले पूर्ण करण्याबाबत सूचना देण्यात आले. गेल्या महिनाभरापासून तहसीलदार, नायब तहसीलदार यांना इलेक्शन ड्युटीमुळे शेकडो दाखले प्रलंबित असल्याचे सांगण्यात येत आहे.
पिंपरी-चिंचवड तहसील कार्यालयांतर्गत उत्पन्न, डोमीसाइल त्याचप्रमाणे विविध दाखल्यांचे वाटप करण्यात येते. त्याचप्रमाणे सातबारा, विविध प्रकारच्या सुनावणी आणि योजनांचा परतावाही अर्जदारांना मिळाला नव्हता. दरम्यान, गृह प्रकल्पासाठी लागणारा उत्पन्न दाखला, डोमीसाइल सर्टिफिकेट यासह विविध प्रमाणपत्रे देण्यात येतात. मात्र, गेल्या महिन्याभरापासून तहसीलदार निवडणुकीच्या कामामुळे व्यस्त असल्याने हे दाखले रखडले होते. त्याचप्रमाणे इतर दाखल्यांची संख्या देखील वाढली होती. नागरिक यासाठी हेलपाटे मारत होते. मात्र, निवडणुकीचे कारण त्यांना दिले जात होते.
दरम्यान, सोमवारी (दि.२५ )सकाळीच विविध दाखले मिळावेत यासाठी, नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. तहसीलदार यांच्या दालनासमोरच नागरिक येऊन थांबले होते. त्यानंतर नायब तहसीलदार यांची भेट घेऊन दाखले देण्यात यावेत, अशी मागणी काही नागरिकांनी केली. त्यानंतर नायब तहसीलदार स्वतः बाहेर आले आणि त्यांनी नागरिकांना दोन ते तीन दिवसांमध्ये दाखले देण्यात येतील, असे सांगितले. त्यानंतर गर्दी काही प्रमाणात कमी झाली. दररोज जवळपास दीडशे ते दोनशे विविध प्रकारचे अर्ज येतात. गेल्या महिन्याभरापासून हे दाखले रखडल्याने तो आकडा जवळपास हजारांच्या घरात गेला असल्याचे निदर्शनास आले आहे.
त्याचबरोबर नागरिकांच्या विविध तंट्यातील सुनावण्या, सातबारे आणि महसूल संदर्भातील कामे देखील रखडली होती. त्यामुळे तहसील कार्यालय दिवसभर नागरिकांची गर्दी दिसून आली. याचबरोबर संजय गांधी, श्रावणबाळ अशा विविध योजनांसाठी नागरिक आले होते. या ठिकाणी असलेले अधिकारी कर्मचारी निवडणूक कामासाठी गेले होते. ते पुन्हा आल्यानंतर अर्जाची माहिती घेण्यासाठी नागरिक येत होते. आळंदी यात्रेनिमित्त नियोजन आणि विविध प्रकारच्या सुरक्षितेसाठी जिल्हाधिकाऱ्याकडून महसूल अधिकाऱ्यांना कामे सोपवण्यात आली आहेत. त्यासाठी या कार्यालयातील अधिकारी तिथे जाऊ शकतात. त्यामुळे मंगळवारीही नागरिकांना अधिकारी भेटू शकणार नाहीत. त्यामुळे दाखल्यास इतर कामे आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शिधापत्रिका कार्यालय रिकामे
शिधापत्रिकेतील नागरिकांची प्रलंबित कामे आणि धान्य मिळत नसल्याच्या तक्रारीबाबत नागरिक आले होते. मात्र, निगडी येथील शिधापत्रिका कार्यालयामध्ये केवळ दोनच कर्मचारी उपलब्ध होते. अन्य अधिकारी निवडणुकीच्या कामांमध्ये असल्याचे सांगण्यात आले. त्याचप्रमाणे कर्मचारी देखील दरवाजाला कडी लावून आत बसले होते. त्यामुळे बाहेर ताटकळत थांबलेले नागरिक कोणी उत्तर देत नसल्याने निघून गेले.
निवडणुकीच्या कामामुळे थोडेफार दाखले प्रलंबित आहेत. मात्र, नागरिकांची गैरसोय लक्षात घेता ते लवकरात लवकर देण्यात येतील.
- जयराज देशमुख, अप्पर तहसीलदार, पिंपरी-चिंचवड