संग्रहित छायाचित्र
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या रावेत येथील पंतप्रधान आवास योजनेतील गृहप्रकल्पांची निविदा रद्द करण्यात आली आहे. आता नव्याने निविदाप्रक्रिया राबविली जाणार आहे. ऑक्टोबर २०२० पासून बंद असलेले हे काम, त्यात निविदाप्रक्रिया राबविण्यात लागणारा कालावधी यामुळे लाभार्थ्यांना घरासाठी आणखी किमान २ ते ३ वर्षांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
रावेत येथील २ हेक्टर जागेत हा प्रकल्प राबवला जात आहे. त्यासाठी २०१९ ला निविदाप्रक्रिया राबवण्यात आली होती. त्या गृहप्रकल्प बांधकामाची वर्कऑर्डर ३० मे २०१९ ला देण्यात आली. एकूण ७९ कोटी ४५ लाख ९२ हजार ७९० रुपये खर्चाचे काम मन इन्फ्रा. कन्स्ट्रक्शन देण्यात आले आहे. इमारतीचे काम सुरू करण्यात आले. फाउंडेशनचे काम झाले होते. प्रकल्पाविरोधात रावेत येथील मुंबई उच्च न्यायालयात दावा दाखल केला होता. मात्र, उच्च न्यायालयाने कामास स्थगिती दिल्याने तेथील काम ऑक्टोबर २०२० पासून ठप्प आहे.
उच्च न्यायालयाने याचिका फेटाळत महापालिकेस काम करण्याचे आदेश दिले आहेत. त्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने महापालिकेच्या बाजूने निकाल देत काम सुरू करण्यास परवानगी दिली आहे. न्यायालयीन अडचण दूर झाल्याने काम लवकरच सुरू होईल, अशी लाभार्थ्यांना आस होती. दरम्यान, मागील चार वर्षांपासून हे काम बंद आहे. तसेच, बांधकाम साहित्यांचे दर महाग झाल्याने खर्च वाढला आहे. त्यामुळे या प्रकल्पाची नव्याने निविदा काढण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
लाभार्थ्यांना घराची आस
रावेत गृहप्रकल्पात ३२३ चौरस फूट चटई क्षेत्र आकाराच्या एकूण ९३४ सदनिका आहेत. सदनिकांची सोडत २७ फेब्रुवारी २०२१ ला काढण्यात आली. त्यासाठी लाभार्थ्याकडून ५ हजार रुपये महापालिकेने जमा करून घेतले. पावणेचार वर्षे झाले तरी, सदनिका न मिळाल्याने लाभार्थी नाराजी व्यक्त करीत आहेत. नव्याने निविदाप्रक्रिया राबवण्यास किमान ३ ते ४ महिन्यांचा कालावधी जाणार आहे. विधानसभा आचारसंहितेनंतर निविदा प्रकिया सुरू होईल. त्यानंतर प्रत्यक्ष काम पूर्ण होण्यास अडीच ते तीन वर्षांचा कालावधी लागू शकतो. म्हणजे आणखी किमान तीन वर्षे घरासाठी सर्वसामान्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.