माजी नगरसेवक भोईर, ओव्हाळ, भापकर यांचे डिपॉझिट जप्त

चिंचवड, पिंपरी, भोसरी आणि मावळ विधानसभा मतदारसंघांतून निवडणुकीच्या रिंगणातील ५३ उमेदवारांपैकी ४५ जणांची अनामत (डिपॉझिट) जप्त झाली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Edited By Desk User
  • Tue, 26 Nov 2024
  • 02:33 pm
Vidhansabha Election 2024

माजी नगरसेवक भोईर, ओव्हाळ, भापकर यांचे डिपॉझिट जप्त

चारही मतदारसंघांतून ५३ पैकी ४५ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त

चिंचवड, पिंपरी, भोसरी आणि मावळ विधानसभा मतदारसंघांतून निवडणुकीच्या रिंगणातील ५३ उमेदवारांपैकी ४५ जणांची अनामत (डिपॉझिट) जप्त झाली आहे. त्यात अपक्ष उमेदवार तथा माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे बाळासाहेब ओव्हाळ यांच्यासह ४५ जणांचा समावेश आहे.

विधानसभा निवडणुकीत चिंचवडमधून शंकर जगताप, पिंपरीतून अण्णा बनसोडे, भोसरीतून महेश लांडगे, तर मावळातून सुनील शेळके विजयी झाले. दुसऱ्या क्रमांकाची मते चिंचवडमधून राहुल कलाटे, पिंपरीतून सुलक्षणा धर-शिलवंत, भोसरीतील अजित गव्हाणे व मावळमधून अपक्ष बापूसाहेब भेगडे यांना मिळाली. यांची अनामत रक्कम वाचली आहे. निवडणुकीच्या रिंगणातील ५३ जणांपैकी ३५ जणांना मतांचा तीन अंकी आकडाही गाठता आलेला नाही. शहरातील पिंपरी, भोसरी आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघामधील तब्बल ४५ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार निवडणुकीला उभा राहिलेला उमेदवार त्या जागेवर झालेल्या एकूण मतदानापैकी १/६ अर्थात १६.६ टक्के मते घेण्यात अपयशी ठरला, तर त्याने अर्ज करताना जमा केलेली अनामत रक्कम जप्त केली जाते.

अनुसूचित जातीसाठी राखीव पिंपरी मतदारसंघात एकूण १५ उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी १३ उमेदवारांना आपले डिपॉझिट वाचविता आले नाही. पिंपरी मतदारसंघातील मतदारांनी अन्य उमेदवारापेक्षा नोटाला अधिक प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे. या मतदारसंघात ४०१३ मतदारांनी नोटाला मत दिले आहे. नोटाला चौथ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत. केवळ तीन उमेदवारांना नोटापेक्षा अधिक मते मिळवता आली आहेत. चिंचवड मतदारसंघात एकूण २१ उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी १९ उमेदवारांना आपले डिपॉझिट वाचविता आले नाही. या मतदारसंघातील ४३१६ मतदारांनी अन्य उमेदवारांपेक्षा नोटाला अधिक प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे. या मतदारसंघात देखील नोटाला चौथ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत. केवळ तीन उमेदवारांना नोटापेक्षा अधिक मते मिळवता आली आहेत.

भोसरी मतदारसंघात एकूण ११ उमेदवार रिंगणात होते. विजयी उमेदवार आणि मुख्य प्रतिस्पर्धी उमेदवार वगळता इतर ९ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. अन्य दोन मतदारसंघाच्या तुलनेत भोसरी मतदारसंघात नोटाचा पर्याय खूप कमी मतदारांनी निवडला आहे. २६८५ मतदारांनी नोटाला मत दिले आहे. येथे नोटाला पाचव्या क्रमांकाची मते मिळाली आहेत. केवळ चार उमेदवारांना नोटा पेक्षा अधिक मते मिळवता आली आहेत.

यांचे झाले डिपॉझिट जप्त

चिंचवड मतदारसंघ - भाऊसाहेब भोईर (४३२३) , करण गाडे (३२८८), राजेंद्र गायकवाड (२२७८), रवींद्र परांडे (२६८०), जावेद रशीद शेख (८३८), मारुती भापकर (७७१), राजेंद्र काटे (६६९), राजेंद्र पवार (६१७), सतीश काळे (३३५), रूपेश शिंदे (३०४), सचिन अरुण सिद्धे (३११), मयूर घोडके (२८६), रफिक रशीद कुरेशी (२४१), अतुल समर्थ (२२३), धर्मराज बनसोडे (२०७), अनिल सोनवणे (२०१), विनायक ओव्हाळ (१८८), सिद्धकी शेख (१७६), सचिन सोनकांबळे (१२७)

पिंपरी मतदारसंघ - सुंदर कांबळे (१८३६), बाळासाहेब ओव्हाळ (३२०८), मनोज गरबडे (७१७३), राजेंद्रसिंगजी छाजछिडक (१९०८), राहुल सोनवणे (३५१), ईश्वरराव कटके (१९२), कैलाश खुडे (२०२), ॲड. बी. के. कांबळे (२६८), राजू भालेराव (२३२), सुरेश भिसे (५६३), मीनाताई यादव-खिल्लारे (५७१), ॲड. सचिन सोनवणे (३४६), सुधीर जगताप (७२६).

भोसरी मतदारसंघ - बलराज कटके (१९०९), अमजद खान (३११७), जावेद शहा (२३२), अरुण पवार (१४७), खुद्दबुद्दीन होबाळे (१११), गोविंद चुनचुने (२९०४), हरिश डोळस (१७३), रफिक कुरेशी (३०१), शलाका कोंडावार (३४२).

मावळ मतदारसंघ - रवींद्र वाघचौरे (७४९), मुकेश अगरवाल (५४५), गोपाळ तंतरपाळे (६१६), पांडुरंग चव्हाण (५११).

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest