संग्रहित छायाचित्र
गेल्या महिनाभरापासून विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शहरातील विविध ठिकाणचे सरकारी अधिकारी, कर्मचारी इलेक्शन ड्युटीत गुंतले होते. परिणामी, नागरिकांची कामेही खोळंबली होती. आता निवडणुका संपल्यानंतर अधिकारी, कर्मचारी त्या-त्या ठिकाणी मूळ जागी आले आहेत. त्यामुळे सोमवारपासून (दि. २५) नागरिकांची रखडलेली, अडकलेली कामे आता मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
पुणे जिल्ह्याचे काम पाहणारे पुणे महानगर क्षेत्रीय विकास प्राधिकरण, आरटीओ, तहसीलदार, विविध ठिकाणाचे तलाठी, अन्नधान्य परिमंडळातील अधिकारी त्याचप्रमाणे महापालिका अधिकाऱ्यांची देखील विविध ठिकाणी नेमणूक केली होती. दरम्यान, गेल्या महिन्याभरापासून त्यांच्याकडे असलेली कामे विस्कळीत झाली होती. त्याचप्रमाणे तहसीलदार, तलाठी यांची देखील रोजची कामे होत नसल्याने नागरिकांना रिकाम्या हाती परटावे लागत होते. मात्र,आता हे सर्व अधिकारी सोमवारपासून पुन्हा नागरिकांच्या कामासाठी उपलब्ध असतील. दरम्यान, पिंपरी-चिंचवड येथील तहसीलदार आणि नायब तहसीलदार दोघांनाही निवडणुकीचे काम असल्याने विविध दाखले, सुनावण्या या रखडल्या होत्या. त्याचप्रमाणे नागरिकांची कामे देखील होत नव्हती. नागरिकांना हेलपाटे मारावे लागत होते. त्याचप्रमाणे पीएमआरडीएमधील बांधकाम विभागातील निम्म्याहून अधिक अधिकारी, कर्मचारी हे निवडणूक कामांमध्ये होते. सोमवारपासून हे अधिकारी आता आपल्या मूळ जागी रुजू होतील. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून संथ सुरू असलेली कामे वेगाने होतील.
दुसरीकडे, पिंपरी-चिंचवड आरटीओ विभागातील लिपिक कर्मचाऱ्यांना पुणे, मावळ, पिंपरी, चिंचवड या विविध ठिकाणी निवडणूक कामासाठी पाठवले होते. या कार्यलयातील खटला विभागातील सर्वच अधिकारी बाहेर असल्याने हा विभाग जवळपास बंदच ठेवावा लागला होता. त्याचप्रमाणे आरटीओची कामे देखील खोळंबली होती. त्यांना देखील आता वेग येण्याची शक्यता आहे.