संग्रहित छायाचित्र
महापालिकेच्या वतीने शहरासह उपनगरातील अनेक भागात रस्त्यांसाठी कोट्यवधींचा खर्च करण्यात आला आहे. वाहतूक सुरळीत होऊन नागरिकांना कोंडीचा त्रास होऊ नये, हा त्यामागील उद्देश आहे. मात्र, रस्त्यांवरून वाहतूक सुरळीत होण्याऐवजी रस्त्याच्या कडेलाच दुचाकी, चारचाकी गाड्या पार्किंग केल्या जात असून प्रमुख रस्त्यांवर वाहतूक कोंडी होऊन रस्ते ठप्प होत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी, पादचारी नागरिक, महिला, मुलीसह विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे बेशिस्त पार्किंग प्रस्थ वाढत आहेच, परंतू, फूटपाथवर करोडोचा खर्च करुन ते नागरिकांना चालण्यासाठी नव्हे तर व्यावसायिकांना व्यवसाय करण्यासाठी केले जात आहेत का,असाही सवाल होत आहे.
पिंपरीचिंचवड शहरातील रहदारी विचारात घेऊन रस्ते विकसित करण्यासाठी महापालिकेने सुरुवात केली आहे. महापालिकेने शहरी पथ धोरणांतर्गत ( अर्बन स्ट्रीट गाइड लाइन्स) नूसार शहरातील विविध प्रमुख रस्ते विकसित केले जात आहे. यामध्ये सार्वजनिक वाहतुकीसाठी सुसज्ज रस्ते, पादचारी मार्ग, सायकल स्वारांसाठी सायकल मार्ग, टू व्हीलर आणि फोर व्हीलरला पार्किंग पार्किंग स्पाॅट, आकर्षक पथदिवे, या सर्व सुविधा नागरिकांना उपलब्ध होतील, असा महापालिकेचा प्रयत्न आहे. अर्बन स्ट्रीट डिझाईननुसार महापालिकेच्या वतीने नागरिक व लहान मुलांसाठी शहरात ठिकठिकाणी सायकल ट्रॅक उभारण्यात येत असून पादचारी मार्ग देखील प्रशस्त बनवून आकर्षक केले जात आहेत. शहरातील अर्बन स्ट्रीट डिझाईननुसार बनवलेल्या रस्त्यांना आता अतिक्रमणांचे ग्रहण लागले आहे.
प्रमुख रस्त्यांवर वाहनांची गर्दी मोठ्या प्रमाणावर असते, तर वाहने रस्त्याच्या दुतर्फा पदपथावर बेशिस्तपणे पार्किंग केली जात असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. वेळप्रसंगी वाहन चालकांबरोबर नागरिकांचे वाद-विवाद होत असल्याचे चित्र आहे. अनेक वेळा पायी चालणाऱ्या नागरिकांना दुचाकींचा धक्का लागतो. यामुळे नागरिकांना इजा होण्याचे प्रकार घडत आहेत. वाहनचालकांची रस्त्यातच हुज्जत सुरू असते. याकडे संबंधित विभाग दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. स्थापत्य प्रकल्प विभागाकडून पुणे-मुंबई महामार्ग, टेल्को रोड ते बालाजीनगर, पवना ब्रिज ते डांगे चौक, डांगे चौक ते भूमकर चौक आणि शिवार चौक ते गोविंद गार्डन हॉटेल हे रस्ते ‘विकसित करण्यात येत आहेत. तर स्थापत्य विभागाने संत तुकाराम नगर ते यशवंत नगर यासह अन्य काही रस्ते विकसित करायला घेतले आहेत. त्यावर सुमारे २०० कोटी रुपये खर्च झाले असून, रस्ते सुशोभीकरणाचा हा प्रकल्प अजूनही सुरू आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांवर आणि पदपथांवर ५६८ कोटी खर्च होणार आहे.
दरम्यान, शहरात सर्रास पदपथ वाहनांनी पार्किंगचे, हातगाडी, पथारी व व्यावसायिकांनी अतिक्रमण करुन व्यापले गेल्याने विद्यार्थी तसेच नागरिकांना वाहतूक कोंडीतून रस्ता शोधत चालावे लागत आहे. महापालिका प्रशासनाने रस्त्यांना येणारे वाहनतळाचे स्वरूप याकडे विशेष लक्ष देऊन पादचारी नागरिकांना शहरात बाजारपेठेत ये-जा करताना त्रास होणार नाही, याबाबत काळजी योग्य त्या उपाययोजना करणे आवश्यक आहे.
सुस्थितीतील रस्त्यांची रूंदी झाली कमी
जूना पुणे-मुंबई महामार्ग, टेल्को रोड ते बालाजीनगर, पवना ब्रिज ते डांगे चौक, डांगे चौक ते भूमकर चौक आणि शिवार चौक ते गोविंद गार्डन हॉटेल या पाच रस्त्यांवर अर्बन स्ट्रीट अंतर्गत पदपथ विकसित आणि सुशोभीकरण करण्यात येत आहे. पुणे-मुंबई महामार्ग बीआरटीमुळे अरुंद झाला आहे. पायी चालणाऱ्यांची संख्या वाहनांच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. रस्ते अर्बन स्ट्रीटनुसार विकसित झाल्यानंतर रस्त्याची रुंदी आणखी कमी होवून वाहतुक कोंडीचा सामना करावा लागणार आहे.
प्रशस्त पदपथावर चालताच येईना
शहरात पथ धोरणातंर्गत रस्ते विकसित करताना रस्ते रुंद आणि फूटपाथ प्रशस्त केले जात आहेत. त्यामुळे पादचा-यापेक्षा छोट्या - मोठ्या व्यावसायिकांना अधिक फायदा होऊ लागला आहे. अनेक पदपथांवर दुकानदार, विक्रेते, वाहनचालक अतिक्रमण करत आहेत. दुकानदार साहित्य पदपथावर मांडतात. वाहने थेट पदपथावरच पार्क केलेली दिसून येत आहेत. हातगाडी, पथारीवाले टेबल, खुर्च्या मांडूनच व्यवसाय थाटले आहेत. या अतिक्रमणांकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत असून पादचारी नागरिकांना आणखी देखील रस्त्यावरून चालावे लागत आहे. त्यामुळे हा खर्च नेमका कोणासाठी असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पिंपळे सौदागरचा रस्ता नेमका कशासाठी?
पिंपळे सौदागरमधील प्रशस्त रस्ता रहदारीसाठी की पार्किंगसाठी हेच कळेनासे झाले आहे. रस्त्यावर होणाऱ्या पार्किंगला प्रतिबंध करून कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. पार्किंगमुळे अनेकदा मोठ्या वाहनांचा खोळंबा झाल्याने रस्त्यावर वाहतूक कोंडी होत आहे. शालेय मुलांच्या बस अडकून पडतात. परिणामी विद्यार्थ्यांना शाळेला उशीर होतो.
मोरवाडी चौकात वाहतूक कोंडी
मोरवाडी परिसरातील मुख्य रस्त्यावर पार्किंगमुळे रहदारीस अडथळा होऊन कोंडी होत आहे. मुख्य रस्ता असल्याने या रस्त्यावरून सकाळी व रात्री मोठी वर्दळ असते. मुख्य रस्ता कडेला चारचाकी वाहने, दुचाकी पार्किंग केल्याने आधीच अरुंद असलेला रस्ता रहदारीसाठी अपुरा पडत आहे. सकाळी विद्यार्थी बस, रिक्षा चाकरमानी मंडळी यांची या रस्त्यावर मोठी वर्दळ असते. दुतर्फा पार्किंगमुळे येथे कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे.
मुख्य रस्त्यावर आडवी तिडवी वाहने
पिंपरीतील आंबेडकर चौक ते एम्पायर- चिंचवडच्या मुख्य रस्त्यावर अहिल्याबाई होळकर चौक ते चिंचवड स्टेशन या मार्गावरील बी झोन कॉम्प्लेक्स, जयहिंद कलेक्शन ते रांका ज्वेलर्स या दुकानांसमोरील मार्गावर मोठ्या प्रमाणावर पार्किंग केली जाते. ग्राहक मंडळी एक ते २ तास वाहने पार्क करून गायब असतात. यामुळे सायंकाळी दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.