Pimpri Chinchwad: विद्यार्थी सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर

महापालिकेच्या चिंचवड (Chinchwad) येथील माध्यमिक शाळेच्या दुसऱ्या मजल्यावरुन पडून एका विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर महापालिका शिक्षण विभागाचे अधिकारी खडबडून जागे झाले आहेत.

संग्रहित छायाचित्र

शाळा व्यवस्थापन समिती करणार ‘स्कूल सेफ्टी वॉक थ्रू’, सुरक्षेसाठी येणार मार्गदर्शिका, व्यवस्थापन समिती सदस्य करणार सुरक्षा ऑडिट

विकास शिंदे
महापालिकेच्या चिंचवड (Chinchwad) येथील माध्यमिक शाळेच्या दुसऱ्या मजल्यावरुन पडून एका विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर महापालिका शिक्षण विभागाचे अधिकारी खडबडून जागे झाले आहेत. आता 'बालकांच्या सुरक्षेसाठी पालकांची भूमिका' यावर मेळावा घेण्यात आला असून शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांकडून मेळाव्यानंतर आपल्या शाळेतील मुख्याध्यापकांसोबत ‘स्कूल सेफ्टी वॉक थ्रू’ करणे गरजेचे असणार आहे. त्यासाठी सर्व शाळांना मार्गदर्शिका देण्यात येणार आहे. या मार्गदर्शिकेच्या आधारे सर्व समिती सदस्य आपल्या शाळेचे सुरक्षा ऑडिट करण्यास मदत होणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या विकासासाठी विविध उपक्रम राबवले जातात. हे उपक्रम राबवण्यासाठी व त्यांचे संचालन करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती कार्यरत आहे. या अनुषंगाने शाळा व्यवस्थापन समितीने 'बालकांच्या सुरक्षेसाठी पालकांची भूमिका' या विषयावर आज ( २२ फेब्रुवारी) आकुर्डी प्राधिकरण येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहामध्ये सकाळी १०.३० ते दुपारी १.३० या कालावधीमध्ये मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्यास सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, सर्व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य तसेच विद्यार्थी व प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. यावेळी आयुक्त शेखर सिंह व अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.

तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या मेळाव्यासाठी, रस्ते सुरक्षा, बाल लैंगिक शोषण व बाल सुरक्षा अशा विविध विषयांवर काम करणाऱ्या 'मुस्कान फाउंडेशन' व पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत काम करणाऱ्या 'दामिनी पथक' तसेच 'पोलीस मित्र' यांसारख्या संस्थांचे प्रतिनिधीही उपस्थित राहणार आहेत  पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयामार्फत चालवल्या जाणाऱ्या 'महिला सहाय्य कक्ष', 'पोलीस काका / दीदी', ११२ हेल्पलाइन नंबर अंतर्गत असणारे 'दामिनी पथक' तसेच 'पोलीस मित्र' आदींच्या उपक्रमांबाबत माहिती देण्यात येणार आहे. यावेळी 'मुलांच्या सुरक्षिततेमध्ये पालकांची भूमिका' या विषयावर मार्गदर्शनही करण्यात येणार आहे. त्याबरोबरच, रस्ते सुरक्षिततेबाबत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचे उद्घाटन आणि त्याबाबत जनजागृती केली जाणार आहे.

शाळा सुरक्षा ऑडिटवर होणार मार्गदर्शन

शाळा व्यवस्थापन समितीच्या मेळाव्यामध्ये महापालिकेच्या शिक्षण विभागामार्फत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यात येणार आहे. हा मेळावा विविध सत्रांमध्ये पार पडणार असून, यामध्ये पर्यवेक्षक सन्मानचिन्ह वितरण समारंभ, रस्ते सुरक्षा प्रकल्पाचे उद्घाटन, 'मुस्कान फाउंडेशन' व पोलीस आयुक्तालयामार्फत विविध उपक्रमांबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. यावेळी 'शाळा सुरक्षा ऑडिट व शाळा व्यवस्थापन समितीची भूमिका आणि नवे पुढाकार' याबाबत प्रशासन अधिकारी संजय नाईकडे मार्गदर्शन करणार आहेत.

रस्ते सुरक्षा, बाल लैंगिक शोषण व बाल सुरक्षा अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. शाळा व्यवस्थापन समिती मेळाव्यात मिळालेल्या माहितीचा वापर महापालिका शाळांमध्ये विविध उपक्रम राबवण्यासाठी होणार आहे.

-विजयकुमार थोरात, सहाय्यक आयुक्त, शिक्षण विभाग, महानगरपालिका

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest