पिंपरी-चिंचवड : पवना, इंद्रायणी नदीचे पाणी कोण करतेय खराब?
पवना, इंद्रायणी नद्यांचे पाणी दिवसेंदिवस आणखी खराब होत आहे. पवना नदी आणि इंद्रायणी नदी अतिप्रदूषित (Indrayani river pollute) झाली आहे. मागील चार दिवसांपासून थेरगाव केजुदेवी बंधाऱ्याजवळ पाण्यावर फेस तरंगत आहे, तर इंद्रायणी नदीच्या पाण्यावर वारंवार पाण्यावर फेस येत आहे. नद्यांचे पाणी खराब करणाऱ्यांवर कडक कारवाई होत नसल्याने केमिकलयुक्त व सांडपाणी प्रक्रिया न करता नद्यात सोडले जात आहे. याकडे महापालिका पर्यावरण विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ हे नदीकाठच्या परिसराची पाहणी करून कुठलीही ठोस कारवाई न केल्याने नदी फेसाळू लागल्याचा आरोप पर्यावरणप्रेमी करू लागले आहेत.
पवना नदीतील पाणी शहरातील सुमारे ३० लाख नागरिक पीत आहेत. त्याच पिण्याच्या पाण्यात काही कंपन्या, सोसायट्या, लाॅड्री व्यावसायिक हे मैलामिश्रित, रसायन व केमिकलयुक्त, नाल्याचे सांडपाणी, ड्रेनेज, लाॅंड्री कपडे धुतलेले पाणी मिसळत आहे. त्यामुळे नद्यांमधील आॅक्सिजन लेवल कमी होऊन जलचर प्राणीदेखील मृत पावत आहेत. पवना नदी सातत्याने फेसाळत आहे. नदीवर १२ मे पासून आजही नदीतील पाण्यावर पांढरा फेस तरंगतो आहे. थेरगावच्या केजुदेवी बंधारा या भागात नदी मोठ्या प्रमाणात फेसाळत आहे. नदीतील पाण्याची गटारातील पाण्यापेक्षा दुर्गंधी येऊ लागली आहे.
तसेच इंद्रायणी नदीकाठच्या गावातील मैलामिश्रित सांडपाणी, कारखान्यातील केमिकलयुक्त पाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता थेट ते इंद्रायणी नदीपात्रात सोडले जाते. यामुळे इंद्रायणी नदी जलप्रदूषणाने फेसाळलेली दिसून येत आहे. १३ मे रोजी आळंदी येथील सिध्दबेट जवळील बंधाऱ्यावर नदीपात्र मोठ्या प्रमाणात फेसाळलेले दिसून आले होते. या संदर्भातील व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तर १४ व १५ रोजी सकाळी काहीशा प्रमाणात नदीपात्र प्रदूषित पाण्याने फेसाळलेले होते. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळा दीड महिन्यावरती आलेला आहे. गेले दोन-तीन दिवस इंद्रायणी नदी प्रदूषणाने फेसाळलेली दिसून येत आहे. राज्यातून लाखो भाविक आळंदीसह देहूत पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी येत असतात.
राज्यातून विविध ठिकाणावरून आलेल्या वारकरी भाविकांना या नदी प्रदूषणाबाबत पुरेशी माहिती नसल्याने या नदीतील पाणी पवित्र तीर्थ म्हणून प्राशन करत असतात. यामुळे त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. तसेच त्यांना आरोग्याचे विविध आजार बळावण्याची दाट शक्यता आहे. वारकरी हात, पाय हे नदीतील पाण्याने धूत असतात. त्यामुळेच त्वचारोग होण्याचा धोका संभवतो. या नदीतील जलप्रदूषणाने नदी पात्राजवळील कूपनलिकांवर परिणाम होतो. ते सुद्धा जलप्रदूषित होऊन पिण्यास अयोग्य होते. सद्यस्थितीत सिध्दबेट जवळील बंधाऱ्यातून हिरवेगार व पिवळसर असे प्रदूषित पाणी बंधाऱ्यातून नदीपात्रात पडताना दिसत आहे. हा फेस नदीच्या उगमापासून आहे की, कोणी तरी पाण्यात सोडलेल्या केमिकल मिश्रितचा आहे. महापालिका पर्यावरण विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून ठोस कृती उचलण्याची गरज आहे. केवळ पाहणी करायची, दोन-चार ठिकाणी पाण्याचे नमुने घ्यायचे आणि पुन्हा पाढे पंचावन्न अशी गत होऊ लागली आहे. जल प्रदूषण होऊ नये यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने योग्य ती उपाययोजना करावी. जलप्रदूषण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली.
कागदी घोडे नाचवणे बंद करा..
सांडपाणी असो, मैलामिश्रित किंवा रसायनमिश्रित पाण्यामुळे पवना आणि इंद्रायणी नदी मृत झाली आहे. नदीच्या पाण्यावर पांढऱ्या रंगाने फेसाळली जाते, तरीही नदी कशामुळे फेसाळत आहे, याचा शोध देखील घेतला जात नाही. दरवेळेस कोणाला तरीही बळीचा बकरा करायचा आणि कागदी घोडे नाचवत कारवाई केल्याचा फार्स करण्यापलीकडे काहीही होताना दिसत नाहीत. नदीच्या पाण्यावर फेस तरंगत असताना देखील महापालिकेच्या पर्यावरण विभागाला किंवा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाला कसलेही सोयरसुतक नसल्याचे दिसून येत आहे.
केमिकलयुक्त पाणी सोडणाऱ्यांवर गुन्हा दाखल
चिखलीतील इंद्रायणी नदीपात्रात रसायनयुक्त पाणी सोडून नदी प्रदूषण केल्याने महापालिकेने भंगार व्यावसायिकांवर कारवाई केली आहे. भंगार व्यावसायिकांवर पोलिसात गुन्हा नोंदवत भंगार गोदाम सील करण्यात आले आहे. रेहान एंटरप्रायजेसचे मालक अब्दुलमलीक अब्दुलजब्बार खान (रा. जाधववाडी, चिखली) याच्या विरोधात चिखली पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम २७८, पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६ कलम १५, महापालिका अधिनियम ३७६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी खान याचे कुदळवाडी परिसरात भंगारचे गोदाम आहे. त्याच्या गोदामातून रसायनयुक्त हिरवे लाल रंगाचे सांडपाणी इंद्रायणी नदीत मिसळत असल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत महापालिकेकडून पाहणी करून खातरजमा करण्यात आली. पालिकेने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत भंगार गोदाम सील करत गोदाम मालकावर गुन्हा नोंदवला आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.