संग्रहित छायाचित्र
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तळेगाव शाखेच्या वतीने घेण्यात येणारा यंदाचा पुरस्कार नुकताच जाहीर करण्यात आला आहे. यानिमित्त देण्यात येणारा 'कलागौरव' पुरस्कार 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम विशाखा सुभेदार (Vishaka Subhedar) व पंढरी कांबळे (Pandharinath Kamble) यांना अभिनेत्री अलका कुबल यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. येत्या रविवारी (१९ मे) त्या पुरस्काराचे वितरण होणार आहे.
याबाबतची माहिती नाट्य परिषद तळेगाव दाभाडे शाखेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश धोत्रे यांनी दिली. पुरस्कार प्रदान समारंभ येत्या रविवारी सायंकाळी ६.०० वाजता कै. गोळवलकर मैदान (गोल मैदान) यशवंत नगर, तळेगाव दाभाडे स्टेशन येथे आयोजित करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे नाट्य परिषदेचे सल्लागार चंद्रकांत भिडे यांना अमृत महोत्सवानिमित्त जीवनगौरव पुरस्कार, तर नाट्य परिषदेचे कोषाध्यक्ष नितीन शहा व नाट्य परिषदेचे आधारस्तंभ ज्येष्ठ रंगकर्मी अभय लिमये यांना विशेष पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. नाट्य परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त मधुमित निर्मित मधुसूदन ओझा प्रस्तुत रजनीगंधा या मराठी व हिंदी गीतांच्या मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे मावळचे आमदार सुनील शेळके, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती शाखेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.