पिंपरी-चिंचवड: नागरिकांचे बळी घेणारे धोकादायक जाहिरातफलक हटवा; आमदार आण्णा बनसोडे यांची मागणी

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत अनेक ठिकाणी धोकादायक जाहिरात फलक उभारण्यात आलेले आहेत. हे जाहिरात फलक चौका-चौकात, झोपडपट्टी शेजारी, दुमजली आणि परवानगी पेक्षा मोठ्या आकाराचे होर्डिंग लावण्यात आलेले आहेत. त्या होर्डिगवर तात्काळ कारवाई करुन ते जाहिरात फलक हटविण्यात यावेत, अशी मागणी पिंपरीचे आमदार आण्णा बनसोडे यांनी केली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Thu, 16 May 2024
  • 02:14 pm

संग्रहित छायाचित्र

आयुक्त शेखर सिंह यांना दिले पत्र

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत अनेक ठिकाणी धोकादायक जाहिरात फलक उभारण्यात आलेले आहेत. हे जाहिरात फलक चौका-चौकात, झोपडपट्टी शेजारी, दुमजली आणि परवानगी पेक्षा मोठ्या आकाराचे होर्डिंग लावण्यात आलेले आहेत. त्या होर्डिगवर तात्काळ कारवाई करुन ते जाहिरात फलक हटविण्यात यावेत, अशी मागणी पिंपरीचे आमदार आण्णा बनसोडे यांनी केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना आमदार बनसोडे यांनी पत्र दिले आहे. त्या पत्रात म्हटले आहे की, घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेत निष्पाप १६ सामान्य नागरिकांचा बळी गेला आहे. ही अतिशय दुर्देवी घटना असून या घटनेचा बोध घेऊन पिंपरी चिंचवड शहरातील धोकादायक व अनधिकृत होर्डिंग (जाहिरात फलक) वर तातडीने कारवाई करायला हवी. शहरात अनेक ठिकाणी चौका-चौकात, दूकाना शेजारी, झोपडपट्टीलगत, सिग्नल, उड्डाणपूललगत, महामार्गावर शेकडो होर्डिग आहेत. अनेक होर्डिग दुमजली व मोठ्या साईजचे होर्डिंग आहेत. काही होर्डिग हे पीएमपीएमएल बस स्टॉपवरील देखील लावण्यात आलेले आहेत. आता पावसाळ्याचे दिवस सुरु होणार आहेत. वादळ, वारा आणि अवकाळी पावसामुळे हे होर्डिग पडण्याची दाट शक्यता आहे.

मागील वर्षी किवळे येथील महामार्गावर विना परवानगी असलेले होर्डिंग पडून त्या दुर्घटनेत सामान्य चार नागरिकांचा नाहक बळी गेला होता. या घटनेची आपल्या शहरात पुनरावृत्ती होऊ नये याबाबत महापालिकेने खबरदारी घेण्यात यावी, याविषयी आकाशचिन्ह व परवाना विभागाने शहरातील धोकादायक असलेल्या होर्डिगचा सर्वे करणे आवश्यक आहे. शहरात शेकडो  जाहिरात फलक अनधिकृत आहेत. पण, आकाशचिन्ह व परवाना विभागाकडून लपवाछपवी करत आहे. दुमजली जाहिरात फलकास परवानगी नसताना अनेक जाहिरात फलक आजही दिसत आहेत. यावर कारवाई महापालिका प्रशासनाने तत्काळ करावी. महापालिकेने सामान्य नागरीकाचा जीव धोक्यात घालू नये. बिल्डरांचे अनधिकृत किऑस्क काढून टाकावेत,  तसेच शहरात जाहिरात फलकामुळे कोणतीही जीवित हानी झाल्यास यास महापालिका प्रशासनाने संबंधित होर्डिंग मालक व ज्या जागा मालक यांच्यावर कठोर कारवाई तर करावीच. परंतु ज्या परवाना निरीक्षकांचे दुर्लक्ष झाल्यास संबंधित कर्मचा-याला जबाबदार धरण्यात यावे अशी मागणी बनसोडे यांनी केली आहे.

दरम्यान, महापालिका हद्दीत जाहिरातील फलक हे २० बाय २० फूटापेक्षा मोठे नसावेत. अवजड जाहिरात फलकांवर कारवाई करावी, होर्डिंग स्ट्रक्चरल आॅडीट करावे, मनपा परवानगी पेक्षा जाहिरात होर्डिंगचे स्ट्रक्चर मोठे आहे. ते जाहिरात स्ट्रक्चर तात्काळ काढावे, दुमजली होर्डिंग , पाठपूठ होर्डिंग देखील मनपाने कारवाई करावी. त्याशिवाय पीएमपीएमएल बस स्टॉप वरील लावलेले जाहिरात फलक मंजूर साईजपेक्षा अधिक साईजचे असून त्यावरही कारवाई करावी, अशीही मागणी आमदार बनसोडे यांनी केली आहे.  

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest