पिंपरी-चिंचवड: शहरातील अनधिकृत होर्डिंग सोमवारपासून काढणार

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील अनधिकृत होर्डिंगचे सर्वेक्षण सुरू केले आहे. येत्या दोन दिवसात हे सर्वेक्षण पूर्ण करण्यात येईल. त्यानंतर त्या अनधिकृत होर्डिंगवर सोमवारपासून (२० मे) आकाशचिन्ह व परवाना विभागाकडून कारवाई करण्यात येईल, अशी माहिती उपायुक्त संदीप खोत यांनी दिली.

Hoarding collapse

संग्रहित छायाचित्र

महापालिकेकडून अनधिकृत होर्डिंग सर्वेक्षण सुरू, शुक्रवारी होणार होर्डिंग मालक, चालकांची बैठक

पिंपरी-चिंचवड महापालिका (PCMC) हद्दीतील अनधिकृत होर्डिंगचे (Hoarding) सर्वेक्षण सुरू केले आहे. येत्या दोन दिवसात हे सर्वेक्षण पूर्ण करण्यात येईल. त्यानंतर त्या अनधिकृत होर्डिंगवर सोमवारपासून (२० मे) आकाशचिन्ह व परवाना विभागाकडून कारवाई करण्यात येईल, अशी माहिती उपायुक्त संदीप खोत यांनी दिली.

अनधिकृत होर्डिंग कोसळून होणाऱ्या अपघातांचा संभाव्य धोका लक्षात घेता महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाकडून तत्काळ शहरामध्ये सर्वंकष सर्वेक्षणास बुधवारपासून (१५ मे) सुरुवात करण्यात आली. महापालिकेच्या आठ झोनमध्ये परवाना निरीक्षकांद्वारे शुक्रवारपर्यंत दोन दिवसीय सर्वेक्षण पूर्ण करण्यात येणार आहे. सर्वंकष सर्वेक्षणासाठी नोडल अधिकारी म्हणून संदीप खोत हे स्वतः देखरेख करत असून अनधिकृत होर्डिंगवर तत्काळ कारवाई करणार आहेत. तसेच आकाशचिन्ह व परवाना विभागाने शुक्रवारी (१७ मे) होर्डिग चालक, मालकांची पुन्हा एकदा महत्त्वपूर्ण बैठक बोलावली असून सर्वेक्षणाच्या निष्कर्षांवर विचार करण्यासाठी होर्डिंग मालकांना बैठकीसाठी बोलवण्यात आले आहे.

दरम्यान, या सर्वेक्षणात होर्डिंगचे आकारमान हे प्रत्यक्ष आणि मंजूर किती आहे. होर्डिंगची जमिनीपासून उंची, एकूण अधिकृत आणि अनधिकृत होर्डिंग किती,  होर्डिंगच्या जागेची मालकी, चालक कोण आहे. सर्वेक्षणामध्ये होर्डिंग्ज कायदेशीर स्थितीचे मूल्यांकन, कोणत्याही प्रलंबित कायदेशीर कारवाईची छाननी, होर्डिंग मालकांचा तपशील तपासणी, होर्डिंगच्या स्ट्रक्चरल स्थिरता प्रमाणपत्रांची पडताळणी, अनधिकृत होर्डिंगमुळे उद्भवणाऱ्या संभाव्य रहदारी अडथळ्यांचे मूल्यांकन करण्यासाठी सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. यामध्ये होर्डिंगचे ठिकाण/पत्ता व त्याचे मंजूर व प्रत्यक्षात असलेले आकारमान तपासण्यात येणार आहे. त्याबरोबरच होर्डिंगची जमिनीपासूनची उंची, होर्डिंग अधिकृत आहे की अनधिकृत, होर्डिंगला पत्रा लावण्यात आला आहे की नाही, वाहतुकीस अडथळा देणारे होर्डिंग, कोर्टामध्ये दावा सुरू असलेले होर्डिंग व त्याची रचना पूर्ण आहे की अपूर्ण, ही माहितीही सर्वेक्षणाच्या माध्यमातून तपासण्यात येणार आहे. तसेच महापालिका हद्दीत रेल्वे स्टेशन आणि त्यांच्या हद्दीत असणा-या होर्डिंगचीदेखील तपासणी करण्यात येईल. हे होर्डिंग अधिकृत आहेत का, याची खातरजमा करण्यात येईल. अनधिकृत असतील त्या होर्डिंगवर कारवाई करण्यासाठी रेल्वेच्या संबंधित अधिका-यांना पत्र देऊन कारवाई करण्यात येईल, असेही खोत यांनी सांगितले.

'१९१' अनधिकृत होर्डिंगवर कारवाई

किवळे येथील होर्डिंग दुर्घटनेनंतर मागील एक वर्षभरात १९१ अनधिकृत होर्डिंग निष्कासित करण्याची कारवाई करण्यात आली. त्यानंतर महापालिका हद्दीतील आणखी होर्डिंग असतील त्यांचे सर्वेक्षण करून त्यावर देखील लवकरच कारवाई केली जाईल.

"शहरातील होर्डिंगबाबत संभाव्य जोखीम ओळखून सर्वंकष सर्वेक्षण महत्त्वाचे आहे. शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी होर्डिंगबाबतची माहिती संकलित करण्यासाठी सदर सर्वेक्षण करण्यात येत आहे. या सर्वेक्षणास मालक व संबंधितांनी सहकार्य करावे. त्याचबरोबर शहरातील अनधिकृत होर्डिंगधारक मालकांनी दोन दिवसांमध्ये आपले अनधिकृत होर्डिंग काढून अपेक्षित उपाययोजना करण्यात याव्यात."
- शेखर सिंह, आयुक्त पिंपरी-चिंचवड महापालिका

"ज्या होर्डिंगबाबत विभागाने सूचित केलेल्या बाबींची कमतरता असणाऱ्या होर्डिंगवर आम्ही सोमवारपासून कारवाईची अंमलबजावणी करणार आहोत. त्यासोबतच संबंधित विभागीय अधिकाऱ्यांच्या सहकार्याने सर्वेक्षणाच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीची पडताळणी करणार आहोत."
- चंद्रकांत इंदलकर , सह आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest