पिंपरी-चिंचवड: ग्रेडसेपरेटरच्या रस्त्याचा होतोय खेळ; निगडीतून बाहेर पडण्यासाठीचा रस्ता बंद, परस्पर बदलामुळे वाहनचालकांचा गोंधळ

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर ग्रेड सेपरेटरमधील (समतल विलगक) 'इन' आणि 'आऊट' या दोन्हींमध्ये परस्पर बदल करण्यात येत आहेत. ग्रेड सेपरेटरमधून निगडी उड्डाणपुलनजीक असलेला बाहेर पडण्यासाठीचा रस्ता बंद करण्यात आला आहे.

निगडीतून बाहेर पडण्यासाठीचा रस्ता बंद, परस्पर बदलामुळे वाहनचालकांचा गोंधळ

पंकज खोले

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर ग्रेड सेपरेटरमधील (समतल विलगक) 'इन' आणि 'आऊट' या दोन्हींमध्ये परस्पर बदल करण्यात येत आहेत. ग्रेड सेपरेटरमधून निगडी उड्डाणपुलनजीक असलेला बाहेर पडण्यासाठीचा रस्ता बंद करण्यात आला आहे. त्यामुळे प्राधिकरण आणि यमुनानगरमध्ये जाणाऱ्या वाहनचालकांना निगडी भक्ती-शक्ती चौकात जाऊन वळसा मारून इच्छित स्थळी जावे लागत आहे. परिणामी आकुर्डीपासून निगडी भक्ती-शक्ती चौकापर्यंत सेवा रस्त्यावर वाहतूक कोंडी आता नित्याची बाब बनली आहे.

असाच प्रकार वल्लभनगर येथेही करण्यात आला आहे. त्यामुळे या बदलामुळे वाहनचालकांचा मोठा गोंधळ उडत आहे. यामुळे वाहने उलट्या बाजूने दमटण्याचा प्रकार सुरु आहे. भविष्यात या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. निगडी येथे दिवंगत मधुकर पवळे उड्डाणपूल सुरू होण्यापूर्वी ग्रेडसेपरेटरमधून बाहेर पडण्यासाठी रस्ता आहे. या रस्त्यावर मध्यंतरी पुलापासून सुमारे २५ फूट खोदकाम करण्यात आले होते. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. त्याचप्रमाणे येथून जाणारा बीआरटी मार्गाला देखील अडथळा निर्माण झाला होता. त्यानंतर हा मार्ग पूर्ववत करण्यात येईल, अशी अपेक्षा स्थानिक नागरिक करत होते. या कामामुळे बीआरटीची मार्गाची देखील मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे.

दरम्यान, या ठिकाणच्या मार्गात आता बदल करण्यात आला असून, बाहेर पडण्याचा मार्ग बंद करण्यात आला आहे. प्रत्यक्षात रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला बाहेर पडण्याचा मार्ग आहे. मात्र हा मार्ग बंद करण्यात आला आहे. या मार्गातून केवळ वाहने येण्यासाठीचा रस्ता करण्यात आला आहे. परिणामी, अचानक केलेल्या बदलामुळे वाहनचालकांचा पुरता गोंधळ उडाला आहे. यामुळे चालकांना नक्की वळण घ्यावे कुठे, असा प्रश्न पडला आहे. परिणामी, वाहनचालक तेथून बीआरटी मार्गातून मागे येऊन वळतात. त्यामुळे समोरून येणारी बीआरटी मार्गातून पीएमपी बस अथवा अन्य वाहन आल्याने कोंडी होते. भविष्यात वाहन येताना न दिसल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. निगडी चौकात जाणाऱ्या वाहनचालकांची कुचंबणा झाली आहे. बीआरटी मार्गातून पुन्हा सेवा रस्त्यावर उलट्या दिशेने येण्याशिवाय त्यांच्यापुढे पर्याय नाही. कारण, त्यांना या चौकात जाण्यासाठी पुढे वळसा मारून पुन्हा यावे लागते. यापूर्वी या ठिकाणी बाहेर जाण्याचा मार्ग असल्याने वाहन चालक याचा वापर करत होतो. मात्र, अचानक तो बंद केल्याने वाहन चालकाचा लक्ष राहत नाही. परिणामी त्यांना पुन्हा पुढे जावे लागत आहे. त्यातच या मार्गातून उलट्या दिशेने वाहने जाण्यासाठी वळण घ्यावे लागते. त्यासाठी रस्त्यावरच वाहने थांबवली जातात. मात्र त्यामुळे मागून येणारी वाहने वेगात असतात. यामुळे या ठिकाणी अपघात होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, केवळ या एकच मार्गावर नव्हे तर, गेला काही दिवसात या ग्रेड सेपरेटरमध्ये परस्पर बदल करण्यात आले आहेत. वल्लभनगर या ठिकाणी देखील असाच बदल केला होता. त्यामुळे या मार्गातील इन आणि आऊट चा खेळ प्रशासनाकडून सुरूच आहे. याचा फटका मात्र वाहन चालकांना बसत आहे.

राजकीय सोईपोटी कारभार

या रस्त्यातून बाहेर पडण्यासाठी सोईस्कर व्हावे, यासाठी काही राजकीय हस्तक्षेप होत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या रस्त्यात वेळोवेळी बदल करण्यात येत आहे. आपल्या सोयीनुसार रस्त्यातून बाहेर आणि आत हा बदल करण्यामागे राजकीय हात असून, त्या माध्यमातून केलेला बदल सामान्य नागरिकांना भोगावा लागत आहे.

पीएमपी प्रशासनाकडून होणार पाहणी

ग्रेड सेपरेटरमधील या बदलामुळे बीआरटी मार्गाला अडथळा निर्माण झाला आहे. त्याबाबत पीएमपी प्रशासनाकडून त्याची माहिती घेण्यात आली आहे. काही ठिकानी मार्गात तोडफोड झाली असून, ती महापालिकेकडून पूर्ववत करण्यात येणार आहे. दरम्यान, या संपूर्ण बाबतची लवकरच पाहणी करण्यात येईल, अशी माहिती  पीएमपी बीआरटीचे प्रमुख अनंत वाघमारे यांनी सांगितले.

बीआरटी मार्ग तोडला ?

ग्रेडसेपरेटरमध्ये वाहने आत जाण्यासाठी बीआरटी मार्ग काढून टाकण्यात टाकण्यात आला आहे. तसेच, बीआरटी मार्गातील बॅरिगेडसही काढली आहेत. त्यामुळे या मार्गावर बीआरटी रस्त्याला मोठा अडथळा निर्माण झाला आहे. त्यातच उलट्या दिशेने येणारी वाहने मार्गातील प्रमुख अडचण ठरली आहे. या मार्गात बदल करण्याबाबत पीएमपीएमएल प्रशासनास कळवणे आवश्यक होते. मात्र तशी माहिती दिली नसल्याचे निदर्शनास आले आहे.

या रस्त्यात अचानक बदल करण्यात आल्याने बाहेर पडण्यासाठी पुढे वळसा मारावा लागतो. या ठिकाणी हा बदल करण्यापूर्वी सूचनाफलक अथवा माहिती देणे आवश्यक होते. तसे न करता परस्पर केलेल्या बदलामुळे वाहन चालकांचा गोंधळ उडत आहे
-सौरभ देशमुख, वाहनचालक, प्राधिकरण

निगडे चौकातील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या हेतूने हा प्रयोग केला आहे. अशाच प्रकारे या रस्त्यावर चौकातील अलीकडची असणारे बाहेरचे मार्ग बंद करण्यात येणार आहे. जेणेकरून वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल. खंडोबा माळ चौक ते निगडी या दरम्यान एकही मार्ग आत जाण्यासाठी नव्हता. त्यामुळे हा मार्ग सोयीस्कर असल्याने त्यात बदल केला आहे. या मार्गाचा कोणालाही अडथळा येत नाही.
-बापूसाहेब गायकवाड, कार्यकारी अभियंता, वाहतूक नियोजन

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest