पिंपरी-चिंचवड: 'मायक्रोसॉफ्ट'चे खोदकाम नागरिकांसाठी ठरतेय डोकेदुखी; आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली

निगडी ते भोसरी रस्त्यावरील टाटा कंपनी गेटपासून यशवंतनगर ते लांडेवाडी चौकापर्यंत मायक्रोसाॅफ्ट कंपनीकडून रस्त्याचे खोदकाम सुरु केले आहे. एकाच वेळी दोन्ही बाजूने रस्ते खोदणे सुरु आहे. महापालिकेच्या दिलेल्या परवानगीपेक्षा अधिक रस्त्यांची लांबी आणि रुंदीचे खोदकाम केले जात असून नव्याने केलेल्या फूटपाथचीही दुरवस्था झाली आहे.

'मायक्रोसॉफ्ट'चे खोदकाम नागरिकांसाठी ठरतेय डोकेदुखी

१५ मे नंतर देखील रस्ते खोदकाम सुरुच, टाटा मोटर्स गेट ते लांडेवाडीपर्यंत दोन्ही बाजूने रस्ते खोदलेले

विकास शिंदे

निगडी ते भोसरी रस्त्यावरील टाटा कंपनी गेटपासून यशवंतनगर ते लांडेवाडी चौकापर्यंत मायक्रोसाॅफ्ट कंपनीकडून () रस्त्याचे खोदकाम सुरु केले आहे. एकाच वेळी दोन्ही बाजूने रस्ते खोदणे सुरु आहे. महापालिकेच्या दिलेल्या परवानगीपेक्षा अधिक रस्त्यांची लांबी आणि रुंदीचे खोदकाम केले जात असून नव्याने केलेल्या फूटपाथचीही दुरवस्था झाली आहे. संबंधित कंपनीने दोन्ही बाजूने बॅरिगेड लावून खोदकाम केल्याने वाहतूक कोंडी होत आहे.

रस्त्यांचे सततचे खोदकाम, त्यात ऑफिसला जाण्यास लागणारा विलंब, चौका-चौकात होणारी वाहतूक कोंडीने नागरिकांना प्रचंड मनस्ताप होऊ लागला आहे. विशेष म्हणजे १५ मे नंतर खोदकाम करू नये, असे आयुक्त शेखर सिंह यांचे आदेश असतानाही ते डावलून कंपनीकडून खोदकाम सुरु आहे. त्या कंपनीला स्थापत्य अधिकाऱ्यांचे पाठबळ मिळू लागले आहे. निगडी ते भोसरी हा टेल्को रस्त्यावर सतत वर्दळ असते. या रस्त्यावर टाटा कंपनीसह भोसरी एमआयडीसीकडे जाणाऱ्या कामगार वर्गाची ये-जा मोठ्या प्रमाणात असते. हा रस्ता भोसरी व चाकण एमआयडीसीकडे जाण्यासाठी मुख्य रस्ता आहे. याच रस्त्यावरुन मोठ्या अवजड वाहनांसह इतर वाहनांचीही सतत वर्दळ असते. त्यातच पीएमपीएमएल बसचा देखील समावेश आहे.

मायक्रोसाॅफ्ट कंपनीचे रस्त्याच्या कडेला भूमिगत केबल टाकण्याचे काम चालू केले आहे. हे काम करण्यासाठी संबंधित खासगी ठेकेदाराने खोदकामाला सुरुवात केली आहे. खोदकामामुळे रस्त्याचे नुकसान झाले असून वाहनचालकांना देखील अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे केएसबी चौक ते लांडेवाडी चौकापर्यंत अपघात होण्याची दाट शक्यता आहे. महापालिकेच्या स्थापत्य प्रकल्प यांनी टेल्को रस्त्यावर केएसबी चौक ते यशवंतनगरपर्यंत पहिल्या टप्प्यात रस्ते खोदकाम करण्यात आले होते. या रस्त्याचे खोदकाम पुर्ण होऊनही तो पूर्ववत करण्यात आलेला नाही. तोपर्यंत नव्याने यशवंतनगर ते लांडेवाडी चौकापर्यंत दूसऱ्या टप्प्यात खोदकाम सुरु केले आहे. केएसबी चौक ते बालाजीनगरपर्यंत या रस्त्यांचे चार महिन्यापूर्वी डांबरीकरण केले होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला फूटपाथ देखील तयार केले होते. रस्ता आणि फूटपाथ काम पुर्ण होताच लगेच रस्ते खोदकामाला परवानगी दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

डांबरीकरण केलेल्या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहन चालक हैराण झाले आहेत. सतत वर्दळ असलेल्या मुख्य रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. तसेच रस्ते खोदल्यानंतर त्यावर व्यवस्थित डांबरीकरण करणे आवश्यक असते. पण, खोदकाम करणारे त्याकडे दुर्लक्ष करतात. दरम्यान, महापालिकेच्या स्थापत्य विभागांत नियोजन नसल्याचे समोर आले आहे. तीन महिन्यात नव्याने बनवलेला रस्ता, फूटपाथ खोदकाम करत उखडला आहे. फूटपाथ आणि रस्त्यांचे डांबरीकरण केलेल्या टेल्को रोडवरील केएसबी चौक ते यशवंतनगर आणि पुढे लांडेवाडी रस्त्यावर केबल टाकण्यासाठी खोदकाम सुरु केले आहे. तर यशवंतनगर ते लांडेवाडीचौकापर्यंत 'क' क्षेत्रीय कार्यालयाने रस्ते खोदकामाला परवानगी दिलेली आहे. यामुळे डांबरीकरण केलेल्या रस्त्यांची वाट लागली आहे. पुन्हा रस्त्यावर खड्डे तयार होऊन अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

अधिकारी, कंपन्यांचे लागेबांधे?

पिंपरी-चिंचवड शहरात विविध सेवा वाहिन्या, केबल टाकण्यासाठी सतत रस्त्यांवर खोदकाम करणे, रस्त्यांची दुरुस्ती आणि डांबरीकरणाच्या कामात नियोजन न केल्याने रस्त्यांची वाट लागत आहे. रस्त्यांचे नव्याने डांबरीकरण, फूटपाथची कामे झाली. तरीही लगेच काही दिवसात हाच रास्ता उकरण्यात येत असल्याने नागरिकासह वाहनचालक त्रस्त झाले आहेत. शहरात जलवाहिनी, गॅस वाहिनी, केबल, महावितरणची कामे अशा विविध कामे करण्यासाठी दोन-तीन वेळा रस्ता खोदला जात आहे.  पाणी पुरवठा योजनेसाठी जलवाहिन्या टाकणे, महावितरण, विविध मोबाईल कंपन्या, एमएनजीएल, ड्रेनेज विभाग, यासह विविध सेवा वाहिन्या टाकण्यासाठी रस्त्यांची वाट लावली जात आहे. त्यानंतर रस्त्यांचे डांबरीकरण केले जाईल, असे सांगण्यात येते.   पण अनेक भागात रस्ते खोदल्यानंतर ठेकेदार ते चारीही बाजूने  माती टाकून तसेच निघून जातात. त्यानंतर वाहनांच्या वर्दळीमुळे मोठा खड्डा पडून वाहने यामध्ये आदळून अपघात होण्याची दाट शक्यता असते. खड्ड्यांमुळे तसेच परिसरात पसरलेल्या खडीमुळे वाहन घसरूनही सतत अपघात होतात, त्यामुळे रस्ता तयार झाला तरीही महापालिका अधिकारी व कंपन्याच्या आर्थिक लांगेबांध्यांमुळे खोदकामाला जोर चढला असल्याचे दिसत आहे.  

पुर्वी खोदलेला रस्ता दुरुस्त कधी करणार?

महापालिकेच्या स्थापत्य विभागाकडून मायक्रोसाॅफ्ट कंपनीने रस्ते खोदकामाची परवानगी घेवून केएसबी चौक ते लांडेवाडीपर्यंत रस्ता खोदण्यात आला.  यापुर्वी केएसबी चौक ते यशवंतनगर रस्त्यावरील दोन्ही बाजूने रस्ते उखडले आहेत. नवीन रस्ता व फूटपाथ उखडून रस्ते खोदलेले आहेत. त्या रस्त्यांचे खोदकाम पुर्ण झाले आहे. खोदलेल्या दोन्ही बाजूला केबल टाकण्यात आलेली आहे. खोदकाम केलेले खड्डे बुजवले असले तरीही रस्ता दुरुस्ती अद्याप झालेली नाही. त्यामुळे त्यावरुन अपघाताची दाट शक्यता आहे.  

आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली

महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी १५ मे नंतर पावसाळ्याच्या तोंडावर रस्ते खोदकाम करण्यात येऊ नये, असे आदेश दिलेले आहेत. पण, मायक्रोसाॅफ्ट कंपनीला यापुर्वीच खोदकामाला परवानगी दिली असल्याने १५ मे नंतर देखील कंपनीच्या ठेकेदाराकडून रस्ते खोदणे सुरु आहे. हे खोदकाम करताना तीन फूट रुंद आणि पाच फूट खोल असा रस्ता उखडला जात आहे. रस्ते खोदताना करताना बॅरिगेड लावले आहेत. पण, कामाची माहिती देणारा फलक लावणे  आवश्‍यक आहे, ही माहिती दिली जात नाही. महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी १५ मे नंतर खोदकाम करु नये, असा आदेश दिला आहे. या आदेशाला विभाग प्रमुखांनी ठेंगा दाखवत कंपन्यांना रस्ते खोदायला परवानगी दिली. अधिकारी निवडणूक कामकाजात गुंतले आहेत. त्यामुळे कंपन्याकडून रस्ते खोदणे जोरात सुरु आहे.

महापालिकेने टेल्को रोडवरील केएसबी चौक ते लांडेवाडी रस्त्यांचे खोदकाम सुरू आहे. मायक्रोसाॅफ्ट कंपनीची केबल टाकण्यासाठी रस्ते खोदण्याची परवानगी दिलेली आहे. खोदकामासाठी पाच कोटी रुपये शुल्क घेतले आहे. त्यानंतर परवानगी दिलेली आहे. पुर्वी केलेल्या केएसबी चौक ते यशवंतनगर रस्त्यांची दुरुस्ती करण्यास निविदा प्रक्रिया राबवली. पण आचारसंहितेमुळे ती अडकली आहे. त्यामुळे त्या रस्त्याची दुरुस्ती करता आलेली नाही. १५ मे नंतर रस्ते खोदकामाला कोणाला परवानगी दिली जाणार नाही. यापूर्वी संमती दिलेल्या रस्त्यांचे खोदकाम सुरू आहे. खोदकामाला परवानगी दिली असून केबल टाकल्यानंतर रस्ता तात्काळ दुरुस्त करण्यात येईल.
- मकरंद निकम,  शहर अभियंता, पिंपरी-चिंचवड महापालिका

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest