सर्व्हर डाऊनमुळे शेकडो दाखले अडकले; निगडी येथील सेतू कार्यालयातून नागरिकांवर परत जाण्याची वेळ
शाळांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक असणारे दाखले अडकून पडले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून सर्व्हर डाऊन झाल्यामुळे दाखले मिळण्यास उशीर होत आहे. परिणामी, दाखल्यांसाठी नागरिकांचे वारंवार हेलपाटे होत आहेत. दुसरीकडे, या समस्येमुळे आज एकही अर्ज दाखल करून घेतला नाही. त्यामुळे अर्ज दाखला करण्यासाठी आलेल्या नागरिकांवर परत जाण्याची वेळ आली.
सध्या आरटीई अंतर्गत प्रवेश प्रक्रियेसाठी विविध दाखले गोळा करण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू आहे. त्यामुळे उत्पन्न दाखला, डोमिसाईल दाखला, त्याचप्रमाणे जातीच्या दाखल्याचे मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल होत आहेत. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून तांत्रिक कारणाभावी अर्ज दाखल करून घेता येत नाहीत. त्यामुळे अडीचशे हुन अधिक अर्ज पेंडिंग असल्याची माहिती समोर आली आहे. मंगळवारी (१४ मे) दुपारपासून ही समस्या उद्भवत असून, वेगळ्या प्रकारचा एरर येत असल्याने नागरिकांचे अर्ज दाखल करून घेता येत नाहीत. त्यामुळे त्यांना माघारी पाठवावे लागत आहे.
नुकतीच निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर हे दाखले मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. त्यातच अशाप्रकारे तांत्रिक समस्या उद्भवल्याने नागरिकांनी निराशा व्यक्त केली. सकाळी लवकर आलेल्या अर्जदारांना काही वेळाने पुन्हा येण्यास सांगितले. मात्र तरीही सिस्टीम सुरू झाल्याने अर्ज दाखल करून घेतले नाही. परिणामी, अर्जदारांचा आजचा संपूर्ण दिवस वाया गेला. दररोज सरासरी शंभर ते दीडशे अर्ज दाखल होत आहेत. त्यातच शालेय प्रवेश प्रक्रिया आणि विविध योजनांसाठी आवश्यक असलेले दाखले काढण्यासाठी नागरिक या ठिकाणी येत आहेत. मात्र, बंद असलेली सिस्टीम आणि १ पर्यंत असलेली वेळ या दोन्ही कारणामुळे कामे होत असल्याचे दिसून आले.
नव्या कारभाऱ्यांकडून पाहणी
निगडी येथील दाखले देणारे सेतू कार्यालय हे गुजरात इन्फोटेक यांना चालवण्यास दिले आहे. याबाबत 'सीविक मिरर' माध्यमातून गुजराती कारभाऱ्यांचा दाखल्यांचा घोळ या आशयाखाली वृत्त नुकतेच प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यामुळे खुद्द तहसीलदारांनी प्रमुखांना तंबी देखील दिली होती. त्यानंतर नव्या कंपनीचे अधिकारी या ठिकाणी धावत आले. दरम्यान, काही दिवसापूर्वीच हे कार्यालय हस्तांतरण करण्यात आले. दरम्यान, या कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांनी या ठिकाणची पाहणी केली. येथील कर्मचारी आणि काही अर्जदारांशी याबाबत संवाद साधला. नागरिकांना अधिक चांगले सुविधा कशी देता येईल, याबाबत त्यांनी आढावा घेतला. प्रामुख्याने हे कार्यालय चार वाजेपर्यंत सुरू असल्याने एक वाजेपर्यंत असलेली वेळ बदलण्यात येणार असल्याचे त्यांनी सुचवले. तसेच, नागरिकांच्या तक्रारी सोडण्यासाठी प्रामुख्याने भर देण्याबाबत सूचनाही दिल्या.
"नव्या कंपनीला हे कार्यालय हस्तांतर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्याबाबत त्यांना योग्यता सूचना देखील देण्यात आले आहेत. त्याचा आढावा वेळोवेळी घेण्यात येणार आहे."
-जयराम देशमुख, अप्पर तहसीलदार, पिंपरी-चिंचवड
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.