Pimpri-Chinchwad RTO: हट्टी अधिकाऱ्याचा अर्जदाराला मनस्ताप!

वाहन परवान्यासाठी आरटीओमध्ये सामान्य नागरिकांना हेलपाटे मारावे लागतात. त्यातच आता कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षकांच्या हट्टीपणामुळे अर्जदारांना परवान्यापासून मुकावे लागत आहे. अशाप्रकारे वेठीस धरून अर्थपूर्ण तडजोड सुरू असल्याचा आरोप होत आहे.

Pimpri-Chinchwad RTO

संग्रहित छायाचित्र

पंकज खोले
वाहन परवान्यासाठी आरटीओमध्ये सामान्य नागरिकांना हेलपाटे मारावे लागतात. त्यातच आता कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षकांच्या हट्टीपणामुळे अर्जदारांना परवान्यापासून मुकावे लागत आहे. अशाप्रकारे वेठीस धरून अर्थपूर्ण तडजोड सुरू असल्याचा आरोप होत आहे. ऑनलाईन कारभारामुळे सैरभर झालेल्या अधिकाऱ्यांचा सामान्यांच्या पिळवणुकीचा वेगळा पॅटर्न पाहावयास मिळत आहे. 

सुरेंद्र शिरसाट या अर्जदाराने नियमाप्रमाणे ९०० मिनिटाचे प्रशिक्षण व त्याचे व्याख्यान असे ३० दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण केले होते. यानंतर सर्व प्रक्रिया पार पाडून ड्रायव्हिंग स्कूलचे प्रमाणपत्र, शासकीय फी, पूर्वनियोजित वेळ  आणि सर्व कागदपत्रे जोडली होती. त्यानुसार कामातून वेळ काढून अर्जदार परीक्षेसाठी आरटीओ कार्यालयात आला. मात्र, संबंधित महिला मोटर वाहन निरीक्षकाने अर्जावर पाच नंबर फॉर्म आणि तीस दिवसांचे प्रशिक्षण अपूर्ण? असा शेरा मारून सही केली. यामुळे गोंधळलेल्या अर्जदाराने संबंधित निरीक्षकाकडे विनवणीदेखील केली. मात्र, हट्टाला पेटलेल्या निरीक्षकाने अर्ज पुन्हा माघारी पाठवला.

सामान्य नागरिकांची आरटीओकडून होणारी छळवणूक आणि कागदपत्रे पूर्ण असूनही परीक्षेस परवानगी नाकारल्याच्या विरोधात न्यू पिंपरी चिंचवड मोटर ड्रायव्हिंग असोसिएशनचे माजी अध्यक्ष रवींद्र कुदळे यांनी याबाबत विचारणा केली. त्याचप्रमाणे थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली. त्यात, अर्जदारांनी सीएमव्हीआर कायदा १९८९ च्या नियम ३१ मध्ये विहित प्रशिक्षण कालावधी पूर्ण केल्याचे पिंपरी-चिंचवड आरटीओ येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास लक्षात आणून दिले. सर्व कागदपत्रे पूर्ण असतानाही संबंधित अर्जदाराची परीक्षा घेण्यात आली नाही. त्या अर्जावर अधिकाऱ्याने स्वाक्षरी केली होती. मात्र शिक्का नसल्याने नेमका कोणत्या अधिकाऱ्याने असा शेरा मारला हे कळून येत नाही. त्यामुळे योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी तक्रारी अर्जात नमूद केली आहे.

पिंपरी-चिंचवड आरटीओ कार्यालयात शासनमान्य ड्रायव्हिंग स्कूलच्या माध्यमातून दररोज कच्च्या-पक्क्या अनुज्ञप्राप्तीतून मोठ्या प्रमाणात महसूल मिळत असतो. त्याचप्रमाणे वाहन परवान्यासाठी पिंपरी चिंचवड शहराबरोबरच ग्रामीण भागातूनदेखील मोठ्या प्रमाणात नागरिक येतात. नियमाप्रमाणे कागदपत्रांची पूर्तता करूनसुद्धा त्रुटी दाखवून अधिकारी अर्ज नाकारतात. सर्वत्र ऑनलाईन सुविधा झाल्याने आरटीओचे अधिकारी सैरभर झाले आहेत. त्यामुळे अशाप्रकारे सामान्य नागरिकांची अडवणूक करून आर्थिक पिळवणूक केल्याचा आरोप करण्यात येत आहे. 

अर्जदारानेही केली तक्रार 

अर्जदार सुरेंद्र शिरसाट यांनी आपला अर्ज का नाकारला ,याची माहिती न देता परत पाठवले. यामुळे त्यांनीही उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.. या काळात माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता. संबंधित बाब लक्षात आणूनही त्याकडे संबंधित साहाय्यक वाहन निरीक्षकांनी दुर्लक्ष केले. यामुळे आपल्याला प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

घेतली दखल 

आरटीओच्या अशा कारभारावर सामान्य नागरिकांनी आवाज उठवला. तसेच, संबंधित अधिकाऱ्याची चूक वरिष्ठांना निदर्शनास आणून दिली. त्यामुळे अखेर आरटीओच्या साहाय्यक परिवहन अधिकाऱ्यांने याबाबत लेखी आदेश देऊन संबंधित अर्जदाराची तपासणी करण्याची सूचना केली. 

"कागदपत्रांची पूर्तता करूनदेखील चाचणीसाठी नकार देणे म्हणजे एक प्रकारची पिळवणूक आहे. यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास होतो. असा प्रकार पुन्हा होऊ नये, यासाठी वरिष्ठांनी वेळीच दखल घेणे आवश्यक आहे."

- रवींद्र कुदळे, माजी अध्यक्ष, न्यू पिंपरी चिंचवड मोटार ड्रायव्हिंग स्कूल

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest