संग्रहित छायाचित्र
पंकज खोले
धान्य मिळण्यापूर्वी बोटांचे ठसे उमटले जात नसल्याने शिधापत्रिकाधारकांना धान्यापासून वंचित राहावे लागत होते. मात्र आता शिधापत्रिकाधारकांना शिधा मिळण्याची प्रक्रिया आता सुलभ होणार आहे. ई-पॉस मशिनवर ठसे घेण्याबरोबरच आता स्कॅनरची (डोळ्यांचे स्कॅन) देखील सुविधा दिली आहे. या सुविधेसाठी पिंपरी-चिंचवड शहरातील १५७ स्वस्त धान्य दुकानदारांना अद्ययावत केलेल्या मशिनचे वाटप करण्यात आले आहे.
धान्य वाटपात पारदर्शीपणा यावा यासाठी ई-पॉस मशिनची सुविधा शहरातील स्वस्त धान्य दुकानदारांना देण्यात आली आहे. मात्र या मशिनद्वारे एका कुटुंबात किती सदस्य आहेत, याची माहिती मिळत होती. त्यानुसार धान्य वाटप केले जात होते. त्यासाठी कुटुंबप्रमुखांच्या अंगठ्याचे ठसे घेतले जात होते. मात्र अनेक वेळा अंगठ्यांचे ठसेच न उमटल्याने धान्य मिळण्याबाबतची माहिती शिधापत्रिकाधारकांना मिळत नाही. तसेच धान्य दुकानदारही धान्य देण्यास टाळाटाळ केली जात होती. ठसे न आल्याने धान्य मिळण्यासाठी अनेक वेळ ताटकळत थांबावे लागत होते. तर अनेक वेळा शिधापत्रिकाधारकांना पुन्हा पाठवले जात होते.
या अडचणींमुळे दुकानदार आणि शिधापत्रिकाधारक यांच्यामध्ये वादावादी होत असे. त्यावर उपाय म्हणून आता शिधापत्रिका कार्यालयाच्या वतीने आय स्कॅनरची सुविधा दिली जाणार आहे. यामध्ये अंगठ्यांचे ठसे घेण्याबरोबरच डोळ्यांचे देखील स्कॅन केले जाणार आहे. पिंपरी चिंचवड शहरात अ व ज शिधापत्रिका कार्यालयाचा समावेश होतो. यामध्ये शिधापत्रिका कार्यालयांतर्गत ८२ तर शिधापत्रिका कार्यालयांतर्गत ७५ धान्यदुकानदारांचा समावेश होतो.
या सर्वच दुकानदारांना अद्ययावत नवीन मशिन देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे ई-पॉस मशिन ४ जी सॉफ्टवेअरने अद्ययावत केले जाणार आहे. त्यामुळे धान्य वाटपात गती येत नव्हती. अितरीक्त भार असल्यामुळे मशिन बंद पडत होते.
ई-पॉस मशिनमध्ये अनेक सुविधा देण्यात येणार आहेत. ४ जीचे सॉफ्टवेअर अद्ययावत केले जाणार आहे. तसेच ठसे न उमटलेल्यांना धान्य न मिळाल्याने तक्रारी येत होत्या. त्यावर उपाय म्हणून आय स्कॅनरची सुविधा दिली जाणार आहे. त्यामुळे शिधापत्रिकाधारकांना वेळेत आणि विनातक्रारी धान्य वाटप केले जाईल.
- विजय गुप्ता, खजिनदार, ऑल महाराष्ट्र फेरप्राईज शॉपकिपर्स असोसिएशन.
स्वस्त धान्य दुकानदारांना ई-पॉस मशिन दिले आहे. ४ जी सॉफ्टवेअर अद्ययावत केलेले ही मशिन कार्यालयाद्वारे दिले आहे. चार दिवसांपूर्वीच त्याचे वाटप झाले असून या मशिनमध्ये आय स्कॅनरची देखील सुविधा दिली आहे.
- स्नेहल गायकवाड, परिमंडल अधिकारी, ज शिधापत्रिका कार्यालय, निगडी.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.