निकालाआधी लागले वाघेरे यांच्या विजयाचे फलक
मावळ लोकसभा निवडणुकीचा (Maval Loksabha Election 2024) निकाल ४ जूनला लागणार आहे. मतदानानंतर दोन्ही उमेदवारांकडून विजयाचे दावे केले जात आहेत. तत्पूर्वी महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे (Sanjog Waghore) यांनी एक लाख ७२ हजारांनी विजयाचा दावा केला असून त्यांच्या विजयाचे फलक लागले आहेत.
मावळ लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत महायुतीचे खासदार श्रीरंग बारणे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्यात चुरशीची लढत झाली. त्यामुळे या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बारणे आणि वाघेरे या दोघांकडूनही विजयाचे दावे केले जात आहेत. वाघेरे यांनी कर्जत, उरण, मावळ, पिंपरी, चिंचवड या पाच विधानसभा मतदारसंघातून मताधिक्य मिळेल असा अंदाज व्यक्त केला आहे. एक लाख ७२ हजार मतांनी विजयी होईल, असा दावा केला आहे. तर, बारणे यांना केवळ पनवेलमधून आघाडी मिळेल, असेही त्यांनी म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी लागणार आहे. निकालाला २० दिवस बाकी असतानाच संजोग वाघेरे यांच्या विजयाचे फलक लागले आहेत.
मावळ विधानसभा क्षेत्रात येत असलेल्या देहूगाव आणि माळीनगर परिसरात संजोग वाघेरे यांच्या समर्थकांनी ‘खासदार’ असा उल्लेख असलेले फलक लावले आहेत. ‘खासदार आमच्या जनतेचा देहूनगरीत मतदारांच्या आणि कार्यकर्त्यांच्या जिवावरती विजय निश्चित आहे. संजोग वाघेरे यांचे प्रचंड बहुमतांनी खासदारपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन..’ असा मजकूर असलेले फलक लावण्यात आले आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.