पिंपरी-चिंचवड: नियम न मोडताच आल्या दंडाच्या पावत्या !
वाहतुकीच्या नियमांचे (RTO) उल्लंघन करणाऱ्या चालकांवर कारवाईसाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मदत घेऊन कारवाई केली जाते. मात्र, चुकीच्या पद्धतीने दंड ठोठावला जात असल्याच्या अनेक तक्रारी वाढल्या असून, पिंपरी- चिंचवडमध्ये मागील वर्षभरात सहा हजार ६७४ जणांनी तक्रारी नोंदवल्या आहेत. तर, यंदा जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यात एक हजार ८४८ जणांनी चुकीचे चलन पडल्याच्या विरोधात अर्ज दिला आहे. (Pimpri Chinchwad News)
वाहतुकीचे नियम न मोडता आलेल्या ई-चलनाच्या मेसेजमुळे वाहनचालकांचा गोंधळ उडताना दिसत आहे. वाहन क्रमांकावरील चुकीच्या, अर्धवट किंवा हेराफेरी केलेल्या क्रमांकामुळे चुकीचे ई-चलन जारी होत असल्याचे वाहतूक पोलिसांचे म्हणणे आहे. राज्यभरातील वाहतूक पोलिसांकडे ई-चलन संबंधित तक्रारी येण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे.
पिंपरी- चिंचवडमध्ये सन २०२३ मध्ये ६ हजार ६६७४ जणांनी चुकीच्या चलन विरोधात तक्रारी दिल्या आहेत. तर, यंदा चार महिन्यात एक हजार ८४८ जणांनी वाहतूक विभागात धाव घेतल्याच्या नोंदी आहेत. वाहतूक विभागाने चुकीचे चलन खातरजमा करून ते रद्द करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे चुकीचे चलन पडल्यास घाबरून जाऊ नये, असे आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे. चुकीच्या ई-चलनाचा मेसेज आल्यानंतर सर्वप्रथम वाहतूक विभागाशी संपर्क साधावा. आपण नियमभंग केला नाही, याबाबतच्या योग्य पुराव्यांसह तेथे तक्रार नोंदवावी. वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षात या तक्रारी प्राप्त होतात. तक्रारीतील माहिती, फोटो अचूक असल्यास त्यावर पुढील कार्यवाही करण्यात येते.
चुकीचे ई-चलन प्रकरणी पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेकडे २०२३ या वर्षभरात ६६७४ तक्रारी प्राप्त झाल्या. तर, यंदा जानेवारीमध्ये ते एप्रिलमध्ये १ हजार ८४८ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यातील विशेष म्हणजे वाहतूक विभागाने या सर्व तक्रारींचे निरसन केल्याची नोंद आहे. काही वाहनचालक ई-चलनाचा मेसेज आल्यानंतर वाहतूक पोलिसांकडे जातात. आपण नियम तोडलाच नाही, अशा आविर्भावात पोलिसांशी हुज्जत घालतात. त्यावेळी पोलीस चलन क्रमांकावरून सर्व माहिती काढतात. नियमभंग करतानाचे फोटो पुराव्यादाखल समोर ठेवतात. त्यानंतर मात्र नाठाळ चालक खजील होऊन काढता पाय घेतात.
ऑनलाइन तक्रार सुविधा
चुकीच्या ट्रॅफिक चलनाबाबत ऑनलाईन तक्रारीसाठी महाट्रॅफिक ॲप उपलब्ध आहे. चलन रद्द करण्यासाठी ॲपवर तक्रार नोंदवावी लागते. त्यानंतर तक्रार संबंधित शहरातील वाहतूक विभागाकडे प्राप्त होते. त्यांच्याकडून पडताळणी करून अहवाल सादर केला जातो. अहवालानुसार चलनाबाबत निर्णय घेतला जातो.
वाहतुकीचे नियमभंग न करता मोबाईलवर ई-चलन आल्यास गोंधळून जाऊ नये. तत्काळ ऑनलाईन अथवा वाहतूक शाखेच्या नियंत्रण कक्षाकडे तक्रार नोंदवावी. आपल्याकडे असलेल्या पुराव्यांच्या आधारे चलन रद्द करण्यात येईल.
-विशाल गायकवाड, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा, पिंपरी-चिंचवड
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.