'ब्रेक डाऊन'मुळे पिंपरी-चिंचवड आगार 'नर्व्हस'

एसटीच्या पिंपरी-चिंचवड आगारात एकीकडे प्रवाशांच्या मानाने वाहनांचा तुटवडा आहे. त्यातच दिवसाकाठी हमखास एक ते दोन बस वारंवार ब्रेक डाऊन होत असल्याने उन्हाळी विशेष फेऱ्यांची नियोजन कोलमडत आहे.

Pimpri Chinchwad ST Bus Depot

संग्रहित छायाचित्र

दिवसाला एक ते दोन गाड्या पडताहेत मार्गावरच बंद, आगाराचे नियोजन कोलमडले, प्रवाशांनाही नाहक मनस्ताप

पंकज खोले

एसटीच्या पिंपरी-चिंचवड आगारात (Pimpri Chinchwad ST Bus Depot) एकीकडे प्रवाशांच्या मानाने वाहनांचा तुटवडा आहे. त्यातच दिवसाकाठी हमखास एक ते दोन बस वारंवार ब्रेक डाऊन होत असल्याने उन्हाळी विशेष फेऱ्यांची नियोजन कोलमडत आहे. परिणामी, लांब पल्ल्याच्या मार्गावर प्रवाशांना तासनतास वाट पाहावी लागत असल्याचे चित्र आगारात दिसून आले.

उन्हाळी सुट्टीचे एसटी आगाराकडून नियोजन करण्यात आले आहे. यानिमित्त नाशिक, चिपळूण यासह विविध मार्गांवर अतिरिक्त बस सोडण्यात येत आहेत. त्यामुळे उपलब्ध असलेल्या बस कमी पडत आहेत. त्यातच दिवसाकाठी हमखास एक ते दोन एसटी ब्रेक डाऊन होत आहेत. त्यामुळे काही मार्ग वगळावे लागत असल्याने प्रवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र या भागात वाहनांचा मोठा तुटवडा आहे. बंद पडलेल्या बस वेळेवर दुरुस्त होत नसल्याने, लांबचे मार्ग रद्द करून इतर मार्गावर ती सेवा वळवावी लागत आहे.

दुसरीकडे कार्यशाळेत मनुष्यबळाचा तुटवडा असल्याने चाळीस जणांचा कार्यभार पंचवीस कारागीरच पार पाडत आहेत. त्यामुळे आगारातील एस.टी. गाड्यांची दैनंदिन तपासणी करताना उपलब्ध कर्मचाऱ्यांवर ताण पडत आहे. परिणामी गाड्या ब्रेक डाउन होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातच अनुपस्थिती आणि कामगार वारंवार सुट्ट्या घेत असल्याने वेळेवरती एसटी दुरुस्त होत नसल्याने त्या मार्गावर येत नाहीत. त्यातच पिंपरी-चिंचवड आगारात कर्मचारी तुटवडा असताना, दोन कर्मचारी दापोडी येथील मध्यवर्ती कार्यशाळेत पाठवण्यात आले तर तिघांनी राजीनामा दिला आहे.

दरम्यान, प्रत्येक आगारातून दैनंदिन बसेसची माहिती, प्रवासी आणि नादुरुस्त बसची संख्या याबाबत विभागीय कार्यालयाकडून माहिती मागवण्यात येत आहे. त्यात सुधारणा करण्याबाबत आगार प्रमुखांना सूचना करण्यात आलेली आहे. त्याबाबत सकाळी आढावा बैठक घेण्यात येत असते.

दिवसाला सहा ते आठ हजार प्रवासी

राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पिंपरी-चिंचवड आगारामधून दिवसाला सहा ते आठ हजार प्रवासी प्रवास करतात. त्यात उन्हाळी सुट्टी, दिवाळी, दसरा आणि पर्यटन काळात आणखी भर पडते. उद्योगनगरी असल्याने शहरात रोजीरोटी तसेच शिक्षणानिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले नागरिक वास्तव्य करीत आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड आगारामधून विविध ठिकाणी वाहतुकीची सोय उपलब्ध आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest