पिंपरी-चिंचवड शहरातील एकमेव एसटी आगाराला विविध समस्यांनी ग्रासले आहे. प्रवाशांना एसटीचे तिकीट काढण्यापासून ते आगारातून बाहेर पडेपर्यंत सतत कुठल्या ना कुठल्या अडचणींना सामोरे जावे लागते. परिणामी, प्रवाशांच्या तक्रारी वाढत असून, याची दखल घेण्याची मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे पुणे विभागाचे नियंत्रक प्रमोद नेहुल यांनीही या समस्यांचे निवारण करण्याच्या सूचना केल्या होत्या.
आवश्यक त्या सोयीसुविधा असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. दिवाळी, दसरा आणि गणपती उत्सवामध्ये आगारात मोठ्या प्रमाणात प्रवाशांचे गर्दी असते. त्यामुळे या ठिकाणी भुरटे चोर आणि महिलांच्या गळ्यातील दागिने चोरी होण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे या ठिकाणी पोलीस मदत केंद्र उभारले आहे. मात्र ते अनेक दिवसांपासून बंद आहे. स्वच्छतागृहांमध्ये जादा शुल्क वापरून लूट केली जात आहे. येथून दररोज सरासरी ७ हजार प्रवासी प्रवास करतात.
या आगाराचे उद्घाटन आॅगस्ट १९९८ मध्ये परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते झाले होते. या एसटी आगारामधून ५७ एसटी बस असून, येथून आंध्र प्रदेश, कर्नाटक, गोवा या तीन राज्यांसह महाराष्ट्रातील बीड, सोलापूर, उस्मानाबाद, औरंगाबाद, अहमदनगर, लातूर, नाशिक, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूर, मुंबई, ठाणे अशा अनेक जिल्ह्यांमध्ये व त्यामधील विविध तालुके, शहरे व विविध खेडेगावांत जातात. तसेच, राज्यातील इतर बस आगारातील २५० एसटी बस या स्थानकावर येतात. आगारामध्ये असलेल्या स्वच्छतागृहांत प्रवाशांची लूट होत आहे. या आगारात असलेले 'पेड पार्किंग'मध्ये वाहने लावण्यासाठी जादा शुल्क आकारले जाते. पार्किंगच्या कारणावरून नेहमीच प्रवासी आणि ठेकेदाराचे कर्मचारी यांच्यात मोठ्या प्रमाणात भांडणे होतात.
आगाराला दहा नव्या एसटी बस मिळणार
येथील आगाराला अत्याधुनिक सुविधा असणाऱ्या दहा जादा बस उपलब्ध होणार आहेत. यंदाच्या दिवाळीपर्यंत या बस आगाराच्या ताफ्यात दाखल होतील. त्यानंतर त्या बस विविध मार्गांवर धावणार आहेत. त्यामुळे दिवाळीत प्रवाशांची गैरसोय टळणार असून अत्याधुनिक सुविधांच्या बसमधून प्रवास करण्याची अनुभूती येणार आहे. आगारातून जवळपास ७० टक्के मार्ग हा कोकण परिसरातील आहे. त्यामुळे या ठिकाणी जाणारा प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.