दुर्मीळ व देशी फणसी झाड दिवसाढवळ्या कापून एक प्रकारे झाडाची हत्याच करून टाकली
निगडी प्राधिकरण सेक्टर २७ मधील कृष्णा सोसायटीच्या प्रवेशद्वारावर वाहनांना पार्किंग पत्राशेड बनवण्यास अडथळा ठरत असलेल्या दुर्मीळ 'खोबरा आंबा' झाडांच्या फांद्या बेकायदेशीर तोडल्याप्रकरणी महापालिकेच्या उद्यान व वृक्ष संवर्धन विभागाकडून सोसायटीला नोटीस बजावली आहे. सात दिवसांत खुलासा न केल्यास दंडात्मक किंवा कायदेशीर कारवाईचा इशारा उपायुक्त रविकिरण घोडके यांनी दिला आहे.
निगडी प्राधिकरण सेक्टर २७ मधील कृष्णा सहकारी सोसायटी प्रवेशद्वारावर एक दुर्मीळ खोबरा आंबा झाड आहे. गेल्या वीस वर्षांपासून अनेक पर्यावरणप्रेमी अभ्यासक हे झाड पाहण्यास येतात. शहरात आकुर्डी आणि निगडी या दोन ठिकाणी खोबरा आंब्याची झाडे आहेत. साधारण एप्रिलमध्ये झाड बहरलेल्या स्थितीत असताना एक ते दीड किलो खोब-याची चव देणारे आंबे लागतात. त्यामुळेच काही पर्यावरण अभ्यासक झाडांची माहिती घेण्यास आणि त्या आंब्याची चव पाहण्यास येत असतात.
सदरचे झाड हे कृष्णा सोसायटीमधील नागरिकांना अडथळा ठरू लागले होते. त्या झाडाच्या परिसरात सोसायटीचे कार्यालय आहे. त्या भागात सोसायटीला वाहनासाठी पत्राशेड करायचे होते. पण, त्या झाडाचा सतत अडथळा येत होता. त्यामुळे सोसायटी पदाधिकाऱ्यांनी महापालिकेची कोणतीच परवानगी न घेता झाडाच्या फाद्या तोडून टाकल्या आहेत. याबाबत पर्यावरणप्रेमी नागरिकांनी उद्यान व वृक्ष संवर्धन विभागास तक्रार करत कारवाईची मागणी केली. त्यानुसार महापालिका उद्यान विभागाच्या पर्यवेक्षक यांनी घटनास्थळीचा पंचनामा केला.
कृष्णा सोसायटीने महाराष्ट्र झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम १९७५ चे उल्लंघन केल्याने उद्यान विभागाकडून सोसायटीचे चेअरमन बाबुराव फडतरे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. कोणतीही परवानगी न घेता आंबा झाडांच्या फांद्या तोडल्याने आपणावर दंडात्मक कारवाई का करण्यात येऊ नये, याबाबत आपण सात दिवसांत लेखी खुलासा करावा, असेही म्हटले आहे.
चौकातील झाड दिवसा कापून टाकले
निगडीतील संत तुकाराम महाराज उद्यान चौकातील दुर्मीळ व देशी फणसी झाड दिवसाढवळ्या कापून एक प्रकारे झाडाची हत्याच करून टाकली आहे. सह्याद्रीतील देखण्या जांभळ्या रंगाच्या फुलांचे हे झाड तोडण्यात आले आहे. प्राधिकरण चौका-चौकात वाढलेली झाडे अचानक गायब का होतात. ही दुर्मीळ झाडे तोडण्याची परवानगी कुणी दिली, असा सवाल सामाजिक कार्यकर्ते विजय पाटील केला आहे. दरम्यान, पर्यावरणप्रेमी व अभ्यासक लवकरच सदरील सोसायटीतील पदाधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी म्हणून महापालिका आयुक्त शेखर सिंह यांची भेट घेणार आहेत, असेही पाटील यांनी सांगितले.