अपुरा पत्ता, घर बंद असणे अथवा संबंधित व्यक्ती उपलब्ध न झाल्याने महिन्यासाठी मोठ्या प्रमाणात वाहन नोंदणी पुस्तक (आरसी) पोहोचत नाही. त्यामुळे आरटीओमध्ये रिटर्न येण्याचे प्रमाण जवळपास हजारोंच्या घरात आहे. मात्र, हे आरसी पुस्तक पुन्हा नेण्याच्या प्रमाणात अलीकडे वाढ होऊ लागली असून, महिन्याकाठीत ३०० आरसी पुन्हा मूळ मालकाच्या ताब्यात देण्यात येतात. याचप्रमाणे प्रलंबित आरसी बुक निपटारा करण्यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी संबंधित वाहनधारकांना आरसी बुक नेण्याचे आवाहन केले आहे.
पोस्टातून घरपोच आरसी न मिळाल्यास नागरिकांना नेमके कुठे जायचे हे लक्षात येत नाही. मात्र आता अशा नागरिकांना आरटीओमध्ये आरसी बुकसाठी थांबावे लागणार नाही. पोस्टासाठी आलेला ५८ रुपयांचा खर्च देऊन ते पुन्हा आरसी बुक मिळवू शकत आहेत. पिंपरी-चिंचवड आरटीओ कार्यालयात गेल्या सहा महिन्यांत सात हजार २३९ वाहन नोंदणी प्रमाणपत्र (आरसी) परत आले आहेत. तर, त्यापैकी महिन्याकाठी तीनशेच्या आसपास आरसी पुन्हा सुपूर्द करण्यात येतात. आरसी बुक घेण्यासाठी नागरिकांना पुन्हा प्रादेशिक परिवहन कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. जुने आरसी बुक मिळणे जास्तच अवघड होते. अनेकदा ते सापडत नसल्याने नागरिकांचे हेलपाटे होत होते. मात्र, आता संबंधित आरसी मूळ वाहनधारकांना ताबडतोब देण्याचे आदेश प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यानुसार आता हे प्रमाण वाढले असल्याचे दिसून येते. नागरिकांचे नोंदणी प्रमाणपत्र पूर्वी राज्य सरकारकडून प्रिंट केले जायचे. सध्या केंद्राकडून हे प्रिंट केले जात आहे. आधार कार्डवर असणाऱ्या पत्त्याचा आधार घेऊन लोकल पोस्टाद्वारे आरसी बुक नागरिकांना घरपोच दिले जात आहे. पोस्टाचे कर्मचारीही कागदपत्रे नागरिकांच्या घरी देण्यासाठी जातात. मात्र अनेकांचे अर्धवट पत्ते नमूद असतात. नव्याने पत्त्यात केलेला बदल तसेच गावी गेल्याने घराला कुलूप असल्याची स्थिती असते. त्यामुळे आरसी बुक दिले जात नाही.
दरम्यान, अनेक वाहनधारकांना वेळेमध्ये आरसी मिळत नसल्याने ते पुन्हा घ्यायला येत नाहीत. पुढे वाहनासंबंधी अडचण आल्यास अथवा ते वाहन विक्री करायची असल्यास तेव्हा ते आरसी मिळवण्यासाठी खटाटोप करतात. मात्र, त्याची नेमकी प्रक्रिया माहीत नसल्याने ते पुन्हा दुबार (डुप्लिकेट) आरसीसाठी अर्ज करतात. स्थानिक एजंटदेखील त्यांना हे सुचवतात. परिणामी त्यांना पुन्हा प्रक्रिया नव्याने करावी लागते. त्यामुळे प्रलंबित आरसीचे प्रमाण वाढत होते. मात्र आता केवळ ५८ रुपये भरून आरसी मिळत असल्याने वाहनधारक आरटीओमध्ये येत आहेत.