काळ्या काचेच्या क्रेझसाठी मोजले तब्बल चार कोटी!

काळ्या काचा असलेल्या वाहनांवर पिंपरी- चिंचवड वाहतूक पोलिसांची धडक कारवाई सुरू आहे. मागील पंधरा महिन्यात ७१ हजार ३१५ बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करून तब्बल ३ कोटी ९२ लाख १ हजार ५०० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

संग्रहित छायाचित्र

पिंपरी- चिंचवड वाहतूक पोलिसांची धडक कारवाई, पंधरा महिन्यांत ७१ हजार वाहनचालकांवर कारवाई

काळ्या काचा असलेल्या वाहनांवर पिंपरी- चिंचवड वाहतूक पोलिसांची धडक कारवाई सुरू आहे. मागील पंधरा महिन्यात ७१ हजार ३१५ बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करून तब्बल ३ कोटी ९२ लाख १ हजार ५०० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. त्यामुळे वाहनांच्या काळ्या काचा पिंपरी- चिंचवडकारांना चांगल्याच महागात पडल्याचे दिसून येत आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने २९ मार्च ते ४ एप्रिल दरम्यान विशेष मोहीम राबविण्यात आली होती. या कालावधीत कारला काळ्या काचा लावल्याने ३ हजार ४३५ वाहनचालकांवर कारवाई करीत ३८ लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. आचारसंहिता कालावधीत विशेष मोहीम राबवून वाहनांची तपासणी केली जात आहे. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे अन् अतिरिक्त आयुक्त वसंत परदेशी हे स्वतः अचानक तपासणी नाक्यावर जाऊन कामकाजाची पाहणी करीत आहेत. (Pimpri Chinchwad Police)

शहर परिसरातील स्थानिक तरुणांमध्ये वाहनांच्या काळ्या काचांची मोठी क्रेझ आहे. काळा रंग असलेल्या कारच्या काचांना गडद फिल्म बसवण्याचा ट्रेंड सध्या शहरात सुरू असल्याचे पाहावयास मिळते. अशा फिल्म असलेल्या वाहनाच्या आतील बाहेरून काहीही दिसत नाही. अशा वाहनांवर वाहतूक पोलिसांची नियमित कारवाई सुरू असल्याचे दंडाच्या आकडेवारीवरून अधोरेखित झाले आहे.

वाहतूक पोलिसांनी मागील पंधरा महिन्यात कोट्यवधी रुपयांचा दंड आकराला आहे. तसेच, याच तुलनेत जुना प्रलंबित असलेला दंड वसूलही केला आहे. असे असले तरीही तरुणांनी काचांवरील ब्लॅक फिल्म काढली नसल्याचे बहुतांश ठिकाणी दिसून येत आहे.

दुसऱ्यांदा तिप्पट दंड

काळ्या काचा असणाऱ्या वाहनांना पहिल्यांदा ५०० तर दुसऱ्यांदा दीड हजार रुपये दंड आकारला जातो. चौकात तैनात असलेले वाहतूक पोलीस फोटो काढून वाहनांवर दंड आकारतात. या व्यतिरिक्त वाहतूक महामर्गांवर बसविण्यात आलेल्या स्पीड गनच्या इन्टरसेप्टर वाहनातील मशीनव्दारेही काळ्या फिल्म असलेल्या वाहनांवर दंड आकारला जातो.

गुन्ह्यांसाठी होतो वापर

चारचाकी वाहनांच्या काचांवर काळ्या फिल्म लावल्यामुळे वाहनात कोण बसले आहे, ते काय करीत आहेत, हे दिसून येत नाही. गुन्हेगारी कृत्यासाठी अशा काचा असलेल्या वाहनांचा वापर झाल्याचे प्रकार यापूर्वी समोर आले आहे. त्यामुळे काळ्या फिल्मच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा वाहनांकडे जास्त लक्ष राहणार आहे.

काळ्या फिल्म असलेल्या वाहनांमध्ये गैरप्रकार घडू शकतात. अशा‘ फिल्म’ लावणे बेकायदेशीर आहे. वाहतूक शाखेकडून काळ्या फिल्मवर नियमित कारवाई सुरू आहे. वाहनचालकांनी नियमांचे पालन करून पोलिसांना सहकार्य करावे.

- विशाल गायकवाड, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा, पिंपरी-चिंचवड

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest