Pimpri-Chinchwad News: मेट्रोमुळे पीएमपी बसथांब्यावर संक्रांत, बीआरटीच्या एका बसस्थानकाचा बळी, तीन बसथांबे यापूर्वीच उखडले

पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपीएमएल) उभारण्यात आलेले बस थांबे तोडले जात आहेत. आकुर्डी येथे जुने बस शेड असतानाही लाखो रुपये खर्च करून नवीन स्टेनलेस स्टीलचे बस शेड उभारले होते.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Thu, 17 Oct 2024
  • 02:56 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

चिंचवड स्टेशन बीआरटी थांब्याचा खर्च वाया

पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपीएमएल) उभारण्यात आलेले बस थांबे तोडले जात आहेत. आकुर्डी येथे जुने बस शेड असतानाही लाखो रुपये खर्च करून नवीन स्टेनलेस स्टीलचे बस शेड उभारले होते. तोच याच रस्त्यावर अन्य दोन ठिकाणी बस थांबे काढून टाकण्यात आले आहेत. तर, मोरवाडी चौकातही एक जुना बस थांबा काढला आहे. रस्ता रुंदीकरणासाठी शेड काढून टाकण्यात आले आहे. या मार्गावर मेट्रोचे काम सुरू होणार असल्याची माहिती असूनही पीएमपीएमएलने बस शेड कशासाठी उभारला, असा सवाल उपस्थित होत आहे.

शहरामधील आत्तापर्यंत चार बस थांबे काढले असून, येत्या काही दिवसांत बीआरटीचा मुख्य बस थांबाही काढण्यात येणार आहे. परिणामी, मेट्रोच्या कामाचा मोठा फटका अप्रत्यक्षरीत्या पीएमपी प्रवाशांना बसणार आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपीएमएल) पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात ८० हून अधिक नवीन स्टेनलेस स्टीलचे बस शेड बसवले आहेत, तर पिंपरी- चिंचवड शहरात १५ बस शेड आहेत. यातील ९ बस शेड हे निगडी दापोडी बीआरटी मार्गाला समांतर मार्गावर बसवले आहेत. मात्र त्यानंतर बस थांबा उभारण्याचे काम थांबले होते. जागेचे सर्वेक्षण त्याचप्रमाणे मेट्रोच्या कामामुळे थांबे उभारण्यात येत नव्हते. तर आता उभारलेले नवीन थांबेही उखडण्यात आलेले आहेत.

पाच महिन्यांपूर्वी आकुर्डीत लाखो रुपये खर्चुन उभारलेले बस शेड काढले आहे. बीआरटी बसथांब्यासमोर स्टेनलेस स्टीलचा बसथांबा असून, नवीन बस शेड बसवली आहे. पिंपरी बीआरटी बसस्टॉप थांब्यासमोर लोखंडी बस शेड असताना तेथेही नव्याने स्टेनलेस स्टीलचा बस शेड बसवली आहे. पावसाळ्यात तर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते. पण, दुसऱ्या बाजूला ज्या मार्गावरून बसच जात नाहीत किंवा दिवसातून केवळ तीन ते चार बसच्या फेऱ्या होत असलेल्या मार्गावर मात्र लाखो रुपये खर्च करून नवीन बस शेड बसवण्यात आले आहेत. या बस शेडचा प्रवाशांना कोणताही फायदा होताना दिसत नाही.

दरम्यान, हिंजवडी येथील शिवाजी चौक, बाणेर रस्ता या ठिकाणीही बस थांबा काढून टाकण्यात येणार आहे. याबाबत मेट्रो कडून पत्रव्यवहार करण्यात आला आहे. मात्र, त्या बदल्यात अन्य कोणतीही सोय होत नसल्याने प्रवाशांना उन्हामध्ये थांबावे लागणार आहे. संबंधित काम पूर्ण होईपर्यंत अथवा पीएमपीकडून सर्वेक्षण झाल्यानंतरच आता तेथे पुन्हा बस थांबा उभारावा की नाही, हे पाहिले जाणार आहे. त्यामुळे तेवढा वेळ पीएमपी प्रशासनाला वाट पहावी लागणार आहे.

चिंचवड स्टेशन बीआरटी थांब्याचा खर्च वाया
चिंचवड स्टेशन येथील बीआरटी मार्गावरील एक बस थांबा काढून टाकण्यात येणार आहे. त्यामुळे त्याचा संपूर्ण खर्च वाया जाणार आहे. यापूर्वी जुने दोन व एक नवा बस थांबा काढण्यात आला आहे. त्यानंतर आता जेथे बस थांबा आहे तेथेच मेट्रोचा पिलर येत असल्याने तो थांबा काढणे आवश्यक आहे. काही दिवसांपूर्वी या संबंधित सर्व्हे पूर्ण केला आहे, अशी माहिती पीएमपीचे अधिकारी दत्तात्रय झेंडे यांनी सांगितले.

मेट्रोकडून पीएमपीएमएल प्रशासनाकडे तसेच, वाहतूक नियोजन विभागाकडे त्याबाबत पत्र प्राप्त होते. यादरम्यान ते दुसरीकडे तात्पुरते स्थलांतर केले जाते अथवा काढून ठेवले जाते. काम झाल्यानंतर पुन्हा बसवले जाते. ते काम पूर्ण होईपर्यंत थांबावे लागते.
- डी.एम. तुळपुळे, कार्यकारी अभियंता, पीएमपीएमएल

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest