संग्रहित छायाचित्र
पिंपरी-चिंचवड: बेकरी, हॉटेल, ढाबे आदी ठिकाणी कोळसा व लाकूड जाळल्याने होणारे वायूप्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेने धोरण तयार केले आहे. लाकूड व कोळसा जाळणे बंद करून वीजेचा किंवा एलपीजीचा वापर करण्याबाबतच्या परिपत्रकास प्रशासक शेखर सिंह यांनी सोमवारी (दि.१४) मान्यता दिली.
शहरातील वाढत्या लोकसंख्येबरोबरच इंधनाचा वापरही वाढला आहे. व्यावसायिक सर्व आस्थापना स्वयंपाकासाठी किंवा आगीसाठी लाकडाचा किंवा कोळश्याचा वापर करतात. हा वापर कमी करून हॉटेल, बेकरी, ढाबे यांद्वारे होणारे वायूप्रदूषण कमी करण्यासाठी लाकूड प्रतिबंधित करून फक्त लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस (एलपीजी) किंवा नैसर्गिक वायू वापरणे किंवा पुरविणे याची सुनिश्चिती केली जाणार आहे. तसेच इंधन म्हणून लाकडाचा वापर टप्प्याटप्प्याने बंद करण्यासाठी कृती आराखडा देखील तयार करण्यात येणार आहे. कोळसा व लाकूड जाळल्याने वायूप्रदूषण होऊन पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. त्यामुळे हवेत हानिकारक कण, कार्बन मोनोऑक्साईड आणि अस्थिर सेंद्रिय संयुगे आदी प्रदूषित घटकांचे प्रमाण वाढत आहे. परिणामी, त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होण्याची देखील शक्यता आहे. या सर्व बाबी लक्षात घेता लाकूड व कोळश्याचा वापर टप्प्याटप्प्याने बंद करून स्वच्छ इंधन म्हणून वीज किंवा एलपीजीचा वापर करणे याबाबतच्या परिपत्रकास प्रशासक शेखर सिंह यांनी सर्वसाधारण सभेची मान्यता दिली.