संग्रहित छायाचित्र
पुणे व पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरांतर्गत मेट्रो धावू लागली आहे. नुकतेच पिंपरीपासून ते स्वारगेटपर्यंत मेट्रो सुरू झाली आहे. मात्र दुसरीकडे निगडी ते कात्रज हे मार्गही सुरू आहेत. त्यामुळे एकाच मार्गावरती दोन वेगवेगळ्या सार्वजनिक वाहतूक सेवा सुरू आहेत. त्यामुळे पहिल्या टप्प्यात निगडी ते कात्रज यापैकी काही बससेवा तात्पुरत्या बंद करून इतरत्र वळवता येतील. तर, निगडी ते पिंपरी अशी बससेवा सुरू करून मेट्रोची संख्याही वाढवता येईल. मात्र याबाबत पीएमपीएमएल प्रशासनाकडे इच्छाशक्तीचा अभाव असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. त्यामुळे एकाच मार्गावर डबल खर्च होत असल्याचे प्रवाशांनी निदर्शनास आणून दिले.
निगडीपासून यापूर्वी सिविल कोर्टपर्यंत मेट्रो कार्यान्वित होती. त्यात वाढ करून निगडीपासून स्वारगेटपर्यंत मेट्रो आता पोचत आहे. दुसऱ्या टप्यात आता मेट्रो स्वारगेटपासून ते निगडीपर्यंत असणार आहे. तूर्तास, पिंपरीपासून स्वारगेटपर्यंत वाढ केलेल्या मेट्रोला प्रवासी संख्येचा प्रतिसादही मिळत आहे. दुसरीकडे, याच मार्गावर निगडी ते कात्रज अशी स्वारगेटपर्यंत बससेवाही आहे. एकाच वेळी दोन सार्वजनिक सेवा त्याही जास्त फेऱ्या असल्याने त्या कमी करण्याची मागणी केली जात आहे. जेणेकरून कमी झालेल्या फेऱ्या इतरत्र अथवा पिंपरी-चिंचवड शहरातील उपनगरात वळवल्या जाऊ शकतील. त्यामुळे इंधनाचा व पर्यायाने शासनाचा अतिरिक्त होणारा खर्चही कमी केला जाऊ शकतो.
याबाबत पिंपरी-चिंचवड शहरातील प्रवासी व निगडी प्राधिकरण फर्स्टचे सदस्य गणेश बोरा सांगितले की, सध्या एकाच मार्गावरती पीएमपी बस आणि मेट्रोसुद्धा धावत आहे. परिणामी, प्रवासी विभागले जात असून, सार्वजनिक वाहतूक सेवेचा तेवढा फायदा होत नाही. त्यामुळे निगडीपासून ते कात्रजपर्यंत असणाऱ्या काही फेऱ्या कमी करता येतील. त्या निगडी ते पिंपरी असा फिडर मार्ग सुरू करता येईल. जेणेकरून स्वारगेटपर्यंत जाणाऱ्या प्रवाशांना मेट्रोचा मार्ग सुकर होईल. त्यामुळे वेळेची बचत होणार असून, एकाच वेळी दोन धावणाऱ्या सार्वजनिक सेवेचा काहीसा ताण कमी होण्यास मदत होईल.
पार्किंगची गैरसोय अन् वेळेचे गणित आवश्यक
सध्या पिंपरीपासून सुरू असलेल्या मेट्रोचा प्रवासी फायदा घेत आहेत. मात्र पार्किंगची सोय नसल्याने नागरिकांना अजूनही रस्त्यावरती वाहने पार्क करावी लागतात. त्यामुळे वाहतूक पोलिसांकडून आपल्या वाहनावरती चलन पडेल याची धास्ती असते. दुसरीकडे, निगडीपासून ते पिंपरीपर्यंत पोहोचण्यास लागणारा वेळ व पुन्हा बसमधून उतरून मेट्रो पकडण्याची धावपळ यामध्ये बराच वेळ जाणार आहे. परिणामी, बसमध्येच थांबून शेवटपर्यंत प्रवास करण्यास नागरिकांचा कल असतो. या दोन्ही विषयी आणखी अभ्यास केल्यास निश्चितपणे त्यात फरक पडू शकतो.
निगडीपासून अठरा बससेवा
मेट्रो अद्याप पोहोचली नाही अशा ठिकाणी म्हणजेच निगडी, चिंचवड स्टेशन, एमआयडीसी, आकुर्डी या परिसरातील नागरिक आणि गावांना आजही बसवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे निगडी पासून ते स्वारगेट या मार्गावर तब्बल १८ बस आहेत. मेट्रो सेवा सुरू झाली असली तरी अद्यापही या मार्गावरील बससेवेला प्रवासी संख्या तेवढीच आहे. त्यामुळे भविष्यकाळामध्ये यामध्ये बदल करणे कठीण आहे. तरी, याची पाहणी करून व सर्वेक्षण करून त्यानुसार बसची संख्या कमी अधिक ठरवण्यातील असे पीएमपी प्रशासनाने सांगितले. त्यातच थेट कात्रजला जाण्यासाठी दोन वेळ बस व मेट्रो बदलणे शक्य नाही. त्याऐवजी वेळ गेला तरी बसने प्रवास करण्याची मानसिकता अजून प्रवाशांमध्ये आहे.
प्रत्यक्षात मेट्रोने प्रवास करणे सोयीचे असले तरी, पार्किंगची सोय अद्याप झाली नाही. त्यामुळे अनेक जण वाहन रस्त्यावर ठेवून जाणे पसंत करत नाहीत. परिणामी, मेट्रोचे प्रवासी वाढू शकत नाहीत.
- राहुल बरेडिया, प्रवासी
निगडीपासून सुटणाऱ्या बसची संख्या एक तर कमी आहे. त्यात प्रचंड गर्दी असते. एक बसची फेरी बंद केली असल्याची शक्यता आहे. पहिल्याच थांब्यावरती बस पूर्ण भरते. पुढे बिजी कॉर्नरला बसायलाही जागा नसते.
- वैशाली कुलकर्णी, प्रवासी
सध्या प्रवाशांच्या सोयीसाठी बदल केलेला नाही. काही दिवस त्याची पाहणी करणार आहोत. त्यानंतर सर्वेक्षण झाल्यानंतर त्याबाबत निर्णय घेता येईल. प्रवासी संख्येवर काय परिणाम होतो. हे पाहिल्यानंतर त्याबाबत नियोजन करण्यात येणार आहे.
- सतीश गव्हाणे, मुख्य वाहतूक व्यवस्थापक, पुणे महानगर परिवहन महामंडळ