Pimpri-Chinchwad : शहरातील गर्दीच्या ठिकाणांवर तिसरा डोळा ठेवणार २४ तास लक्ष; इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरची (आयसीसीसी) सुरक्षेवर नजर

पिंपरी-चिंचवड शहराच्या सुरक्षेसह विविध उपाययोजना करण्यासाठी स्मार्ट सिटी प्रकल्पातून निगडीत आयसीसीसी अर्थात इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरची उभारणी करण्यात आली.

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

स्मार्ट सिटीतून सुमारे ४४१ कोटी रुपये खर्चून उभारणी

पिंपरी-चिंचवड शहराच्या सुरक्षेसह विविध उपाययोजना करण्यासाठी स्मार्ट सिटी प्रकल्पातून निगडीत आयसीसीसी अर्थात इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरची उभारणी करण्यात आली. शहरातील सुमारे ३ हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची या केंद्राशी जोडणी करण्यात आली आहे. या सेंटरच्या माध्यमातून शहरातील रस्ते, महत्त्वाचे चौक, विविध महत्त्वाच्या तसेच गर्दीच्या ठिकाणांवर २४ बाय ७ लक्ष ठेवण्यात येत आहे.

पिंपरी-चिंचवडमधील सुमारे ३० लाख लोकसंख्येच्या शहरावर २४ तास वॉच ठेवण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी इंटिग्रेटेड सिटी कमांड अ‍ॅण्ड कंट्रोल सेंटर तयार केले आहे. पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लि.च्या वतीने इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर (आयसीसीसी) उभारण्यात आले आहे. यामध्ये शहरातील सुमारे ३ हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची या केंद्राशी जोडणी केली आहे. या सेंटरच्या माध्यमातून शहरातील रस्ते, महत्त्वाचे चौक, विविध महत्त्वाच्या तसेच गर्दीच्या ठिकाणांवर २४ बाय ७ लक्ष ठेवण्यात येत आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने कोठे काही अनुचित प्रकार घडत असल्यास, वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्यावर तत्काळ कार्यवाही करणे आता शक्य होणार आहे. याशिवाय शहरातील कचरा उचलणाऱ्या सर्व वाहनांना जीपीएस यंत्रणा बसवलेली असून या वाहनांचे संनियंत्रणही या कमांड सेंटरच्या माध्यमातून केले जाणार आहे.

शहरात तीन हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. भूमिगत ऑप्टिकल फायबर केबल नेटवर्किंगचे कामही पूर्ण झाले आहे. सीसीटीव्ही कॅमेरा केबल नेटवर्किंगशी जोडण्यात आले आहे. शहरातील ६०० किलोमीटर अंतराचे केबल नेटवर्किंग व सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचे जाळे उभारण्यात आले आहे. ही यंत्रणा निगडी येथील टिळक चौकातील संत तुकाराम व्यापारी संकुलातील स्मार्ट सिटीच्या कमांड अ‍ॅण्ड कंट्रोल सेंटरशी जोडण्यात आली आहे. देशात प्रत्येक मेट्रोपोलिटन सिटीसाठी कमांड अ‍ॅण्ड कंट्रोल सेंटर बंधनकारक आहे. त्यानुसार स्मार्ट सिटीअंतर्गत तब्बल ४४१ कोटी २३ लाख खर्च करून हे सेंटर उभारण्यात आले आहे.

पहिल्या टप्प्यात 'अ' क्षेत्रीय कार्यालय हद्दीवर २४ तास नियत्रंण व देखरेख ठेवण्यास सेंटरच्या माध्यमातून सुरुवात झाली. त्याची सुरुवात तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांनी ऑगस्ट २०२२ ला केली. उर्वरित सात क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत सेंटरद्वारे २४ तास वॉच ठेवला जात आहे.  शहरात कोणतीही अनुचित घटना घडू नये. शहराच्या सुरक्षेसाठी हे सेंटर २४ तास कार्यान्वित राहणार आहे. हे सेंटर १०० टक्के कार्यान्वित झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयास वर्ग करण्यात येणार आहे. शहरावर २४ तास वॉच ठेवून शहर सुरक्षित ठेवण्याचा उद्देश सफल ठरणार आहे.

शहरासाठी सेंटर महत्त्वाचा दुवा
स्मार्ट सिटीच्या पॅन सिटी अंतर्गत कमांड अ‍ॅण्ड कंट्रोल सेंटर उभारण्यात आले. ते काम टेक महिंद्रा कंपनीकडून केले आहे. त्यासाठी ४११ कोटी २३ लाखांचा खर्च झाला आहे, तर ५० किऑस्क, ५५ व्हीएमडी, २७० वाय-फाय पोल, ६९० स्मार्ट पोल, व इतर कामे लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो कंपनीकडून केली आहेत. त्यासाठी २२५ कोटी खर्च झाला. असे एकूण तब्बल ६६६ कोटींपेक्षा अधिक खर्च करण्यात आला.

या सुविधेद्वारे राहणार नियंत्रण
निगडी येथे इंटिग्रेटेड कमांड कंट्रोल सेंटरमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा, स्मार्ट पर्यावरण व्यवस्थापन, स्मार्ट वाहतूक व्यवस्थापन, स्मार्ट वॉटर आदींचे  व्यवस्थापन, समन्वय, सहयोग व निरीक्षण आदी नियंत्रण करणे शक्य होणार आहे. त्यासाठी स्मार्ट ट्रॅफिक अंतर्गत १२१० कॅमेऱ्यांद्वारे रस्त्यावरील ट्राफिक सिग्नलचे होणारे उल्लंघन, झेब्रा क्रॉसिंग किंवा स्टॉप लाईन डिटेक्शन, गतीचे उल्लंघन, चुकीच्या दिशेने वाहनांची होणारी वाहतूक, ड्रायव्हिंग करताना मोबाईल फोनचा वापर यावर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने त्याचा वापर करता येणार आहे. तसेच शहरातील पाण्याचे, घनकचरा व्यवस्थापनाचे, वाहतूक कोंडीचे  निरीक्षण व नियंत्रण या मार्फत करण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे ४४१ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.

यासाठी होणार उपयोग
पिंपरी-चिंचवड शहराची कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी, वाहतूक, रहदारी, दंगल, जमाव नियंत्रित करण्यासाठी सेंटरचा मोठा उपयोग होणार आहे. पर्यावरण, घनकचरा व्यवस्थापन, वाहनतळ, पाणीपुरवठा, पीएमपी बस वाहतूक, महापालिकेचे कामकाज आदी कामे सेंटरमधून केली जाणार आहेत. शहराला वेगवान इंटरनेट सुविधा, वाय-फाय, किऑस्कची सुविधा या माध्यमातून मिळणार आहे. व्हीएमडीवर दररोज हवामान, प्रदूषणाची पातळी, पालिका व पोलिसांकडून दिले जाणारे संदेश नागरिकांना दिसणार आहेत. तसेच, महापालिकेच्या विविध विभागाची तसेच, संपूर्ण शहराची सर्व माहिती या सेंटरमध्ये संग्रहित केली जाणार आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest