PCMC News: ऐन दिवाळीच्या तोंडावर कामगारांवर संक्रांत; कंत्राटी कामगारांचा दोन महिने पगारच नाही

पिंपरी-चिंचवड: महापालिकेच्या घरोघरचा कचरा गोळा करताना नागरिकांना जनजागृती करुन त्यांना ओला, सुका आणि घातक वेगवेगळा करण्यासाठी काम करणाऱ्या कंत्राटी कामगारावर संक्रांत ओढवली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Thu, 17 Oct 2024
  • 04:00 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

ना पीएफ, ना बोनस; कचरा जनजागृती करणाऱ्यांची अवस्था बिकट

पिंपरी-चिंचवड: महापालिकेच्या घरोघरचा कचरा गोळा करताना नागरिकांना जनजागृती करुन त्यांना ओला, सुका आणि घातक वेगवेगळा करण्यासाठी काम करणाऱ्या कंत्राटी कामगारावर संक्रांत ओढवली आहे. ठेकेदार कंपनीकडून दोन महिने पगारच नाही. त्याशिवाय पीएफ, बोनसही मिळाला नसल्याने दिवाळीच्या तोंडावर कामगारावर उपासमारीची वेळ आली आहे.

'इंदौर पॅटर्न' पद्धतीने पिंपरी-चिंचवड महापालिकेचे तत्कालिन आयुक्त राजेश पाटील यांनी कचऱ्याचे वर्गीकरण करण्यासाठी ठेकेदाराकडून नागरिकांना जनजागृती करण्यासाठी कंत्राटी कामगारांची नियुक्ती केल्या आहेत. यामध्ये आठ प्रभागात चार संस्था काम करत होत्या. त्यानंतर आता तीनच संस्था काम करत आहेत. ओला आणि सुका कचरा वर्गीकरणाची माहिती देण्यासाठी महापालिकेने ठेकेदाराकडे काम सोपवले आहे. मात्र, ठेकेदारांने दोन महिने झाले कामगारांचा पगारच केला नाही. त्यातच कामगारांना दिवाळीचा बोनसही मिळाला नाही. पीएफसुद्धा वेळेवर भरला जात नाही. कामगारांकडून ठेकेदाराला पगार मागितला तर कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली जाते. त्यामुळे स्मार्ट सिटीचा डौल मिरविणारी महापालिका आणि त्यांच्या ठेकेदारांकडे काम करणाऱ्या कामगारांना पगार मिळत नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. डिव्हाईन वेस्ट मॅनेजमेंट ॲण्ड सर्व्हिसेस नावाच्या कंपनीला कचऱ्याचे अलगीकरण करण्याची  माहिती देण्याचे काम देण्यात आले आहे. यांचे कर्मचारी घरोघरी जाऊन कचऱ्याच्या अलगीकरण विषयी माहिती देतात. त्यासाठी त्यांचा पगार ठरलेला आहे. मात्र, दोन महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचा पगार देण्यात आला नाही.

घनकचरा नव्हे, धन कचरा
शहराच्या घनकचरा व्यवस्थापनात कंत्राटदार संस्था किंवा कंपनीला मोठा नफा मिळत आहे. शासकीय नियमांची पायमल्ली करीत कचरा घरोघरी जाऊन माहिती देण्यासाठी 'स्वस्तातील' कामगार मिळवून ते काम करवून घेतात. त्यात कंत्राटदार, अधिकारी यांचा मोठा आर्थिक लाभ होतो. परंतु, मोबदल्यात त्या कामगारांना कोणत्याही सुविधा दिल्या जात नाहीत. तरी, याविषयी महापालिका संबंधित कंत्राटदारांना पाठीशी घालत आहे.

महापालिकेचे दुर्लक्ष
हे कंत्राटदार वर्षानुवर्षे महापालिकेला वेगवेगळ्या सेवा पुरवतात. मात्र महापालिकेकडून यापैकी कोणत्याच कंत्राटदाराला वेळेत बिले दिली जात नाहीत. अनेकदा कमिशन मागितले जाते. त्यामुळे स्वाभाविकच कंत्राटदार ज्यांना आपल्या सेवेत घेतो त्या कर्मचाऱ्यांना वेळेत पगार इतर सुविधा देऊ शकत नाही. यात सर्वांत मोठी परवड होते ती कामगारांची. तर महापालिका 'ठेकेदार अन् तुम्ही बघून घ्यावे', अशा थाटात या कामगारांना दूर लोटते.

कर्मचाऱ्यांचा पुर्ण पगार देण्यात आला आहे. तसेच बोनसही दिवाळीच्या आठवडाभर आधी देण्यात येणार आहे.
-आकाश परदेशी, व्यवस्थापक, डिवाईन वेस्ट मॅनेजमेंट ॲण्ड सर्व्हिसेस

सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना पगार वेळेत देण्याचे आदेश सर्व कंत्राटदारांना देण्यात आले आहेत. तसेच बोनस संदर्भातही त्यांना सूचना केल्या आहेत.
- अजिंक्य येळे, सहाय्यक आयुक्त, महापालिका

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest